‘चल रे जॅमर काढ, मी आमदार आहे’

वाहतूक नियम तोडूनही पिंपरीच्या आमदारांची पोलिसांशी हुज्जत 

नारायणगाव – पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाहनाने वाहतूक नियमाचे उल्लंघन करून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अरेरावी केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पुणे-नाशिक महामार्गावर घडली.

-Ads-

नारायणगाव मधील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर नो पार्किंग झोनमध्ये आज सायंकाळी 4.15 च्या सुमारास आमदार -विधानसभा सदस्य असा स्टिकर असलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा (एमएच 14 सीएल 1986) उभी केली होती. ही गाडी महार्गावर नो पार्किंग झोनमध्ये रस्त्यावरच मध्यभागी उभी असल्याने वाहतूक पोलिसांनी जॅमर लावले. सायंकाळी 4.30 च्या सुमारास चालक गाडीजवळ आला व पोलिसांना म्हणाला की, ‘ही गाडी आमदारांची आहे, जॅमर काढा अन्यथा वाईट परिणाम होतील.’ त्यावर पोलिसांनी आपली गाडी नो पार्किंग मध्ये उभी असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने पावती फाडावी लागेल असे सांगितले. त्याचवेळी आमदार चाबुकस्वार गाडीमध्ये पुढील सीटवर बसले व पोलिसांनी जॅमर लावल्याचे कळताच आमदारांचा राग अनावर झाला.

पोलीस कर्मचारी लोहार यांना “चल रे जॅमर काढ, नाहीतर मी आमदार आहे तुझी वर्दी उतरवली’, “तुझ्या एसपीला फोन लावू का, जॅमर काढ”, अशी अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याशी सुमारे 10 मिनिट हुज्जत घालत होते. शेवटी वादविवाद सुरू असताना स्थानिक पत्रकार तिथे आले असता त्यांनी आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पीएने पत्रकारांशीही अरेरावी केली. शेवटी उपस्थित पत्रकारांनी कायदा सर्वाना समान असून जुन्नर तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी यांनीही कायद्याचा आदर करीत स्वतः 200 रुपयांची पावती फाडली आहे. आपणही लोकप्रतिनिधी आहात आपणही कायद्याचा आदर राखावा असे सांगितल्यावर आमदार चाबुकस्वार यांचा राग शांत झाला. त्यांचे चालक पंकज सुरेश बोरकर पुणे यांनी मोटर वाहन कलम 119/177 नुसार 200 रुपये दंडाची पावती फाडली. व अखेर आमदार पुण्याच्या दिशेने नाराज होऊन रवाना झाले.

गाडीला काळ्या रंगाचे डार्क फिल्म
पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार हे नारायणगाव पोलिसांशी सुमारे 10 मिनिट हुज्जत घालत होते. जर आमदार म्हणून निवडून आलेले लोक प्रतिनिधी जर कर्त्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना अशी अरेरावीची वागणूक देऊन धमकी देत असेल तर अशा लोकप्रतिनिधीकडून सर्व सामान्यांनी काय आदर्श घ्यावा. पोलीस गाडीचे जॅमर काढत नसल्याने आमदारांनी स्थानिक एका पक्षाच्या तालुका प्रमुखाला फोन करून गाडीला पोलिसांनी जॅमर लावल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे आमदारांच्या गाडीच्या तिन्ही बाजूच्या काचांना बंदी असलेली काळ्या रंगाची डार्क फिल्म बसविण्यात आलेली आहे.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)