#चर्चा: कायम पर्यावरणपूरक वस्तूंचाच उपयोग करूया ! 

जयेश राणे 
निसर्गनिर्मित पर्याय स्वीकारून त्याप्रमाणे वाटचाल करून आपण पर्यावरणाचा समतोल राखूया, हा विचार करणे अनिवार्य झाले आहे. असा विचार केला तरच सर्व सण-समारंभ सुसह्य होणार आहेत. 
गणेशोत्सव चालू होण्यास अल्प अवधी राहिला आहे. बाप्पाच्या आगमनाची सिद्धता सर्वत्र चालू आहे. या तयारीत सजावट, पूजाविधी, यावेळी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आदी गोष्टींची तयारी महत्त्वपूर्ण असते. यावेळी प्रसाद आणि महाप्रसाद देण्यात येत असतो. तो देण्यासाठी सुपारीच्या पानांच्या डिश आणि द्रोण यांचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा प्रसाद आणि महाप्रसाद यांचे वाटप कसे करायचे, याची चिंता मिटली आहे. खरे तर हा पर्याय जुनाच आहे. पण थर्माकोलच्या डिश, द्रोण यांच्या वापरामुळे त्याचे अनेकांना विस्मरण झाले होते. त्यामुळे हा पर्याय थर्माकोलपुढे “झाकोळ’ला गेला होता. शिवाय कागदी डिश, द्रोण यांचा पर्याय आहेच.
पाण्यामध्ये यांचे सहजपणे विघटन होते. त्यामुळे असे पर्याय पर्यावरण पूरक असल्याने अधिकाधिक नागरिक याचा स्वीकार करून उपयोगही करतील. पत्रावळी बनवण्यासाठी म्हणून कुडाच्या पानांचा उपयोगही करण्यात येत असतो. याचे झाड कोकण प्रांतात अधिक करून आढळते.
सण-उत्सव, विविध गोष्टींसाठी करण्यात येणारी पूजा आदी कार्यावेळी अन्नदानाच्या सूत्रास विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान करतो. आता हे अन्नदान प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या डिशमधून करता येणार नसल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदतच होणार आहे. असे निर्बंध नसते तरीही आपल्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या विविध झाडांच्या पानांपासून बनवलेल्या डिश, द्रोण यांचा उपयोग होऊ शकला असता. पण आजच्या ‘झटपट’ युगात तो पर्याय नगण्य मंडळींकडून उपयोगात आणला जात होता. म्हणजेच थर्माकोलसारख्या अविघटनशील घटकाचा उपयोग चालू ठेवून पर्यावरणाची हानीच पुष्कळ प्रमाणावर चालू होती.
काही लघुउद्योजक नाष्टा, आईस्क्रीम वगैरे देण्यासाठी आजही विशिष्ट पानांचा डिश म्हणून आवर्जून उपयोग करतात. विशेषतः आईस्क्रीमविषयी त्या पानांची विशेषतः म्हणजे त्यांच्याकडून आईस्क्रीम घेऊन त्या पानातून इच्छितस्थळी घेऊन जाईपर्यंत 30-45 मिनिटे लागली, तरी आईस्क्रीम अजिबात विरघळत नाही. यावरून त्या पानाचा एखादा बर्फ स्वरूपातील थंड पदार्थ काही कालावधी त्याच्या मूळ स्वरूपाप्रमाणे जतन करून ठेवण्याचा भाग लक्ष वेधून घेतो. जे लघुउद्योजक प्रतिदिन या गोष्टींचा उपयोग करतात त्यांच्यासाठी हा पर्याय निश्‍चितच लाभदायी आहे, असे म्हणता येईल.
