चर्चा : दूरसंचार कंपन्याची मनमानी आणि तक्रारी   

जयेश राणे 

फोनवर बोलत असतांना कॉल खंडित होणे, इंटरनेट सावकाशपणे चालणे, फोन न लागणे म्हणजे फोन करत असलेल्या व्यक्तीचा क्रमांक वारंवार संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश ऐकू येणे, अशा प्रमुख कारणांमुळे मोबाईलचा वापर करणारे ग्राहक त्रस्त असतात. त्यांचे निवारण करणे संबंधित दूरभाष सेवा पुरवठादार आस्थापनाचे दायित्व असते; कारण ग्राहक आस्थापनाच्या त्याला परवडणाऱ्या योजनेचे शुल्क भरून सेवेचा उपयोग करत असतो. सेवेत अडथळे येतात म्हणून कोणतेही आस्थापन चालू योजनेचा कालावधी वाढवून देत नाही. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी मुंबईत विवाहानिमित्त नुकतेच स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानीही कुटुंबासह आले होते. प्रसारमाध्यमांसमोर अंबानी येताच एका छायाचित्रकाराने ‘सर, जिओ चालत नाही’, असे ओरडून त्यांना सांगितले आणि तेथील सर्व हसू लागले; मात्र अंबानी उत्तर न देताच तेथून निघून गेले. ‘कर लो दुनिया मूट्ठी में’ हे वाक्‍य आणि अंबानी या दोन्ही गोष्टी देशातील जनतेला आजही स्मरणात आहे. या दुनियेतीलच एकाने मुकेश अंबानी यांना सर्वांसमक्ष लक्ष्यवेध केलेले ते सूत्र कायमस्वरूपी लक्षात राहील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘आपल्याला होत असलेल्या असुविधेविषयी क्षमा मागतो’, असे ठोकळेबाज उत्तर देऊन मोबाईल कंपन्या ग्राहकाचा संताप शांत करण्याचा आटापिटा करतात. ग्राहक योजनेचे पूर्ण शुल्क भरतो, तरीही त्याला अपूर्ण सेवा मिळणे हा ग्राहकावरील अन्यायच होय. याचा सामना त्या छायाचित्रकाराला करावा लागला आहे, हे त्याने उपस्थित केलेल्या सूत्रावरून अधोरेखित होते. या छायाचित्रकाराने अनेक ग्राहकांच्या वतीने “मन की बात’ बोलून दाखवली आहे. “जिओ’च्या सेवेविषयी घेतलेल्या अनुभवाप्रमाणे अन्य दूरसंचार आस्थापनांच्या सेवेविषयीही ग्राहकांना ज्या असुविधांचा सामना करावा लागत आहे, त्याकडे सर्वच दूरसंचार आस्थापनांनी लक्ष दिले पाहिजे. आपसांतील
स्पर्धेत ग्राहकाची कुचंबणा होऊ देऊ नये.

जिओच्या विविध कार्यक्रमांचे (वार्षिक सभा) औचित्य साधत मुकेश अंबानी विविध योजना घोषित करत असतात. त्यामुळे जिओ म्हटले की मुकेश अंबानी यांचेच नाव समोर येते. यांचे जेष्ठ पुत्र आकाश हे जिओचे धोरणविषयक प्रमुख आहेत. या दोघांनीही कंपनीच्या सेवेकडे बारकाईने लक्ष देण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. एका मोठ्या कार्यक्रमात सर्वांसमोर फजिती करणारा प्रश्‍न विचारला जाणे मुकेश अंबानी यांच्यासाठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशा प्रकारचा प्रश्‍न जाहीरपणे आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही दूरसंचार कंपनीच्या प्रमुखाला विचारलेला नाही. त्यामुळे या प्रश्‍नाची देशभर विशेष चर्चा झाली.

जिओचे देशात कोट्यवधी ग्राहक असले, तरी त्यांपैकी सडेतोडपणे अडचण मांडणारे ग्राहक कसे आणि कुठे असू शकतात, हे अंबानी यांना कळले असेलच! खरं तर तो एक विवाहाचा स्वागत समारंभ होता. ती अंबानी यांनी कोणत्याही घोषणेसाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद नव्हती, तरीही तेथे मोबाईल सेवेविषयी त्रास होत असलेला प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्याचे अंबानी यांनी स्वागतच करायला पाहिजे; कारण आपल्या कंपनीच्या दूरभाष सेवेची मुंबईतील स्थिती काय आहे, हे थेट त्यांना कळले आहे. आता यावर तात्काळ चिंतन करून चूका सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत ग्राहकांना दिलासा दिला पाहिजे. असे केल्यास ग्राहकच त्यांना सांगतील की, जिओची सेवा उत्तम आहे ! पण त्यासाठी पुष्कळ मेहनत घ्यावी लागणार आहे.

