चांदकमधील पाझर तलाव मोजतोय अखेरच्या घटका

गुळूंब-चांदक ओढाजोड प्रकल्पाचेही भवितव्य धोक्‍यात
चांदकसह परिसरातील शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

धनंजय घोडके
वाई, दि. 10 – वाई तालुक्‍याच्या पूर्वकडील भागात असलेल्या चांदक गावातील पाझर तलावात पावसाळ्यातही पुरेसे पाणी साठत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे तलावाला लागलेली गळती. ही गळती काढण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सुमारे 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अद्यापतरी या तलावाची गळती निघाली नसल्याने सध्यातरी हा तलाव कोरडाच पडला आहे. त्यामुळे चांदकरसह परिसरातील पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसह प्रशासनालाही दुष्काळी जनतेविषयी कसलेही सोयीरसुतक राहिलेले नाही. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये जनताही लोकप्रतिनिधींना धडा शिकविल्याशिवाय राहणार नसून चादकसह परिसरात पाण्यामुळे परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.
चांदक (ता. वाई) येथील पाझर तलावाची गळती लागल्याने दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेला पाझर तलाव प्रचंड गळतीमुळे पूर्ण कोरडा पडला आहे. पाझर तलावात चिमणीलाही पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही. गळती काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री-ना.विजय शिवतारे यांनी 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पंचायत समितीच्या गलथान पणामुळे सर्व निधी पाण्यात गेला असून या गळतीला संबंधित विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. चांदक व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात निघावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीने हा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे चांदकचा पाझर तलाव आज शेवटच्या घटका मोजत आहे. याला संबंधित विभागाने दिलेल्या चुकीचा ठेकेदार जबाबदार आहे. पंचायत समितीचे अधिकाऱ्यांचे हात ओले करून संबंधित कामाची बिले काढावयाची सवय लागल्याने आज लाखो रुपये खर्च करून गळती काढलेल्या चांदकच्या पाझर तलावाची अवस्था दयनीय झाली आहे. वास्तविक हा प्रकल्प जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान झाला होता त्यामुळे त्याची व त्यांची ओळख ही राज्य व देश पातळी पर्यंत पोहोचली होती. चांदकसह परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून गंभीर बनला आहे. पाझर तलावात एक थेंब पाणी शिल्लक न राहिल्याने परिसराला टॅंकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार यात शंका नाही. टॅंकर मुक्त चांदक, व परिसर होण्याचे शेतकऱ्याचे स्वप्न हे निव्वळ संबंधित विभाग व ठेकेदार यांच्या निष्क्रियपणामुळे धुळीस मिळाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओढाजोड प्रकल्पही धोक्‍यात
पाझर तलावाच्या गळतीमुळे गुळूंब-चांदक ओढाजोड प्रकल्प ही धोक्‍यात आला आहे. या ओढाजोड प्रकल्पावर शासनाचे व ग्रामस्थांचे लाखो रुपये लागले आहेत. या प्रकल्पाला स्वतः राज्यपालांनी भेट देवून संपूर्ण राज्यात हा प्रयोग करावा अशा सूचना जलसंधारण विभागाला केल्या होत्या. पाझर तलावाच्या गळतीमुळे प्रकल्पाचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. तरी संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई का करू नये अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने स्वतः जिल्हाधिकारी यांनी काम चांगले झाले यासाठी पाण्याचे पूजन करण्यात आले होते. तीन महिन्यातच पाझर तलावात चिमणीला पिण्यासाठी पाणी शिल्लक राहिले नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित उपअभियंत्याने संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा एकदा चांगले काम करून घ्यावे, त्यामुळे वळीवाच्या पावसाचे पाणी तरी त्यात साठेल व भागातील पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटेल. अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पावित्रा
जलयुक्तशिवार या योजनेवर लाखो-करोडो रुपये शासन जलसंधारणच्या माध्यमातून खर्च करीत असून तो केलेला खर्च चांदकच्या तलावावर केलेला खर्च पूर्णपणे वाया गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तरी संबंधित विभागाने त्वरित डोळ्यावर पट्टी न बांधता चांदकच्या पाझर तलावाची गळती काढावी व पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. अन्यथा संतप्त झालेला शेतकरी वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

चांदकच्या पाझर तलावाला गळती लागल्याने परिसरातील जवळ-पास दोनशे शेतकऱ्यांच्या व गावाच्या पाणीपुरवठा करणारया विहिरीचीही पाण्याची पातळी खालावली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जानेवारी महिन्यातच तलावात पाण्याचा खडखडाट झाला असून पुढील तीन-ते चार महिने शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळेही वन्य जीवांचा वावर गावासह वाडी-वस्तींवर वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

– प्रकल्प ग्रस्त शेतकरी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)