जर उद्योजक या समर्थ पर्यायाचा उपयोग करत आहेत, तर आपण जेव्हा कधीतरी कार्यक्रम आयोजित करत असतो, तेव्हा डिश, द्रोण आणि पाण्याचे ग्लास यांच्यासाठी अशा नैसर्गिक गोष्टींचा उपयोग सहजपणे करू शकतो. कदाचित श्रीमंत मंडळींना हा पर्याय त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा असा वाटणार नाही. पण येथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की, “जुनं तेच सोनं’ असते. काळाच्या ओघात जे नवीन पर्याय उपयोगात आणले जातात आणि त्यांच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे लक्षात येते, तेव्हा पुन्हा जुन्या पर्यायांकडेच वळावे लागते, हे सध्याच्या बुद्धिजीवी मंडळींनीही लक्षात घेतले पाहिजे आणि निःसंकोचपणे पानांपासून बनवलेल्या पत्रावळीचा उपयोग केला पाहिजे.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा आणि सभोवतालच्या प्रदेशात केळीचे उत्पादन विपुल प्रमाणावर होते. अखंड राज्याची केळ्यांची आवश्‍यकता यातून पूर्ण होते. मात्र, केळीच्या पानांचा उपयोग म्हणावा तसा होत नाही. त्याचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांत त्या पानांचा उपयोग अधिक प्रमाणावर केला जातो. त्यांच्या ‘जेवणावळी’त केळीचे पान हमखास वापरले जातेच. त्यामुळे भारताच्या दक्षिण भागामध्ये निसर्गनिर्मित गोष्टीचा उपयोग पुरेपूरपणे फार आधीपासून आजपर्यंत कसा होत आहे, हे सर्वासाठी नक्‍कीच अनुकरणीय आहे. चांगल्या गोष्टींचे तत्काळ अनुकरण होणे आवश्‍यक आहे. केळीच्या पानात जेवताना वेगळेच समाधान लाभते, हे समाधान थर्माकोलच्या डिशमध्ये जेवताना कुणालाही मिळालेले नसणार, याची खात्री आहे. कारण त्या रासायनिक घटकाची स्वत:ची अशी अंगभूत चवच नाही, तर त्यातून वेगळी चव अनुभवण्याचा प्रश्‍नच नाही.
इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या माध्यमातून चीनने भारतीय बाजारपेठ आपल्या ताब्यात घेऊन येथील लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. रक्षाबंधनच्या राख्यांपासून ते दिवाळीच्या कंदिलांपर्यंतचे साहित्यही “चीन’मधून येते. आता महाराष्ट्रात थर्माकोल, प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे त्यासाठी नक्‍कीच ते समर्थ पर्याय शोधून काढून येथील ग्राहकांना त्याची भुरळ पाडतील. मात्र यास बळी न पडणेच देशहिताचे आहे.
हे सूत्र येथे उपस्थित करण्याचे कारण असे की, महाराष्ट्रात गणेशोत्सव व्यापक प्रमाणावर साजरा करण्यात येतो. त्यासाठी प्रतिवर्षी कोणत्या वस्तू उपयोगात आणल्या जातात याची बित्तंबातमी चिनी उत्पादकांना असणार यात शंका नाही.
स्वतःच्या आर्थिक लाभासाठी भारतीय सणांची माहिती त्यांनी कशाप्रकारे ठेवली आहे, हे येथे त्या त्या सणांपूर्वी दखल होत असलेल्या साहित्यावरून कळते. सजावट आणि प्रसाद, महाप्रसाद वाटप यांतून थर्माकोल हद्दपार झाले आहे. त्यामुळे थर्माकोलला पर्यायी चीनी वस्तू बाजारात दिसल्या तरी त्यांच्याकडे पाठ फिरवणेच रास्त ठरणार आहे. सण-उत्सव इथल्या मातीचा आणि त्याआडून नफा मिळवण्याचा आटापिटा चीनींचा.
राज्यात थर्माकोल आणि प्लॅस्टिक यावर बंदी असल्यामुळे त्यांना पर्याय कोणते याचा विचार करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. अन्यथा पूर्वीप्रमाणेच त्यांचा उपयोग चालू राहून यंदाही पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास अनेकांनी हातभार लावला असता. म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी हातभार लावला पाहिजे याची समज नसल्याने, तिच्या उपयोगाची सवय अंगवळणी पडल्याने त्या हानिकारक गोष्टीवर बंदी टाकून त्याचा उपयोग थांबवावा लागला आहे.
“शोधा म्हणजे सापडेल’, असे म्हटले जाते, हे लक्षात घेतले जाईल का ? निसर्गनिर्मित गोष्टींचा उपयोग कसा करायचा हे ग्रामीण भारतातील जनतेकडून शिकण्याची नितांत आवश्‍यकता आहे. त्यांच्याकडील पर्याय थक्‍क करणारे असतात. चांगल्या गोष्टींचा प्रचार-प्रसार होत राहिला पाहिजे. एकाकडून अनेकांकडे तो प्रसार झाला पाहिजे. प्रसारासाठी सध्या सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहेच. त्यासह माऊथपब्लिसिटी (तोंडी प्रचार) हेही दुसरे आणि इंटरनेट, कॉम्प्युटर यांच्याशी संबध येत नसणाऱ्यांसाठी प्रचाराचे माध्यम आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)