#चर्चेतील चेहरे: जाणून घ्या ‘कुलदीप नय्यर’ यांच्या बद्दल  

वरिष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुलदीप नय्यर यांचे या आठवड्यात निधन झाले. अर्ध्या दशकापेक्षा अधिक काळ देशातील प्रसिद्ध वर्तमान पत्रे आणि वृत्तसंस्थांच्या माध्यमातून कुलदीप नय्यर यांनी पत्रकारिका केली होती. कुलदीप नय्यर यांचा जन्म 1923 साली आताच्या पाकिस्तानात सियालकोटमध्ये झाला. यांनी सुरुवातीच्या काळात उर्दु भाषेतून वार्तांकन केले होते.
केंद्र सरकारच्या प्रेस सूचना अधिकारी म्हणून दीर्घकाळ काम केल्यानंतर कुलदीप नय्यर यांनी युएनआय, पीटीआय या वृत्तसंस्था आणि “द स्टेटसमन’, “इंडियन एक्‍सप्रेस’ सारख्या आघाडीच्या इंग्रजी दैनिकांमधून राजकीय विश्‍लेषणात्मक लेखन केले होते. याशिवाय “टाईम्स ऑफ इंडिया’सारख्या दैनिकासाठी तब्बल 25 वर्षे त्यांनी लंडनवरून वार्तांकन केले होते. लाल बहादुर शास्त्री यांच्याशी ताश्‍कंदमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत संपर्कात राहिलेले नय्यर हे एकमेव पत्रकार होते. आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठीच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल कुलदीप नय्यर यांना तुरुंगवासही झाला होता.
आणीबाणीनंतर इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाचे पेव फुटल्यावर कुलदीप नय्यर यांनी एका लेखामध्ये म्हटले होते, की आज प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीय इतके सरकार धार्जिणे झाले आहे की वेगळी आणीबाणी आणण्याची जरूरीच भासू नये. लोकशाहीवर गाढ निष्ठा आणि समाजवादी मूल्यांशी बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. धर्मनिरपेक्षता तत्वाचा अंगिकार राजकारणातून हद्दपार झाल्याची टीका सर्वप्रथम त्यांनीच केली होती. भारतातील युवा पत्रकारांना सत्य आणि निर्भड वार्तांकनाचे धडेच नय्यर यांनी स्वतःच्या कामगिरीतून घालून दिले. प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करून बंडखोरीकडे कल असलेल्या त्यांच्या लेखणीने आयुष्यभर सरकारविरोधात आग ओकण्याचे काम केले. पण तरिही सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सर्वच पक्षांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असत.
तरिही नय्यर यांच्यावर सातत्याने कॉंग्रेस धार्जिणे आणि भाजप, संघ विरोधी म्हणून टीका होत राहिली. अमृतसरमध्ये “ऑपरेशन ब्लू स्टार’ला सुरुवात होण्यापूर्वी जर्नैल भिंद्रनवालेशी संवाद साधण्याचे प्रयत्न नय्यर यांनी अखेरपर्यंत केले होते. खलिस्तानवादी चळवळीवर त्यांनी टीकाही केली. त्याबद्दल पंजाबमधील संघटनांचा रोष त्यांना पत्करावा लागला. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने त्यांना दिलेला “शिरोमणी’ पुरस्कार काढून घेतला. 1990 साली ब्रिटनमध्ये उच्चायुक्‍त म्हणून त्यांची नियुक्‍ती झाली.
1996 मध्ये भारताच्यावतीने संयुक्‍त राष्ट्रातील प्रतिनिधी मंडळात ते सदस्य होते. तर 1997 साली ते राज्यसभेवर नियुक्‍त झाले. कुलदीप नय्यर यांनी वर्तमानपत्रीय लेखनाबरोबर अनेक पुस्तकांचे लेखन आणि संपादनही केले आहे. त्यामध्ये त्यांचे आत्मचरित्र ‘बियोंड द लाईन्स’ विशेष लोकप्रिय झाले आहे. याशिवाय “बिटवीन द लाईन्स’, “डिस्टेंट नेव्हर: अ टेल ऑफ द सब कॉन्टिनेंट’, “इंडिया आफ्टर नेहरू’, “वॉल ऍट वाघा; इंडिया पाकिस्तान रिलेशनशीप’, “इंडिया हाऊस’सारखी पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)