चऱ्होलीतील रस्त्यांना वाढीव खर्चाचे “फाटे’

पिंपरी – वाढीव खर्चाच्या निविदा मंजुरी करत ठेकेदारांचे चांगभले करण्याचा सपाटा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लावला आहे. चऱ्होलीतील रस्ते विकसनाच्या 9 कोटी रुपयांची वाढीव दराची निविदा आयुक्‍तांनी स्विकारल्याने हा खर्च आता 46 कोटींवर पोहचला आहे.

शहरात पाणी, वीज, आरोग्य आदी मुलभूत समस्या कायम असताना महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केवळ रस्ते विकासालाच प्राधान्य दिल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 70 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील 874.14 किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम आणि वेगवान करण्याकरिता बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) विकसित करण्यात येत आहे.तरी देखील आयुक्तांनी रस्ता एके रस्ता हे विकासाचे धोरण राबविल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – आळंदी रस्त्यापासून चऱ्होली लोहगाव हद्दीपर्यंत रस्ता विकास आराखड्यानुसार विकसित केला जाणार आहे. या कामाचे दोन टप्पे करत स्वतंत्र निविदा महापालिकेने 19 ऑक्‍टोबर 2018 रोजी प्रकाशित केल्या. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 41 कोटी 95 लाख 68 हजार 982 रुपयांचा तर, दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 41 कोटी 80 लाख 97 हजार 342 रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला. या दोन्ही कामांसाठी केवळ तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या.

पहिल्या टप्प्याच्या 41 कोटी 95 लाख 68 हजार 982 रुपयांच्या कामासाठी मेसर्स कृष्णाई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स धनेश्वर कन्स्ट्रक्‍शन आणि मेसर्स मनीषा कन्स्ट्रक्‍शन या तीन ठेकेदारांनी वाढीव दराच्या निविदा भरल्या. त्यापैकी मेसर्स कृष्णाई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडची निविदा 11.79 जादा दराची म्हणजेच 4 कोटी 81 लाखांची वाढीव दराची निविदा वाजवी असल्याचा निष्कर्ष आयुक्तांनी काढला. तसेच, त्यांना 46 कोटी 76 लाख 60 हजार 142 रुपयांत कंत्राट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या 41 कोटी 80 लाख 97 हजार 342 रुपयांच्या कामासाठी मेसर्स धनेश्वर कन्स्ट्रक्‍शन, मेसर्स कृष्णाई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स अजवाणी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या तीन ठेकेदारांनी वाढीव दराच्या निविदा भरल्या. त्यापैकी मेसर्स धनेश्वर कन्स्ट्रक्‍शनची निविदा 10.40 जादा दराची म्हणजेच 4 कोटी 8 लाखांची वाढीव दराची निविदा वाजवी असल्याचा निष्कर्ष आयुक्तांनी काढला. तसेच, त्यांना 45 कोटी 88 लाख 97 हजार 459 रुपयांत कंत्राट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्बन स्ट्रीटचाही खर्च वाढला
विशालनगर – जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुलापर्यंतचा 24 मीटर रूंद रस्ता तसेच आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील 18 मीटर रूंदीचे चार रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. मात्र, ही पाचही कामे निविदा दरापेक्षा जादा दराने करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे महापालिकेला तब्बल साडेचार कोटीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. रस्ते विकसित करण्याच्या या पाच कामांपैकी सुमारे 34 कोटी रूपये खर्चांची चार कामे ही आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातीलच आहेत. मात्र, या चार कामांसाठीही स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या. या रस्त्यांसाठी एवूैण निविदा खर्च 47 कोटी 63 लाख रूपये अपेक्षित धरण्यात आला. परंतु, प्रत्येक ठेकेदाराने जादा दराने निविदा सादर केली. त्यामुळे हा खर्च 52 कोटी 15 लाखावर पोहोचला आहे. म्हणजेच हे पाचही रस्ते विकसित करण्यासाठी तब्बल साडेचार कोटी रूपयांचा खर्च वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)