चर्चा: भारतात शुद्ध-स्वच्छ दुधाला वाव 

राहुल उप्पल 

भारतातील दूध म्हणजे अन्नपदार्थांमधला सर्वात शुद्ध प्रकार आणि निसर्गाने मानवजातीला दिलेली सर्वाधिक मौल्यवान गोष्ट म्हणून बघितले जाते. आजच्या जीवनशैलीमध्ये शुद्ध दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठही खूप स्पर्धात्मक बनत आहे. गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनाच्या 18.5% दूध उत्पादन करून भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देशांपैकी एक म्हणून उदयाला येत आहे. 

2017 च्या एडलवीज अहवालानुसार, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि ग्राहकवादाला असलेली वाढती पसंती यानुसार 2020 पर्यंत भारतातील डेअरी उद्योगाची वार्षिक 15% वाढ अपेक्षित आहे. अशा प्रकारची वाढती मागणी आणि स्पर्धा लक्षात घेता दुधात रसायनांची भेसळ करण्यासारख्या प्रकारातून आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची दाट शक्‍यता या उद्योगात आहे.

भारतात मोठाली कुरणं, शेतं आहेत आणि बहुतांश खरेदी ही त्यावर अवलंबून आहे; तर विकसित देशांत विशिष्ट प्रकारच्या कॉर्पोरेट डेअरी कुरणांमध्ये ते काम करतात. भारतात 80% दूध उद्योग असंघटित पातळीवर कार्यरत आहे तर बाकीचे तयार होणारे रोजचे 20% दूध पाश्‍चराईज केले जाते आणि संघटित माध्यमातून पोहोचवले जाते. सरासरी एक किंवा दोन गाई किंवा म्हशी असलेल्या ग्रामीण भागातील लाखो छोट्या छोट्या दूध उत्पादकांकडून दुधाचा पुरवठा होतो.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दूध संकलन. स्थानिक उत्पादकांकडून विक्रेते दूध संकलित करतात आणि ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांची विक्री करतात. दुधाचे हे वहन, या प्रवासावरून एक गोष्ट लक्षात येईल की, जिथे खूप मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन होते आणि आरोग्यासाठीचे मूलभूत निकष पाळले जात नाहीत, तिथे भेसळ होण्याचा धोका वाढतो. अनेक मध्यस्थ घटकांमुळे हे दूध वापरायला अयोग्य बनते आणि अशावेळी ही पुरवठा साखळी अकार्यक्षम ठरते. खरं सांगायचं झालं तर पाश्‍चराईज न केलेल्या आणि गार (चिल्ड) नसलेल्या 80% दुधामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि मुदतीचा ताप म्हणजेच विषमज्वर (टायफॉइड) सारखे आजार दूषित दुधामुळे होऊ शकतात.

फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने 2012 मध्ये 33 राज्यांत एक सर्वेक्षण केले होते. त्यांच्या निष्कर्षानुसार 1,791 दूध नमुन्यांपैकी तपासणी केल्यावर 68.4% दूध दूषित असल्याचे आढळून आले. शहरी भागांमध्ये 70% तर ग्रामीण भागांत 31% दुधामध्ये भेसळ दिसून आली. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक मुद्द्याच्या अनुषंगाने शुद्ध दुधाची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.

शुद्ध दूध निर्मिती व पुरवठा उपाययोजना 

या उद्योगात शुद्ध आणि आरोग्यदायी दुधासाठी प्राण्यांचे आरोग्य ही अत्यंत आवश्‍यक गोष्ट असते. प्राण्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करणारा योग्य शिक्षण घेतलेला प्रशिक्षित आणि तज्ज्ञ पशुवैद्य नेमणे महत्त्वाचे असते. लसीकरणापासून डिवर्मिंगपर्यंत नियमितपणा ठेवल्यास गुणवत्ता टिकून राहायला मदत होते.

आजच्या काळात ग्राहकांची जागरूकता आणि मागण्या वाढत असताना मुख्य भर प्रत्येक पातळीवर गुणवत्ता राखण्यावरच असायला हवा. कुरण ठरवण्यापासून दूध प्रक्रिया, पॅकेजिंग आणि दूध पुरवठा अशा प्रत्येक पातळीवर खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी किंवा दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची नियमित आरोग्य तपासणी झालीच पाहिजे. चांगल्या आरोग्यपूर्ण सवयींचा अंगीकार केल्यास दूध काढताना ते खराब होण्यास प्रतिबंध होऊ शकेल. दूध काढण्याची प्रक्रिया हातांपेक्षा दूध काढणाऱ्या यंत्रांनी पार पडली तर ते तांत्रिकदृष्ट्य्‌ा प्रगत आणि अधिक आरोग्यपूर्ण ठरेल.

दूध काढण्याच्या यंत्रांमुळे प्रभावीपणे दूध काढणे शक्‍य होते. यामध्ये वेळेची बचत होते. धूळ किंवा बाह्य पदार्थ मिसळू शकत नसल्यामुळे शुद्ध दूध मिळते. दूषित हाताचा संपर्क टळतो. तसेच अधिक वेगाने दूध गार करता येऊ शकते. त्यामुळे दुधाची चव ताजी राहायला मदत होते. शेतातील व्यवस्थापनाच्या या चांगल्या सवयींच्या जोडीला रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण उपाययोजना अंगीकारल्या जायलाच पाहिजेत. खुली शेती, गायींना कोणत्याही बाह्य संप्रेरकांचा पुरवठा न करणे, गायींना नुकताच तोडलेला ताजा, हिरवा चारा खायला देणे आणि दूध काढण्याच्या आरोग्यपूर्ण उपाययोजना राबविणे या गोष्टी यामध्ये खूपच महत्त्वाच्या आहेत.

ताज्या दुधाचा पुरवठा होत आहे का याची खात्री करण्यासाठी दूध प्रक्रिया आणि पॅकेजिंग या दोन्ही गोष्टीही तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. दुधाला योग्य तापमानाला ठेवणे, पाश्‍चराइज आणि एकजिनसी करणे आणि मग पुन्हा दूध ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत 4 अंश सेल्सिअस या योग्य तापमानात ठेवण्याची खबरदारी घेणे या सगळ्या गोष्टींचा दूधप्रक्रियेमध्ये समावेश होतो. जोडीला, दूध काढल्यापासून 24 तासांच्या आत जर ते ग्राहकापर्यंत पोहोचत असेल तर त्या दुधात कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह घालण्याची गरज पडत नाही. पॅकेजिंगच्या विविध पद्धती आहेत पण “गेबल टॉप’ ही पद्धत सर्वाधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक समजली जाते. कोणत्याही कागद गिरणीत तो पाठवता येऊ शकतो आणि घरातून कागदाचा कचरा म्हणून वेगळा करता येऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण कमी व्हायला आणि पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करायला हातभार लागतो. अशा प्रकारे या उपाययोजनांमुळे विशेषकरून ग्राहककेंद्री युगात आरोग्यपूर्ण दुधाची मागणी वाढत असताना भारतात शुद्ध दूध मिळण्याची संधी अखेरीस वाढीला लागू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)