चर्चा : वायूप्रदूषणाची तीव्रता चिंताजनक पातळीवर ! 

जयेश राणे 

पाण्यातील विषाणू नष्ट करण्यासाठी बहुतांश घरांमध्ये ते प्रतिदिन फिल्टर केले जाते, उकळवले जाते. मात्र, वातावरणातील अशुद्ध हवेला शुद्ध करण्यासाठी वृक्षांना पर्याय नाही. आजमितीस वृक्षसंपदा वेगाने अल्प होत आहे. त्यामुळे शहरी भागासाठी वायू शुद्धीचे महत्त्वाचे कार्य करणारे घटकच नामशेष होत आहेत. प्रदूषण करण्यासाठी सरसावणारे हात वृक्ष लावण्यासाठी, त्यांचे जतन करण्यासाठी सरसावत नाहीत. भारतातील वायूप्रदूषणाच्या बळींच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. हा अति धोक्‍याचा इशारा आहे.

राजधानी दिल्ली येथील वायूप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबर या दिवशी इंदिरा पर्यावरण भवनच्या बाहेर काही नागरिकांनी याच्या विरोधात निदर्शन केले. “श्‍वास घेणे हा माझा अधिकार आहे’, असा मजकूर असलेले फलक नागरिकांनी हातात घेतले होते. शुद्ध हवेच्या मागणीसाठी अशी वेळ यावी यासारखे दुर्दैव ते काय ? पैशांनी वस्तू खरेदी करता येतात. मात्र, निसर्गनिर्मित घटक म्हणजे हवा खरेदी करता येऊ शकत नाही. त्यामुळे शुद्ध हवेअभावी घुसमट होत आहे आणि अशातूनच प्रदूषण विरोधी निदर्शन करण्याची गरज पुढे आली.

-Ads-

वाढते वायूप्रदूषण आणि विषारी हवेमुळे भारतात वर्ष 2016 मध्ये तब्बल 1 लाख 10 हजार लहान मुलांचा हकनाक बळी गेल्याचे ‘जागतिक आरोग्य संस्थे’च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. भारतात वायूप्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी 20 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतात 2.5 पीएमच्या प्रदूषणामुळे मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी 47 हजार लहान मुले वायूप्रदूषणाचे बळी ठरतात. भारतात मृतांमध्ये मुलींचे प्रमाणही भरपूर आहे. एकूण 32 हजार मुली वायूप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडल्या.

जगातील वायूप्रदूषणाचे 25 टक्‍के बळी, हे भारतातच जातात. तेव्हा येत्या काळात वायूप्रदूषण कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत असा सल्ला ‘जागतिक आरोग्य संघटने’ने दिला आहे. वायूप्रदूषणाविषयी भारताची स्थिती किती विदारक आहे, हे सांगण्यासाठी हे वास्तव पुरेसे आहे. तरीही हा विषय गांभीर्याने घेतला जात आहे, अशी स्थिती नाही. वाढती वाहन संख्या, एका कुटुंबाकडे एकापेक्षा अनेक वाहने असणे या गोष्टी वायूप्रदूषणास हमखास वाट करून देतात. प्रदूषणाचे साधन असलेल्या या साधनाची आपल्याला असलेली आवश्‍यकता याचा विचार होत नाही.

मनुष्य देहासाठी आवश्‍यक इंधन म्हणजे प्राणवायू (ऑक्‍सिजन) आणि अन्नपचनातून निर्माण होणारा ‘पाचक रस’ ! या दोन्ही गोष्टी या देहासाठी अनिवार्य आहेत. मात्र, हे दोन्हीही घटक प्रदूषण आणि भेसळ यांनी बाधित झाले आहेत. परिणामी विविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे कोणाला कोणता आजार कधी होईल याची खात्री देता येत नाही. विशेष म्हणजे याला वयाचे बंधन राहिलेले नाही. शरीरामध्ये दूषित घटक जात असल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्‍ती अल्प होत जाते. त्यामुळे वातावरणात थोडासा जरी पालट झाला तरी सर्दी, खोकला, ताप हे त्रास मनुष्याला हैराण करतात. आपल्या देहाची प्रतिकार क्षमता किती कमकुवत आहे, हे यावरून लक्षात येते. अशी मंडळी साथीच्या विविध आजारांची हमखास शिकार बनतात.

देशाच्या शहरी भागांत वायूप्रदूषणाची समस्या अतिगंभीर स्वरूपाची आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली ही महानगरे म्हणजे चेंबर झाली आहेत. शहरी भागांत नोकरी-व्यवसाय-निवास यांसाठी संकुल बांधणे, पायाभूत सुविधा यांसाठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू असते. सिमेंटची जंगले उभारण्यासह इमारतींना बाहेरून काच लावून इमारत अधिक आकर्षक कशी दिसेल, असे पाहिले जात आहे. अशा प्रकारच्या व्यावसायिक इमारती बांधण्याचे पेवच फुटले आहे. येथील वातावरण लक्षात घेता भारतामध्ये याची आवश्‍यकता आहे का ? अर्थातच नाही ! अशा इमारतींमुळे वायूप्रदूषणात भरच पडते. काचांमुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे हवासुद्धा उष्ण होते. हवेमध्ये जो काही थोडाफार गारवा आहे, तोही गारवा अशा इमारती दूर लोटत आहेत. वायूप्रदूषण म्हणजे केवळ धूर नव्हे, तर यासह हवेला मारक ठरणारे जे जे घटक कारणीभूत असतात. त्या सर्वांचा समावेश यात होतो.

विज्ञानाने प्रगती केली. पण त्याचा उपयोग करण्याचे ताळतंत्र मनुष्याकडे नाही. भारतात तर त्याचा दुरान्वयेही संबंध नाही. म्हणूनच तर येथील वातावरणाचा चौकस विचार न करता केवळ बांधकाम उभारण्यावर भर दिला जात आहे. यंदा फटाके वाजवण्याचे प्रमाण अल्प झाले, अशी चर्चा आहे. पण तरीही नेहमीच्या प्रदूषणात भरच पडली आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे ओझोन वायूच्या थराचे प्रमाणही विरळ झाल्याने सूर्याच्या अतिनील किरणांच्या चटक्‍यांचा सामना करावा लागणार आहे. म्हणजे आता केलेल्या प्रदूषणाचे चटके कालांतराने बसणार आहेत.

वायूप्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी शहरी भागातील नागरिकांकडून काही प्रयत्न केले जातील, अशी आशा ठेवण्यात काही तथ्य नाही. येथे होणाऱ्या प्रदूषणात वाढ होईल. पण घट होण्याची सुतराम शक्‍यता नाही. भारताची लोकसंख्या 125 कोटींहून अधिक आहे. येथे ग्रामीण भाग अधिक असल्याने बहुतांश नागरिक ग्रामीण भागात निवास करतात. शहरातील प्रदूषित वातावरणात घुसमट होत असते. त्यामुळे नोकरी-व्यवसाय-शिक्षण या निमित्ताने शहरी भागात असणारी मंडळी 2-3 दिवस सलग सुट्टी असल्यावर गावाकडे वळतात. तेथील शुद्ध हवेत ताजेतवाने होऊन आल्यावर पुन्हा आपापल्या दैनंदिन कार्याला आरंभ करतात. शहरांमध्ये शुद्ध हवा सोडून बाकी सर्व गोष्टी मिळतील.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)