चांदणी चौकातील भूसंपादनावरून आयुक्त नाराज

प्रश्‍न तातडीने मार्गी लागण्याच्या सूचना : 185 कोटींचा निधी झाली आहे मंजूर

पुणे – चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचा तिढा सोडविण्यासाठी शासनाने महापालिकेस विशेष अनुदान मंजूर केले आहे. शासन याबाबत आग्रही आणि सकारात्मक असताना, आपल्याकडून भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने का होत नाही? असा सवाल उपस्थित करत, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत गुरुवारी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, आता काहीही करा, पण तातडीने भूसंपादन मार्गी लावा, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या विविध विभागांच्या कामांचा आणि प्रकल्पांचा दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिली आढावा बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत भूसंपादन आणि नगराभियंता विभाग यांच्याकडून चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपुलासाठी आवश्‍यक असलेल्या भूसंपादनाची माहिती घेतली. त्यात फारशी प्रगती नसल्याचे आढळून आल्यानंतर राव यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राज्य शासनाकडून आतापर्यंत कुठल्याही महापालिकेला भूसंपादनासाठी शंभर टक्के निधी देण्यात आलेला नाही. मात्र, तरीही चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागावे यासाठी शासनाने 185 कोटींचा निधी मंजूर केला, असे असताना महापालिकेकडून मात्र, जागा मालक भेटले नाही, अडचणी येत आहे, प्रक्रिया सुरू आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. शासन सकारात्मक भूमिका घेत असताना तुम्ही मात्र संथगतीने काम करीत आहात, या शब्दात आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

अटींची पूर्तता करतानाच येणार नाकी नऊ
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा निधी शासनाकडून मंजूर होण्यापूर्वीच केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पत्र, पाठवून शासनाकडून निधी मिळताच, एका महिन्याच्या आत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तोपर्यंत काम सुरू करावे असे पत्र दिले आहे. शासनाने निधी मंजूर करून आठ दिवसांचा कालावधी झाला आहे. तसेच, शासनाने महापालिकेस अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे या अटींची पूर्तता करतानाच महापालिकेच्या नाकी नऊ येणार आहेत. परिणामी हे भूसंपादन वेळेत न झाल्यास महापालिकेची चांगलीच कोंडी होणार आहे. त्यातच, शासनाने महापालिकेने भूसंपादनाचा पहिला हप्ता द्यावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे भूसंपादन करताना पालिकेची चांगली तारांबळ उडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)