ग्राहक वापर करत असलेल्या मोबाईलच्या सेवेत काही अडचणी येत असल्यास ग्राहक ‘ग्राहक साहाय्यक कक्षा’ला संपर्क करून अनुभवावी लागत असलेली अडचण सांगतो. ही प्रक्रिया कशी पार पाडावी? याविषयी सर्व ग्राहकांना माहिती नसते. त्यामुळे अशा ग्राहकांनाही ज्या तक्रारी असतात त्याही लक्षात घेतल्यास तक्रारींचा आकडा नक्कीच मोठा असणार यात दुमत नाही.

सध्याच्या काळात मोबाईल, इंटरनेट या अत्यावश्‍यक गोष्टी आहेत. त्यामुळे योग्य ते शुल्क भरूनही चांगली सेवा मिळत नसेल, तर त्या संदर्भात रीतसर आवाज उठवण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. मात्र या सर्व गोष्टी करण्यासाठी नागरिकांना धावपळीच्या जीवनात वेळ नसल्याने त्या मार्गावर फार अत्यल्प मंडळी जातात. ग्राहकांना योग्य सेवा मिळत असल्यावर ग्राहक त्याविषयी समाधानी असतात. ग्राहकांचे समाधान हेच कोणत्याही आस्थापनासाठी अंतिम समाधान असते. कारण त्यांच्यावरच आस्थापन अवलंबून असते.

जिओने दोन वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तेव्हापासूनच त्यांनी विविध योजना (प्लान्स) आणून अल्पावधीत कोट्यवधी ग्राहक मिळवले. त्यामुळे अनेक वर्षे दूरसंचार सेवेत असणाऱ्या मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले. आरंभीच्या काळातील ‘जिओ’च्या विनामूल्य सेवेमुळे अनेकांनी त्यावेळी ते उपयोग करत असलेल्या अन्य कंपन्यांच्या सेवेकडे पाठ फिरवली. या कठीण प्रसंगात टिकाव धरण्यासाठी त्याही कंपन्या जिओप्रमाणे सेवा देण्याच्या योजना ग्राहकांसाठी आणाव्या लागल्या. कॉल, इंटरनेट यांच्या उपयोगासाठी परवडणाऱ्या योजना आणाव्या लागल्याने त्याचा ग्राहकांना लाभ झाला.

जिओच्या सुविधेच्या सूत्राला जोडून ‘बीएसएनएल’ या दूरसंचार क्षेत्रातील सरकारी आस्थापनाच्या सेवेविषयी बोलणेही अनिवार्य वाटते. देशातील ग्रामीण भागात ‘बीएसएनएल’ची सेवा वापरणारे ग्राहक मोठ्याप्रमाणावर आहेत. त्याविषयीही असंख्य तक्रारी आहे. जेथे सुविधा व्यवस्थित आहे तेथे ठीक आहे. पण जेथे आजही ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत त्यांचे काय? नेटची सुविधा नसेल तर बॅंकांचे व्यवहार ठप्प होतात. त्यांना काही किलोमीटर अंतरावरील त्यांच्या अन्य शाखेत जाऊन जे काम करणे शक्‍य असते, ते करावे लागते. यामध्ये बॅंक, ग्राहक यांचा अमूल्य वेळ वाया जातो. नेटच्या असुविधेमुळे ‘एटीएम’च बंद असल्यामुळे तातडीने पैसे हवे असणाऱ्यास तेथून रिकाम्या हाताने परतावे लागते. या असुविधेमुळे रणरणत्या उन्हात बॅंक, एटीएम यांच्याकडे आशेने येणाऱ्या विशेषता वयस्कर मंडळींचे हाल, निराशा पाहवत नाही. ‘बीएसएनएल’ आपल्या सेवेत सुधारणा करण्याविषयी खरच गंभीर आहे का, असा प्रश्‍न निर्माण होतो.

दूरसंचार क्षेत्रापासून ग्राहकांना लाभ होण्याचे, हे एकमेव उदाहरण आहे. सेवेचा विस्तार जसा वाढत जातो तसे ती देण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनाही असली पाहिजे. ‘पुढचं पाठ मागचं सपाट’, अशी हास्यास्पद स्थिती होता नये. असे होणे म्हणजे कमकुवत नियोजनाचे ठळक उदाहरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)