चांदणी चौक उड्डाणपूलाच्या आखणीत अंशत: बदल

प्रभात वृत्तसेवा

पुणे – चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाच्या आखणीत अंशत: बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), मुळशी, पाषाण, कोथरूड आणि बावधनकडे जाण्यासाठी पाच अंतर्गत रस्ते प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी काही रस्ते चक्राकार पद्धतीने एकमेकांशी जोडले जाणार आहेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या फेरप्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

असे आहेत पुलातील बदल

या सुधारित प्रस्तावानुसार, मुळशी रस्त्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी 12 मीटर रुंदी आणि 30 मीटर लांबीचा एक फाटा बावधन येथील सर्व्हे 55 क्रमांक मधून करण्यात येणार आहे. पाषाण रस्त्यावरून उड्डाणपुलाची एक बाजू एनडीए रस्त्याकडे व तेथून एक फाटा कोथरूडमधून मुंबईकडे जाण्यासाठी महामार्गाला जोडला जाणार आहे. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरून एनडीएकडे जाण्यासाठी एक फाटा प्रस्तावित करण्यात आला आहे. हे दोन्ही फाटे गोलाकार वाहतुकीद्वारे जोडण्यात येणार आहेत. यापैकी 59 मीटर लांबीचा रस्ता हा जैव विविधता उद्यान (बीडीपी) झोनमधील आहे तर उर्वरित 60 मीटर रुंदीचा रस्ता निवासी झोनमधील आहे.

याशिवाय पाषाण रस्त्यावरून बावधन आणि कोथरूड येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीकडे जाण्यासाठी नऊ मीटर रुंद आणि 230 मीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाषाणकडे जाण्यासाठी बावधनमधून एक फाटा प्रस्तावित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग ते पाषाण फाट्यावरून बावधनमध्ये प्रवेश करण्यासाठी सेवा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.
वाहतुकीचे सुलभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियोजित उड्डाणपुलाच्या आखणीमध्ये किरकोळ फेरबदल करून सुधारित प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे महापालिकेसमोर ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी सांगितले.

भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करणार

चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलाचे भूमिपूजन 27 ऑगस्टला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या उड्डाणपूलासाठी आवश्‍यक भूसंपादन झाले नसतानाही भूमिपूजन करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर लवकरच भूसंपादनाच्या प्रक्रियेला प्रशासनातर्फे सुरूवात केली जाणार आहे. नियोजित उड्डाणपुलासाठी तब्बल साडेबारा हेक्‍टरची जागा आवश्‍यक असून, त्यामध्ये वनविभाग, खासगी जागा आणि महापालिका आणि संरक्षण विभागाच्या जागांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)