चर्चा पुरुष आयोगाची ! (भाग-२)

महिला आयोगाप्रमाणेच आता पत्नीपीडित पुरुषांसाठी “पुरुष आयोग’ स्थापन करावा, असा प्रस्ताव पुढे आला आहे. उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दोन खासदारांनी ही मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर या मागणीला पाठिंबा मिळवण्यासाठी येत्या 23 सप्टेंबरला दिल्लीत एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सुधारणेस महिलांचा विरोध होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषाला आपल्याविरुद्धची तक्रार खोटीच आहे, अशी सुरुवात करून बचावाची संधी मिळू शकते. एकंदरीत ही एक गुंतागुंतीची बाब आहे आणि कायद्याचा कोण सदुपयोग करेल आणि कोण दुरुपयोग करेल, हे सांगणे सोपे नाही.

चर्चा पुरुष आयोगाची ! (भाग-१)

उत्तर प्रदेशातील घोसी आणि हरदोई मतदारसंघाचे भाजप खासदार अनुक्रमे हरी नारायण राजभर आणि अंकुश वर्मा यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी संसदेत केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या विविध कायद्यांचा दुरुपयोग करून पुरुषांचा होणारा छळ रोखण्यासाठी अशा आयोगाची गरज असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले.

हे दोन खासदार आपल्या या मागणीला समर्थन प्राप्त करण्याच्या हेतूने राजधानी दिल्लीत 23 सप्टेंबर रोजी एक कार्यक्रमही आयोजित करणार आहेत. हरी नारायण राजभर यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांचाही पत्नीकडून छळ होऊ शकतो. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात अनेक मंच आणि कायदे तयार करण्यात आले आहेत; परंतु पत्नीपीडित पुरुषांची व्यथा ऐकून घेण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी एकही व्यासपीठ उपलब्ध नाही. आपल्या मागणीनुसार पुरुष आयोगाची स्थापना झाली तर कायद्यांचा दुरुपयोग करणाऱ्या महिलांविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारींची सुनावणी या आयोगाने करावी, असे या दोन खासदारांचे म्हणणे आहे. राजभर म्हणतात, “प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक स्त्री चुकीचा किंवा चुकीची असते असे नाही; परंतु एकमेकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती स्त्री-पुरुष दोघांमध्ये दिसून येतात. त्यामुळेच पुरुषांची व्यथा ऐकण्यासाठी एक व्यासपीठ हवेच. पुरुष आयोगाची स्थापना हा योग्य पर्याय ठरेल.”

अंकुश वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, “संसदेच्या स्थायी समितीपुढे मी हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच भारतीय दंडसंहितेच्या कलम 498-अ मध्ये दुरुस्ती करण्याची मागणीही केली आहे. हे कलम पुरुषांवर अन्याय करण्याचे एक शस्त्र ठरले आहे.” त्यांच्या मते, याच कारणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या ऑनलाइन तक्रारींच्या प्रणालीत पुरुषांना आपली बाजू मांडण्यासाठी एक विन्डो तयार करण्याची सूचना केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे. अशा प्रकारच्या सुधारणेस महिलांचा विरोध होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषाला आपल्याविरुद्धची तक्रार खोटीच आहे, अशी सुरुवात करून बचावाची संधी मिळू शकते, हे आपल्याला ठाऊक असल्याचेही मनेका गांधी यांनी सांगितले आहे. एकंदरीत ही एक गुंतागुंतीची बाब आहे आणि कायद्याचा कोण सदुपयोग करेल आणि कोण दुरुपयोग करेल, हे सांगणे सोपे नाही. एक मात्र खरे, की पत्नीकडून छळ होत असलेले पती अस्तित्वात आहेत आणि त्यांची संख्याही बरीच असू शकते, हे वास्तव नाकारून चालणार नाही. कोणीही कायद्याचा गैरवापर करू शकणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करणे हेच या विषयातील मोठे आव्हान असून, तीच गरजही आहे.

– व्ही. के. कौर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)