चर्चा: कोळसा किती उगाळणार?

शेखर कानेटकर

पाच महिन्यांत नवे सरकार येण्याची वेळ आली आहे. पण अजून जुन्या सरकारांच्या चुकांचाच पाढा वाचण्याचे काम चालू आहे. कॉंग्रेसने पापे, चुका केल्या हे लोकांना आता माहिती झाले आहे. त्याचा कोळसा उगाळून उगाळून काळा झाला आहे. आणखी तो सततच किती उगाळणार? आता नवीन विधायक, सकारात्मक ऐकायला लोक उत्सुक आहेत. त्यांना पाच वर्षांचा थोडा तरी हिशेब द्या की!

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू आहे. पंतप्रधान मोदी यांना प्रचाराची भाषणे हेच प्रमुख काम असल्याने त्यांची व भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भाषणबाजी चालू आहे. भाषणे करायला कोणाचाही कोणताच आक्षेप असण्याचे कारणही नाही. पण भाषणात नवे काही असेल तर ते जरूर ऐकावेसे वाटते. पण पंतप्रधान गेली पाच वर्षे वाजवून गुळगुळीत झालेली रेकॉर्डच सातत्याने वाजवित असल्याने आता त्यात रटाळपणा आला आहे.

मोदी सरकारला सत्तेवर येऊन साडेचार वर्षे लोटली. नव्या निवडणुकांना जेमतेम चार-पाच महिने राहिल्या आहेत. तरीही मोदी-शहा आणि कंपनी “कॉंग्रेसचा कारभार’, “नेहरू-गांधी घराणे’ यातून बाहेर पडायला तयारच नाहीत. तेच तेच ऐकून लोकांचे कान किटले असतील. सत्तेवर आल्यावर प्रारंभीचा काही काळ ही रेकॉर्ड वाजविणे ठीकही होते. पण मुदत संपत आली तरी तोच कोळसा उगाळला जातच आहे.

सरकारने 2014 पासून काय काय केले, भविष्यात आणखी काय काय योजना आहेत, हे आता ठासून सांगायची वेळ आली आहे. (अगदी वस्तुस्थितीला सोडून आकडेवारी सांगूनसुद्धा!) पण ते न करता तोच तोच आता लोकांना पाठ झालेला कोळसा उगाळला जात आहे. चार-साडेचार वर्षातील सकारात्मक कामगिरी फारशी सांगण्यासारखी नसल्याने विरोधी पक्षांवर, विशेषतः गांधी घराण्यावर, टीका करण्याचे धोरण अवलंबिले जात असावे, असे कोणाला वाटले तर त्यात चूक ते काय? “कॉंग्रेस पक्ष एका (गांधी) घराण्यापुरताच राहिला आहे, त्या पक्षाने गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्यासाठी सीताराम केसरी यांना कॉंग्रेसने फूटपाथवर आणले…’ अशी टीका मोदी-शहा यांनी छत्तीसगडमध्ये बोलताना केली आहे.

एकतर पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हे ठरविण्याचा अधिकार हा त्या पक्षाला असतो. त्यांनी गांधी परिवारातील एकाची निवड केली तर इतरांनी त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. कॉंग्रेस पक्षाचे आजवर 60 अध्यक्ष झाले, त्यातील फक्त 6 अध्यक्ष नेहरू-गांधी घराण्यातील होते, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी अलीकडेच दिली आहे. पण त्याकडे मोदी-शहांप्रमाणेच माध्यमांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

भाजपच्या सुरुवातीच्या काळात वाजपेयी-अडवाणी सलग नाही पण आलटून पालटून अध्यक्ष होतेच होते. व्यंकय्या नायडू, बंगारू लक्ष्मण, जनकृष्णमूर्ती, राजनाथ सिंह, कुशाभाऊ ठाकरे, गडकरी अध्यक्ष झाले. पण मुख्य निर्णय वाजपेयी-अडवाणी यांचाच असे. गांधी परिवारावर टीका होत असली, तरी भाजपनेसुद्धा संघ परिवाराबाहेरचा अध्यक्ष कधी केलेला दिसत नाही. त्यामुळे कॉंग्रेस गांधी परिवाराला तर भाजप संघ परिवाराला धरून आहे, असे म्हणता येऊ शकले. आज कॉंग्रेस फक्‍त गांधी घराण्याच्या तालावर नाचतो, हे जसे खरे आहे, तसे भाजप आज फक्त मोदी-शहा यांच्याच इशाऱ्यावर चालतो, असे म्हणता येऊ शकते. गांधी घराण्याने पक्षातील इतर नेतृत्व स्वतःपेक्षा मोठे होऊ दिले नाही, हे खरे आहे. पण मोदी तरी भाजपमधील नव्या-जुन्या नेत्यांपैकी कोणाला मोठे होऊ देत आहेत हा प्रश्‍न आहेच.

“दलित सीताराम केसरी यांना कॉंग्रेसने अयोग्य प्रकारे पक्षाध्यक्षपदावरून काढले, फूटपाथवर आणले, ते फक्त सोनिया गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी,’ असे ताजे विधान मोदी यांनी केले आहे. कॉंग्रेस दलितविोधी कसा आहे, हे दाखवून देण्यासाठी सुमारे 20 वर्षांपूर्वी उकरून काढलेला दावा त्याचा मतदारांवर किती परिणाम होईल हा भाग वेगळा. पण आता केसरी दलित नव्हतेच, इतर मागासवर्गीय (ओबीसी) होते, अशी माहिती पुढे आली आहे. अपुऱ्या माहितीअभावीही रेटून बोलायचे, हे मोदींबद्दलचे आणखी एक ताजे उदाहरण.

केसरी यांना हटविल्याचे मोदी आवर्जून सांगतात. पण पंतप्रधान होण्यासाठी मोदी आणि त्यांच्या कंपूने पक्षाचे “भीष्माचार्य’ लालकृष्ण अडवाणी यांना कसे अडगळीत टाकले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी-राहुल गांधी यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची छाती नाही तीच स्थिती आज भाजपमध्ये मोदी-शहा यांच्याबाबतीत आपण पाहातच आहोत.

“कॉंग्रेसच्या रक्‍तातच लबाडी आहे, त्यांनी लोकांची सतत दिशाभूलच केली. पण भाजप मात्र विकासालाच प्राधान्य देत आहे,’ असे मोदी सांगत आहेत. पण कॉंग्रेसने बरेवाईट केले, तेच भाजप आज करीत आहे. “सबका साथ सबका विकास’ ही दिशाभूलच होती. कारण साडेचार वर्षात विकास काही झाला नाही, म्हणूनच आता इतकी वर्षे बासनात पडलेल्या राममंदिराचा धावा सुरू आहे. ही दिशाभूलच नाही का?

स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत कॉंग्रेसने केलेल्या चुका आणि पापांचा हिशेब भाजपचे नेते आज मागत आहेत. पण गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच चुका, पापे विद्यमान सरकार करताना दिसते. सीबीआय निवडणूक आयोग, रिझर्व्ह बॅंक आदी संस्था कमकुवत करण्याचे काम पद्धतशीर सुरू आहे. गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही पाच वर्षात करणार असे सांगितले जात होते. पण पाच वर्षांत त्या 60-70 वर्षांतील चुकांचीच पुनरावृत्ती होताना दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
115 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)