#चर्चेतील चेहरे – सोमनाथ चॅटर्जी

नवी दिल्ली – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ व्चॅटर्जी यांचे या आठवड्यात वृद्धापकाळाने निधन झाले. “युपीए’ सरकारच्या काळामध्ये 2004 ते 2009 या काळामध्ये चॅटर्जी यांनी लोकसभेच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

व्यवसायाने ऍडव्होकेट असलेल्या चॅटर्जी यांचा जन्म 25 जुलै 1929 रोजी आसाममधील तेजपूरमध्ये झाला. मात्र त्यांचे शिक्षण आणि व्यवसाय कोलकात्यातच झाले. त्यांचे वडील निर्मल चंद्र चॅटर्जी हे देखील राजकारणी आणि पत्रकार होते. मुख्य म्हणजे ते हिंदू महासभेचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र सोमनाथ चॅटर्जी मात्र कम्युनिस्ट विचारसरणीनेच प्रभावित झाले. इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापिठात शिक्षण पूर्ण केल्यावर सोमनाथ चॅटर्जी यांनी कोलकाता हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टात वकिली करायला सुरुवात केली.

-Ads-

कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्यावर 1968 सालापासून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. ते लोकसभेमध्ये सर्वाधिक काळ सक्रिय असलेले खासदार होते. 1971 पासून 2009 पर्यंत तब्बल 10 वेळेस ते लोकसभेत निवडून आले होते. यामध्ये केवळ 1984 सालचा अपवाद आहे. तेंव्हा ममता बॅनर्जींनी चॅटर्जी यांचा पराभव केला होता. इतक्‍या प्रदीर्घ काळासाठी संसदेमध्ये लोकप्रतिनिधीत्व केल्याबद्दल 1996 मध्ये त्यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे वडील निर्मल चंद्र चॅटर्जी लोकसभेच्या ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत त्याच मतदारसंघातून 1971 मध्ये ते सर्वप्रथम निवडून आले होते. पुढे अनके मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले होते.

कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीनुसार राष्ट्रीय संपत्तीवर प्रथम हक्क नागरिकांचा, हे आग्रही प्रतिपादन चॅटर्जी अक्षरशः जगले. लोकसभेच्या सभापतीपदाच्या काळात लोकप्रतिनिधींच्या प्रसाधनगृह आणि चहा यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करण्याची प्रथा त्यांनी बंद केली होती. याशिवाय परदेश यात्रेदरम्यान खासदारांसह त्यांचे कुटुंबियही सरकारी खर्चाने जात असत. त्यालाही चॅटर्जी यांनी चाप लावला होता.

कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यांचा सामना विरोधी पक्ष असलेल्या हिंदुत्ववादी भाजपबरोबर नेहमीच व्हायचा. त्यांच्या याच गुणाचा उपयोग सभापती म्हणून करता येऊ शकेल, अशा अंदाजाने त्यांची निवड झाली होती. पण सभापती म्हणून पूर्णपणे निष्पक्ष आणि सभागृहाच्या मापदंडांनुसारच कामकाज करण्याकडे त्यांचा कल असायचा. कित्येकवेळेस सभागृहात गदारोळ करणाऱ्या सत्ताधारी सदस्यांनाही मुख्याध्यापकाच्या भूमिकेतून त्यांनी खडसावले होते. तेंव्हापासून चॅटर्जी यांचे टोपणनाव “हेडमास्टर’ असे रूढ झाले. 2008 मध्ये “युपीए’ सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्दयावरून चॅटर्जी आणि कम्युनिस्ट पक्षाचे मतभेद झाले होते.

सरकारवर अविश्‍वास ठराव आणत कम्युनिस्ट पक्षाने कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि चॅटर्जी यांना सभापतीपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली. मात्र सरकारच्या विरोधात मतदान करणे म्हणजे तत्कालिन विरोधी पक्ष असलेल्या भाजपची साथ देण्यासारखे होईल, असे सांगून ही सूचना चॅटर्जी यांनी अमान्य केली. परिणामी या ज्येष्ठ नेत्याला पक्षातून अपमानास्पदरितीने हाकलण्यात आले.

ज्या पक्षाबरोबर अर्ध्या दशकाइतके योगदान दिले, त्या पक्षातून अशारितीने बाहेर काढले जाणे हा आपल्या आयुष्यातील सर्वाधिक दुःखाचा प्रसंग असल्याचे उद्‌गार त्यांनी काढले होते. त्यानंतर महिन्याभरातच त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. राजकारणातून निवृत्त झाल्यावर बोलपूर येथील महिला महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून ते कार्यरत राहिले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)