चर्चा पुरुष आयोगाची ! (भाग-१)

महिला आयोगाप्रमाणेच आता पत्नीपीडित पुरुषांसाठी “पुरुष आयोग’ स्थापन करावा, असा प्रस्ताव पुढे आला आहे. उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दोन खासदारांनी ही मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर या मागणीला पाठिंबा मिळवण्यासाठी येत्या 23 सप्टेंबरला दिल्लीत एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सुधारणेस महिलांचा विरोध होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषाला आपल्याविरुद्धची तक्रार खोटीच आहे, अशी सुरुवात करून बचावाची संधी मिळू शकते. एकंदरीत ही एक गुंतागुंतीची बाब आहे आणि कायद्याचा कोण सदुपयोग करेल आणि कोण दुरुपयोग करेल, हे सांगणे सोपे नाही.

आपल्या देशात शतकानुशतके पुरुषप्रधान समाजरचना अस्तित्वात आहे. आजही महिलांना कुटुंबात आणि समाजात दुय्यम स्थान दिले जाते. काही अंशी परिस्थिती बदलत असली, तरी महिला मोठ्या प्रमाणावर दबलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. कौटुंबिक हिंसेपासून हुंडाबळीपर्यंत आणि अत्याचारांपासून विनयभंगांपर्यंत अनेक गुन्हे महिलांच्या बाबतीत घडत असतात. महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी देशात अनेक कायदे आणि यंत्रणा निर्माण करण्यात आल्या असून त्यांचा आधार घेऊन महिला आपल्यावरील अन्याय दूर करू शकतात; परंतु केवळ महिलाच “पीडित’ असतात, असेही नाही. अनेक घरांमध्ये पुरुषही “पीडित’ ठरू शकतात. त्यांच्यावरही अन्याय होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो. पत्नीकडून छळ होणाऱ्या पतींची संख्याही समाजात बऱ्यापैकी आहे. छळाच्या बाबतीत महिलांसाठी “हेल्पलाइन’सह सर्व सुविधा असतात. मदतीसाठी महिला या “हेल्पलाइन’चा आधार घेताना दिसतात; परंतु या “हेल्पलाइन’ मध्ये केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांच्याही तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांकडून वाईट वागणूक मिळणारे पुरुष “आम्हाला वाचवा,’ असा धावा करीत हेल्पलाइनची मदत घेताना दिसतात. अनेक शहरांमध्ये पत्नीपीडित पुरुषांच्या संघटनाही स्थापन होत आहेत. या मंचावर एकत्रित येऊन पुरुष आपली व्यथा शेअर करीत आहेत.

सामान्यतः पुरुषांच्या पत्नीबाबतच्या तक्रारी मोजक्‍या प्रकारच्या असतात. आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी पत्नी दबाव आणते, हिंसक होते, मारहाण करते, जेवण देत नाही, घरातील व्यक्तींशी चांगले वागत नाही तसेच शरीरसंबंधास नकार देते, अशा स्वरूपाच्या या तक्रारी असतात. एका अंदाजानुसार, 1998 ते 2015 या कालावधीत महिलांवरील अन्यायाविरुद्ध असलेल्या भारतीय दंडसंहितेच्या कलम 498-अ अन्वये 27 लाखांहून अधिक पुरुषांना अटक करण्यात आली. अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारींमध्ये चौकशीअंती तथ्य नसल्याचे समोर येते, असा अनुभव आहे. या कलमांतर्गत शिक्षा होण्याचे प्रमाणही अत्यल्प असून, अनेकदा आपल्याला निष्कारण गोवण्यासाठी पत्नीने या कलमाचा दुरुपयोग केला, अशी तक्रार पुरुष करतात.

चर्चा पुरुष आयोगाची ! (भाग-२)

– व्ही. के. कौर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)