चर्चा: …तरीही फटाके का वाजवायचे?

file photo

जयेश राणे

क्षणिक नेत्रसुखासाठी रंगीबेरंगी दारूकामामुळे कचरा, प्रदूषण यांत जी भर पडते त्याचे दूरगामी परिणाम विशेषतः रुग्ण व्यक्‍तींना नाहकपणे सोसावे लागतात. फटाके वाजवणाऱ्यांचा खेळ होतो. पण त्यांच्यामुळे रुग्णांच्या जीवाचा खेळ होतो, हे मात्र नक्की आणि त्याचा गांभीर्याने विचार होत नाही. एवढा मनुष्य स्वार्थी आणि निर्दयी झाला आहे. शास्त्रानुसार सण-उत्सव साजरे करण्यात जो परमोच्च आनंद आहे, तो सणाच्या वेळी प्रदूषण करून त्याचा विचका करण्यात बिलकूलच नाही.

दिवाळी या प्रकाशाच्या सणास फटाक्‍यांमुळे गालबोट लागत आले आहे. ते या वर्षीपासून मोडीत निघावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. फटाक्‍यांमुळे निर्माण होणाऱ्या प्राणघातक अशा वायूप्रदूषणास या सणाच्या निमित्ताने आग्रहाने आमंत्रणच दिले जाते. राजधानीतील प्रदूषणावरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली की, “दिल्लीच्या चारही बाजूंना 50 लाख किलोहून अधिक फटाक्‍यांचे भांडार आहे. दिवाळीच्या पाच दिवसांत प्रतिदिन 10 लाख किलो फटाके फोडले जातात. दिल्लीत इतके फटाके आहेत की, त्यामुळे संपूर्ण देश भस्मसात होईल.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीत विशेषत: लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवसांना अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन म्हणजे त्या देवतेचीच आपण पूजा करत असतो आणि तिच्या संपन्नतेनंतर अनेकजण फटाके वाजवून पूजनाचा आनंद फटाक्‍यांच्या माध्यमातून व्यक्त करतात. मग मोठा कचरा निर्माण होतो. याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा होतो. कारण काय तर फटाके वाजवण्याच्या हौसेपुढे कुठलाही विचार करायचा नाही. कचरा करून, विषारी वायू पसरवून आणि कानठळ्या बसवणारा आवाज करून जो आनंद व्यक्त केला जातो, त्याने देवतेची केलेली पूजा सफल कशी होणार?

फटाक्‍यांमुळे भाजणे, कायमस्वरूपी अवयव गमवावा लागणे आदी धोके ज्ञात असूनही ते स्वीकारत त्या धोक्‍याच्या मार्गावरून चालणारे स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्‍यात टाकत असतात! त्या फटाक्‍यांची किंमत आणि त्यामुळे गमवाव्या लागणाऱ्या अवयवाची किंमत याची तुलना कदापि शक्‍य नाही. तरीही याचा विचार होताना न दिसणे म्हणजे, हा देह धडधाकट असताना त्याची योग्य ती काळजी घेण्याचा विचारही मनाला स्पर्शू न दिला जाणे होय. मात्र त्याच देहास इजा-दुखापात यांमुळे किती वेदना होतात, याचा वाईट अनुभव घेण्यासाठी एवढा उतावीळपणा का? फटाके फोडण्याच्या अतिरेकाच्या नादात ज्यांना ठेच पोचली आहे ते इतरांना फटाके न फोडण्याचे सांगताना दिसतात. ज्यांनी आपले अवयव गमावले आहेत त्यांच्याकडे पाहून समाजाने सावध होण्यातच शहाणपण आहे.

देशाच्या शहरी भागांत कारखान्यांतून ओकला जाणारा वाहनांचा धूर आदी वायू प्रदूषणाशी निगडीत समस्या तळ ठोकून असतात. प्रतिदिन प्रतिक्षण याच प्रदूषित वातावरणात आपण वावरत असतो. असे असताना विशेषत: शहरी भागातील जनता उत्साहाच्या भरात फटाके फोडून त्या प्रदूषणास पाय रोवून बसण्यास अधिकच वाव करून देते ,हे वास्तव नाकारता येणार नाही. परिणामी इतर आजारांसोबत श्‍वसनासंबंधी आजार जडण्यास शहरातील जनता किती आघाडीवर आहे, याचे आकडे विविध अहवाल सांगतात.

फटाक्‍यांमधून नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, सल्फर डायऑक्‍साइड, कार्बन मोनोऑक्‍साइड असे अतिशय विषारी वायू व घटक बाहेर पडतात. त्यामुळे श्‍वसनाचे विकार जडतातच. पण धमन्यांच्या आतील भागालाही इजा होण्याची शक्‍यता असते. तसेच दिवाळीत ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषण, विषारी वायू आणि तळलेले पदार्थ, गोड पदार्थ हे घटक एकत्र आले तर हृदयविकाराला आमंत्रण मिळत, असे तज्ञ डॉक्‍टर सांगतात.

दिवाळीच्या काळात फटाक्‍यांच्या प्रदूषणाने घरगुती गसही निळ्या ऐवजी लालसर रंग धारण करून वायूप्रदूषणाने किती उंची गाठली आहे, याची पोचपावतीच देतो. प्रदूषणाच्या गर्तेतील परिसरातून वाचण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यापासून कोणाचीही सुटका नाही.

काही वर्षांपासून काही शाळांमधून फटाके न वाजवण्याबाबत उत्तम प्रबोधन केले जात आहे. फटाक्‍यांचे दुष्परिणाम शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती हाच रास्त मार्ग आहे. फटाक्‍यांसाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थी वर्गाच्या प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम म्हणजे फटाक्‍यांसाठीचा पालकांकडील हट्ट न होणे. यामुळे अशा विद्यार्थ्यांकडून निसर्ग रक्षणाचे मोठे पुण्यकर्मच होत आहे.

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत गडकिल्ले बनवणे, संत-राष्ट्रपुरुषांची आत्मचरित्रे अभ्यासणे, मैदानी खेळ खेळणे आदी गोष्टी करून विद्यार्थी मित्र शारीरिक, बौद्धिक समृद्धीत भर पाडून आपले व्यक्तिमत्व अधिक खुलवू शकतात. फटाके का वाजवू नयेत? हे फटाके वाजवणाऱ्यांना शालेय विद्यार्थी सांगताना हल्ली दिसून येते. काही मंडळी त्यांचे म्हणणे ऐकतात, तर काहीजण त्याकडे मस्करी म्हणून पाहून आपले तेच खरे करतात. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले, त्यानंतर त्यांनी त्यांच्यापरीने समाजातील नागरिक, मित्रमंडळी यांचे प्रबोधन केले. म्हणजे प्रबोधनाच्या साखळीमुळे योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचणे चालू राहिले. वयाने लहान असणाऱ्या मुलांकडून पुष्कळ सूत्रं शिकता येतात. फक्त शिकण्याची इच्छा ठेवली पाहिजे. या प्रबोधनाचे उत्तम परिणाम प्रत्यक्षात दिसण्यास काही काळ लागेल. कारण चांगल्या गोष्टींसाठी कायम प्रतीक्षा करावी लागते.

प्रतिवर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता आधीच्या वर्षांपेक्षा अधिक जाणवत आहे. यंदाचा ऑक्‍टोबर महिनाही त्याला अपवाद नाही. “जागतिक तापमान वाढी’शी निगडीत असणारी कारणे आता सर्वांनाच ज्ञात झाली आहेत.

एवढे माहीत असूनही फटाके वाजवले जाणे म्हणजे वायूप्रदूषण आणि उष्णता यांत दिवाळीच्या कालावधीत भर टाकणे होय. वाढीव उष्णतेला अटकाव करण्यासाठी कंबर कसावी तेवढी कमीच आहे, अशी वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने असे म्हणावे लागत आहे की, “जागतिक तापमान वाढी’शी निगडीत सूत्रे भारत वगळता अन्य देश फार गांभीर्याने घेत आहेत. भारतात मात्र ज्यांचा प्रदूषण करण्यात सहभाग नाही, ते ही प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरत आहेत.

भारतीय सैनिक देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. केवळ त्यांच्यामुळेच प्रतिदिन नोकरी-व्यवसाय, शिक्षण आदी कार्यांसाठी बाहेर पडता येत आहे, तसेच सण-उत्सवही साजरे करता येत आहेत. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणाचा आनंद सैनिकांच्या कुटुंबीयांसह साजरा करण्याचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती झाली, तर “समाज आमच्यासोबत आहे’, याचे समाधान सैनिकांच्या कुटुंबीयांना अगणित आंनद देऊन जाईल आणि तो स्मरणातही राहील. समाजाची ही कृती सैनिकांसाठी निश्‍चित प्रेरणादायी असेल. म्हणून न्यायालयाने फटाकेबंदीचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा, आपणच स्वत:हून फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतला पाहिजे, नाही का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)