तिढा वाढणार


मोकळ्या जागांच्या मालकांकडूनही रोख रकमेची मागणी

पुणे- चांदणीचौक उड्डाणपुलासाठी अखेर सुरू झालेल्या भूसंपादनाला पुन्हा “ब्रेक’ लागला आहे. या मार्गात येणाऱ्या सुमारे 67 सदनिकांचे भूसंपादन पूर्ण होत असले, तरी पुलासाठी लागणाऱ्या सुमारे साडेचार हेक्‍टर मोकळ्या जागेच्या मालकांनीही आता सदनिकाधारकांप्रमाणे रोख रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ही जागा रोख रक्कम देऊन घ्यायची झाल्यास महापालिकेस तब्बल 350 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

भूसंपादनाच्या मुद्यावरून महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, ही जागा बीडीपीमध्ये आहे; तर बीडीपीमध्ये नेमका किती मोबदला द्यायचा, याचा निर्णय राज्यशासनाकडूनही घेतला जात नाही. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचा तिढा आणखी वाढणार आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन सप्टेंबर-2017 मधे झाले आहे. मात्र, या पुलासाठीची जागाच अजून महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याने हे काम सुरूच झालेले नाही. या पुलासाठी 13.92 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून त्यातील 2 हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. तर उर्वरीत जागेवर सुमारे 67 घरे आणि दोन बंगले आहेत. त्यातील 57 घराची जागा संपादीत करण्यात आली असून त्यासाठी 54 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे तर, उर्वरीत 10 घरांसाठी आणखी 19 कोटींचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात येत असतानाच; दुसऱ्या भूसंपादनासाठी महापालिकेस आणखी झगडावे लागणार असल्याचे चित्र आहे.

..तर भूसंपादनासाठी आणखी 350 कोटी लागणार
महापालिकेस आवश्‍यक असलेली जागा प्रमुख्याने मुळशी रस्त्याच्या बाजूला आहे. ही जागा सुमारे साडेचार हेक्‍टर आहे. ती ताब्यात आल्यास पुलासाठीची सुमारे 50 टक्‍क्‍यांहून अधिक जागा ताब्यात येऊन महापालिकेस प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी ही जागा तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास हस्तांतरित करता येणार आहे. मात्र, आता या जागेची अडचण झाली आहे. सदनिकाधारकांना रोख मोबदला दिल्याने तसेच ही रक्कम मोठी मिळत असल्याने जागामालकांकडून आता रोख मोबदल्याचा हट्ट धरण्यात आला आहे. त्यातच या जागेच्या मोबदल्यामध्ये ‘टीडीआर’ मिळाला, तरी राज्यशासनाच्या वारंवार बदलत्या धोरणांमुळे तसेच बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने जागा मालकांकडून नुकसान होण्याची भीती व्यक्त करत रोख रकमेसाठी तगादा लावण्यात येत आहे.

याबाबत झालेल्या बैठकांमध्ये ही मागणी करण्यात आलेली असल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झालेली आहे. त्यामुळे भूसंपादन कायद्यानुसार, हा रोख मोबदला द्यायचा झाल्यास साडेचार हेक्‍टर जागेसाठी पालिकेस 300 ते 350 कोटी मोजावे लागतील. हा खर्च जवळपास पुलाच्या रकमेएवढाच आहे.

चांदणी चौक दृष्टीक्षेपात
सप्टेंबर- 2017
प्रकल्पाचे भूमिपूजन


13.92 हेक्‍टर जागा
पुलासाठी गरजेची


67 सदनिकाधारक
पुलाच्या जागेत


56 सदनिकांना
दिला मोबदला


साडेचार हेक्‍टर
मोकळी जागा


रोख मोबदल्याची
जागा मालकांकडून मागणी


350 कोटी
रोख मोबदल्यासाठी लागणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)