चर्चा: सरदार पटेलांचे यथोचित स्मारक   

विलास पंढरी 

गुजरातमध्ये “सरदार’ या नावाला साजेसे भारतरत्न वल्लभभाई पटेल यांचे प्रचंड मोठे स्मारक उभे रहाते आहे, ही त्यांनी केलेल्या कामाची पावतीच आहे. त्यांचे कार्य असे स्मारक होण्याएवढ्या उंचीचे नक्कीच आहे.नेहरू-गांधी परिवाराला विरोध आणि कॉंग्रेसच्याच दुर्लक्षित नेत्यांचे योग्य उदात्तीकरण हे मोदींचे सूत्र राहिले आहे.पटेल, सुभाषचंद्र बोस अशा दुर्लक्षित नेत्यांचे मोठेपण त्यानिमित्ताने जनतेसमोर येते आहे हे चांगलेच आहे. असे म्हटले जाते की पटेलांचे नेहरूंनी ऐकले असते (किंवा पटेलच पंतप्रधान झाले असते) तर आजचा काश्‍मीर प्रश्न निर्माणच झाला नसता. 

गुजरातमधील सरदार सरोवराच्या किनारी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे नुकतेच 31 ऑक्‍टोबर रोजी म्हणजेच पटेलांच्या 143 व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाश्रश. पटेल यांच्या गावी हा पुतळा बसवण्यात आला असून या प्रकल्पावर कित्येक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा पुतळा सुमारे 182 मीटर उंच असून त्यासाठी 70 हजार टन सिमेंट आणि 18,500 मेट्रीक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पुतळा म्हणजे जागतिक पर्यटनस्थळ ठरणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून अमेरिकेतील स्वातंत्रय देवतेच्या पुतळ्याच्या दुप्पट उंचीचा आहे. खरे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा यथोचित गौरव होत आहे, हे महत्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वल्लभभाई पटेल हे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले आहे. ते पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद, बार्डोलीच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केल्यानंतर त्यांची गणना गुजरातच्या व कॉंग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. वर्ष 1934 व 1937 च्या निवडणुकांत त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. “भारत छोडो’ आंदोलनात ते आघाडीवर होते.

वल्लभभाई हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. भारतातील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतीय संघराज्यात केलेले विलिनीकरण हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून त्यांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात. पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.

वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा नडियाद (गुजरात) येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख 31 ऑक्‍टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. वय 18 वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील 12/13 वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा,म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली व वकिलीही सुरू केली. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली – 1904 मध्ये मणीबेन आणि 1906 मध्ये डाह्याभाई अशी त्यांची नावे होती.

महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारविरुद्ध सन 1920-1922 या काळात भारतीय पातळीवर असहकार चळवळ सुरू केली. या सहकार चळवळीत लाखो लोक सामील झाले. या असहकार चळवळीत पं. मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राज गोपालचारी आणि चिंतामणी केळकर यांनी आपल्या वकिलीचा त्याग केला. वर्ष 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी सन 1942 च्या चले जाव’ आंदोलनात भाग घेतला. इंग्रज सरकारने 9 ऑगस्ट 1942 च्या पहाटेच गांधीजींसह सरदार वल्लभभाई पटेल, पं. नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभपंत, अरुणा असफअली या कॉंग्रेसच्या नेत्यांना अटक केली. या वेळी दुसरे महायुद्ध चालू होते. इंग्रज सरकार अडचणीत होते. अमेरिकेच्या मदतीमुळे दोस्त राष्ट्रांचा – इंग्लंड-फ्रान्सचा विजय झाला. तरीही या युद्धात इंग्लंडचे कंबरडे मोडले.

भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता कॉंग्रेस, मुस्लीम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर 1946 साली नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत-पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली.त्यानंतर हिंदू-मुस्लीम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्‍यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकीविरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती. दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)