#चर्चा : लष्कराच्या तालावर पंतप्रधान नाचणार काय? 

प्रा. अविनाश कोल्हे 

पाकिस्तानात जरी सार्वत्रिक निवडणूका झाल्या असल्या तरी तेथील प्रश्‍न संपलेले नाहीत. उलटपक्षी जवळपास सर्व महत्वाच्या राजकीय पक्षांनी या निवडणूकांत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत नव्याने निवडणूका घेण्याची मागणी केली आहे. यातील मेख समजुन घेण्यासाठी काही तपशील डोळयांसमोर ठेवावे लागतील. 

होणार होणार म्हणून गाजलेल्या आणि होण्याच्या आधीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच संपन्न झाल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणूकांत 51.85 टक्के मतदान झाले. अपेक्षेप्रमाणे या निवडणूकांत माजी क्रिकेटपटू इम्रानखानच्या :पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाने बाजी मारली. मात्र इम्रानखानच्या पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे पाकिस्तानात आघाडीचे सरकार येणार आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत एकुण 342 जागा असतात आणि त्यापैकी 70 जागा राखीव असतात. यातील 60 जागा स्त्रीयांसाठी तर 10 जागा अल्पसंख्याक समाजासाठी राखीव असतात. पाकिस्तानात फेडरल शासन यंत्रणा आहे व तेथे चार प्रांत आहे. पंजाब (141) , सिंध (61), खैबर पखतुनवा (39), तर बलुचीस्तान (16) असे खासदार निवडून जातात. इस्लामाबादमधून तीन, केंद्रशासित प्रदेशातून 12 सदस्य निवडले जातात.

या निवडणूकांसाठी सुमारे दहा कोटी साठ लाख मतदार होते. तेथे एकुण 110 नोंदणीकृत पक्ष आहेत. संसदेचा कार्यकाळही पाच वर्षांचा असतो. सन 2013 च्या सार्वत्रिक निवडणूकांत नवाझ शरीफ यांच्या “पाकिस्तान मुस्लिम लिग’ या पक्षाने दणदणीत बहुमत मिळवले होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पंतप्रधानपदावरून हाकलले तर यंदा त्यांना आणि त्यांची कन्या मरियम हिला न्यायालयाने दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शरीफ यांची पत्नी लंडनमध्ये कर्करोगाशी झुंजत आहेत. त्यांच्या धाकटया भावाकडे आता पक्षाची सूत्रं आहेत.
अशीच अवस्था पाकिस्तानातील “पाकिस्तान पिपल्स पार्टी’ या पक्षाची आहे. हा पक्ष भुत्तो कुटूंबियांच्या हातात असतो. या पक्षाची स्थापना 1967 मध्ये झुल्फीकार अली भुत्तो यांनी केली होती. त्यांना जुलै 1979 मध्ये लष्करशाहीने फाशी दिल्यानंतर या पक्षाची धुरा त्यांची कन्या बेनझीर भुत्तो यांच्याकडे आली होती. बेनझीर भुत्तो यांचा 2007 मध्ये खून झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व पती असिफ अली झरदारी व मुलगा बिलावल यांच्याकडे आहे.

लष्कराने या खेपेस इम्रानखान यांच्या पक्षाला झुकते माप दिल्याचे निवडणूका होण्याआधीपासून स्पष्ट दिसत होते. परिणामी इम्रानखान यांचा पक्ष जिंकेल व ते पाकिस्तानचे पंतप्रधान होतील याबद्दल फारसा वाद नव्हता. मात्र, लष्कराचा एवढा उघड पाठिंबा असूनही इम्रान यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. या निवडणूकात इम्रानखान यांच्या पक्षाला 119, तर शरीफ यांच्या पक्षाला 64 तर भुत्तो यांच्या पक्षाला फक्‍त 43 जागा मिळाल्या.
निकालानंतर दोन महत्वाच्या विरोधी पक्षांनी तर या निकालांबद्दल नाराजी व्यक्‍त केली आहेच, पण धार्मिक पक्षांनीसुद्धा याबद्दल नाराजी दर्शवली आहे. या निवडणूकांसाठी आलेल्या “युरोपियन युनियन’च्या निरिक्षकांनी जाहीर केले की, या निवडणूकांत नकारात्मक वातावरणात घेतल्या गेल्या आहेत. विरोधी पक्षांना समान संधी दिल्या गेल्या नाहीत.

