पुणे – पश्चिम पुण्यातील वाहतुकीला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामासाठीच्या 80 टक्के भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात तांत्रिक प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामाची सुरूवात करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येईल.
कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोथरूड, बाणेर, बालेवाडी, बावधन परिसरात प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलासाठी 450 कोटी रुपये खर्च असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या उड्डाणपुलाचे काम करण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच केली आहे. किंबहुना काही महिन्यांपूर्वी या कामाचे भूमीपूजनही गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. केवळ या कामासाठी आवश्यक असलेल्या 9 हेक्टर जमिनीचे संपादन महापालिकेने करून द्यायचे आहे.
महापालिकेने या भूसंपादनासाठी नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. या कामासाठी चांदणी चौकालगतची एका संपूर्ण सोसायटीचे भूसंपादन करण्यासाठी सुमारे 85 कोटी रुपये निधीची आवश्यकता असून राज्य शासनाने यासाठी निधीही मंजूर केला आहे. तर उर्वरित भूसंपादनासाठी महापालिकेने “टीडीआर’, “एफएएसआय’ आणि काही प्रमाणात रोख मोबदल्याचेही पर्याय समोर ठेवले आहेत. मागील काही महिन्यांत वाघमारे आणि त्यांच्या टीमसह भूसंपादन विभागाचे प्रमुख उपायुक्त अनिल मुळे यांनी या जागा मालकांच्या सातत्याने बैठका घेतल्या. संबंधित जागा मालक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भूसंपादनासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. यातून सुमारे 80 टक्के जागा संपादित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच उर्वरीत जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. महिनाभरात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जागांचे हस्तांतरण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे मुळे यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा