चर्चा: जपान्यांची क्षमायाचनेची परंपरा महान 

दत्तात्रय आंबुलकर 

काही दिवसांपूर्वी जपानमधील माझदा मोटार कॉर्पोरेशन, सुझुकी मोटार कॉर्पोरेशन व यामाह मोटार कॉर्पोरेशन या जागतिक स्तरावरील मोटार वाहन उद्योगांच्या सर्वोच्च मुख्याधिकाऱ्यांनी तमाम जनतेची जाहीर माफी मागितल्याचे वृत्त सर्वदूर सचित्र स्वरूपात प्रकाशित झाले. कारण? या तिन्ही कंपन्यांच्या वाहनांमध्ये वाहन चालविताना पर्यावरणविषयक नियमांची पुरेशी पूर्तता करण्यात आली नसल्याने त्यासाठी थेट या तिन्ही कंपन्यांच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे जाहीर माफी मागून आपली जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा, ग्राहकांप्रती असणारी भावना व मुख्य म्हणजे जवाबदेही यांचा परिचय केवळ जपानलाच नव्हे तर उभ्या जगाला नव्या संदर्भात करून दिला. 

जपानमधील या कंपन्यांची वाहने मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतानाच जपानच्या माती आणि कार्य-संस्कृतीमध्ये आपले उत्पादन वा सेवा यांच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात वासंदर्भात त्रुटी आढळल्यास त्याची जबाबदारी इतर कुणावरही न टाकता संबंधित कंपनी वा संस्थेतील सर्वोच्च अधिकारी कशा प्रकारे व जबाबदारीच्या भावनेने वस्तुस्थिती व परिस्थितीला सामोरे जातात याचा वस्तुपाठ पण अशा प्रकारे आपल्याला मिळाला असतानाच औद्योगिक, व्यावसायिक, सार्वजनिक सेवासंदर्भात जपानशी संबंधित या आणि अशा महत्त्वपूर्ण व लक्षणीय घटनांचा मागोवा यानिमित्ताने घेणे पण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षीच्या सुरुवातीलाच जपानच्या कोब शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात आलेल्या आम जनतेपुढे जाहीर माफी मागितली. कारण? त्या कार्यालयातील एक आणि एकमेव कर्मचारी भोजन अवकाशानंतर सातत्याने आपल्या कामाच्या ठिकाणी उशिरा येत असे या जाहीर माफीनामा प्रसंगी कोब महानगरपालिकेचे अधिकारी काही मिनिटे जपानी पद्धतीने कमरेपासून वाकलेल्या अवस्थेत होते व या घटनेचे थेट प्रक्षेपण जपानी दूरदर्शनवरून थेट स्वरूपात केले जात होते. एवढेच नव्हे तर या अधिकाऱ्यांनी आमच्या कार्य संस्थेत अशा प्रकारची गैरवर्तणूक घडली असून त्यासाठी आम्ही सर्वांचे क्षमाप्रार्थी आहोत असे जाहीरपणे व सर्वांसमोर दूरदर्शनच्या माध्यमातून नमूद केले.

जपानच्या मॅकडोनाल्डमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये एका ठिकाणी मानवी दाताचा तुकडा आढळून आला. त्यानंतर एका ठिकाणी एक लहान जपानी मुलगा चॉकलेट खात असताना त्यातील प्लॅस्टिकच्या तुकड्याने त्याची जीभ कापली गेली तर मॅक नगेट्‌सच्या एका विक्री केंद्रात चिकनमध्ये प्लॅस्टिकचे तुकडे आढळले. या साऱ्या तक्रारवजा प्रसंगी पण संबंधित कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारचे प्रसंग आणि घटना शून्यवत करणे हेच आमचे व्यावसायिक ध्येय असून आपल्या प्रयत्नांचा तपशील पण वस्तुनिष्ठ स्वरूपात जगजाहीर केला होता, हे उल्लेखनीय आहे.

जपानमधील रेल्वे वाहतूक जवळजवळ संपूर्णपणे म्हणजेच शत-प्रतिशत वक्तशीर राखण्याचा तेथील राष्ट्रीय इतिहास आहे. त्यामुळेच जपानी नागरिक तिथल्या रेल्वेगाड्यांच्या सुटण्याच्या वेळांनुसार आपापली घड्याळे लावतात असे तेथे गमतीने पण गांभीर्याने म्हटले जाते. याच वर्षी वेस्ट जपान रेल्वे कंपनीपुढे मोठा नामुष्कीचा प्रसंग निर्माण झाला. कारण होते कंपनीची एक गाडी चक्क 25 सेकंदाने निर्धारित वेळेपूर्वी सुटली. अधिकृतपणे उपलब्ध माहितीनुसार वेस्ट जपान रेल्वे कंपनीची सुटण्याची निर्धारित वेळ सकाळी 7 वाजून 12 मिनिटे असताना त्या एका विशिष्ट दिवशी प्रत्यक्षात ही गाडी 7 वाजून 11 मिनिटे व 35 सेकंदांनी सुटली. हे सारे त्या रेल्वे गाडीच्या कंडक्‍टरमुळे घडले असले तरी वेस्ट जपान रेल्वे कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी गाडीच्या सुटण्याच्या वेळेच्या संदर्भातील या मुद्द्यावर कुठलाही वेळ न दवडता जाहीर पत्रकाद्वारे आपले प्रवासी व जनतेची माफी मागितली हे विशेष.

तसे पाहता सकृतदर्शनी व प्राथमिक स्वरुपाच्या चुकीबद्दल पण सर्व संबंधितांचीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सर्व समाजाचीच जाहीरपणे माफी मागणे ही बाब आता जपान आणि जपानी जनतेच्या कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकजण या कार्यपद्धती- कार्य संस्कृतीचे तंतोतंत पालन वेळेत, कुठल्याही प्रकारचा वाद न घालता व मुख्य म्हणजे स्वयंस्फूर्तपणे करीत असतो. या कार्यपद्धतीचा गुणात्मक व सकारात्मक परिणाम व प्रभाव जपानच्या व्यावसायिकच नव्हे तर समाज जीवनावर पण सहजगत्या पडलेला दिसतो.

या पार्श्‍वभूमीवर आपल्या दैनंदिन व्यवहार व कामकाजात जाणते अजाणतेपणे काही चूक झाल्यास अथवा त्रुटी राहिल्यास अगदी सर्वसामान्य जपानी माणूस मनःपूर्वक व वेळ न दवडता समोरच्याची वा संबंधितांची माफी मागतो.
व्यावसायिक असो वा वैयक्तिक बाब. आपली चूक झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीत पण मनमोकळेपणे व प्रसंगी जाहीर वा सार्वजनिक स्वरूपात माफी मागण्याची ही जपान आणि जपान्यांची कार्यसंस्कृती त्यांना जागतिक स्तरावर अव्वल बनविण्यासाठी पूरक आणि प्रेरक ठरली आहे व त्यापासून सर्वांनीच प्रेरणा घेण्यासारखी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)