इम्रानखान नियाझी (जन्म : 5 ऑक्‍टोबर 1962) हे नामवंत क्रिकेटपटू म्हणून जगाला परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वखाली पाकिस्तानने 1992 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. पूर्वी आणि नंतर पाकिस्तानला विश्‍वचषक जिंकता आलेला नाही. सन 1992 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खान यांनी एप्रिल 1996 मध्ये ‘पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाची स्थापना केली. त्यांनी सन 2002 आणि सन 2013 साली झालेल्या निवडणूकांत ते खासदार म्हणून संसदेत प्रवेश करते झाले. या दोन्ही निवडणूकांत त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. याच निवडणूकांत त्यांच्या पक्षाने मित्र पक्षांशी आघाडी करून खैबर पख्तुनवा प्रांताची सत्ता मिळवली.

आता झालेल्या निवडणूकांत त्यांच्या पक्षाला 119 जागा मिळाल्या असल्या तरी 137 जागांचा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षांशी आघाडी करावी लागणार आहे. शिवाय प्रमुख तीन पक्षांच्या व्यतिरिक्‍त इतर पक्षांनी 48 जागा जिंकल्या आहेत. तसेच अपक्षांची संख्या मोठी आहे. ते इम्रान खानच्या पक्षात जाऊ शकतात.
हे सगळे असले तरी, एका वेगळयाच पातळीवरून पाकिस्तानचे कौतुक करावे लागते. तेथे पाच वर्षांच्या अंतराने झालेली ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक. याचा अर्थ असा की, आता पाकिस्तानात लोकशाही प्रक्रिया रूळत आहे.
इम्रानखान यांनी निकाल लागल्यानंतर केलेल्या भाषणांत त्यांच्या सरकारच्या आगामी धोरणांबद्दल सूचन केले आहे. पाकिस्तानातील कोणत्याही नेत्याप्रमाणे त्यांनी काश्‍मीरमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्‍त केली आहे. शिवाय त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “नॅशनल अकाऊंटीग ब्युरो’ला अधिकाधिक अधिकार देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

मात्र, इम्रानखान यांच्या पक्षाला पारंपारिक अर्थाने म्हणावे असे राजकीय तत्वज्ञान नाही. इम्रानखान यांचा पक्ष एका व्यक्‍तीच्या, म्हणजे त्यांच्या स्वत:च्या नेतृत्वावर उभा आहे. या पक्षाला सुस्पष्ट राजकीय तत्वज्ञान नाही. आज इम्रानखान लष्कराच्या मदतीने सत्तेवर आलेले आहेत. लष्कराला नवाझ शरीफ डोईजड झाले होते. लष्कराला बिलावल भुत्तोच्या पक्षावर विश्‍वास वाटत नव्हता. म्हणून त्यांनी इम्रान खान यांना हाताशी धरले असे उघडपणे बोलले जाते.

याचा साधा अर्थ असा की, पंतप्रधान इम्रानखान लष्कराच्या इशाऱ्याप्रमाणे कारभार करतील व सतत भारताच्या विरोधात भूमिका घेत राहतील. त्या अर्थाने बघता इम्रान खान पंतप्रधान होणे भारताच्या दृष्टीने तितकेसे हितावह नाही. नवाझ शरीफ जरी सुरूवातीला लष्कराच्या मदतीनेच राजकारणात वर चढले तरी लवकरच त्यांना स्वतःचा आवाज सापडला. त्यांनी कारगीलची कारवाई करणाऱ्या लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना सन 1999 मध्ये बडतर्फ करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांना इतर लष्करी अधिकाऱ्यांची साथ लाभली नाही व उलट मुशर्रफ यांनीच त्यांना बडतर्फ केले होते. हा इतिहास तसा बोलका आहे. आतासुद्धा जेव्हा नवाझ शरीफ सन 2013 मध्ये दणदणीत बहुमत जिंकून पंतप्रधान झाले, तेव्हापासून लष्कराने त्यांच्या विरोधात पद्धतशीरपणे मोहिम राबवून त्यांना राजकारणातून हद्दपार केले व इम्रानखानचा मार्ग मोकळा केला.

या वातावरणात इम्रानखान यांचे अभिनंदन करतांना व त्यांना शुभेच्छा देतांना पाकिस्तानातील या बदलाचे दूरगामी बदल भारतीय नेते लक्षात ठेवतील अशी आशा आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)