#चर्चा : “आरक्षणा’साठी युवकांच्या आत्महत्या कशाला? 

जयेश राणे 

आरक्षणाचा विषय मराठा समाजातील काही युवकांनी प्रचंड जिव्हारी लावून घेतला आहे. आयुष्यात चढउतार हे असतातच त्याशिवाय आयुष्यातील खाचखळगे लक्षात येत नसतात. जीवनातील कठीण प्रसंगातून तावून-सुलाखून निघाल्यावरच विविध अनुभवांची शिदोरी मिळते आणि भविष्यात पदोपदी ती उपयोगास येत असते. शून्यातून विश्‍व निर्माण करणारी कित्येक उदाहरणे देशात आहेत. त्याच विचारावर श्रद्धा ठेवत युवकांनी आत्महत्त्येच्या मार्गापासून परावृत्त होणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा यापूर्वी काढण्यात आलेल्या “मूक मोर्च्यां’च्या माध्यमातून विशेष चर्चेत आला होता. लाखोंच्या उपस्थितीत निघालेले हे मोर्चे लक्षवेधी ठरले. एक “भगवी लाट’, “भगवे वादळ’ या माध्यमातून पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आणि अखंड हिंदुस्थानात “भगवा’ हा शब्द नवा नाही. तो शब्द माहित नाही, असा व्यक्ती असणे अशक्‍यच म्हणावे लागेल. या शब्दाकडे पहाण्याचा काही मंडळींचा दृष्टीकोन कसा आहे, हेही सर्वजण जाणतात. संतभूमी महाराष्ट्रात जन्मास येणे हे आपले अहोभाग्यच!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मराठा आरक्षण या विषयास अनुसरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा युवक करत असलेल्या आत्महत्या सत्रामुळे हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे, हे सुस्पष्ट आहे. त्यामुळे “मराठा आरक्षण’ या सूत्रावरून राजकीय पटलावर काय हालचाली होणार, हे येत्या काळात पहायला मिळेलच. तसेच आरक्षणाच्या विषयावरून मराठा युवकांच्या आत्महत्यांचे सत्र राज्यभर चालू असल्याने मराठा युवकांच्या पालकांना नक्कीच याविषयी काळजी वाटत असणार आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच प्रचंड मानसिक त्रासाच्या विवंचनेतून जावे लागत असणार आहे. हा त्रास जेवढा डोळ्यांनी दिसतो, त्याहीपेक्षा अधिकपणे व्यक्तीला आतून पोखरत असतो.

एखादी गोष्ट मिळवण्याची प्रचंड महत्वाकांक्षा असल्यास ती मिळवून देण्यासाठी सभोवतालचे वातावरणही साहाय्य करते, असा अनेक यशस्वी मंडळींचा दांडगा अनुभव आहे. त्यांपैकी आपणही एक का होऊ नये? सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही विचार माणसाच्या भोवती कायम घुटमळत असतात. जे विचार अधिक तीव्र असतील त्याची छाप आपल्या जीवनावर पडत असते. त्यामुळे नकारात्मक विचारांना, म्हणजेच हानी करणाऱ्या विचारांना कायम दूरच कसे ठेवता येईल, असेच पाहिले पाहिजे.

आत्महत्या करण्याची कारणे विविध असतात. पण अशा गोष्टीचा शेवट मात्र स्वतःचे जीवन संपवण्यात होत असतो. निर्णय प्रक्रियेतील अत्यंत टोकाचा आणि आत्मघातकी निर्णय म्हणजे आत्महत्या असे म्हणता येईल. या संवेदनशील सूत्रातील लक्षवेधी मुद्दा म्हणजे, एका व्यक्तीने ज्या कारणासाठी आत्महत्या केली, त्याच पावलावर पाऊल ठेवून आपलाही अनमोल जीव संपवण्याचा विचार अनेकांच्या मनात चालू होतो. यामध्ये स्थळ, वेळ आणि व्यक्ती वेगळ्या असतात. पण कारण एकच एक सामायिक असते. समविचारी व्यक्तींचे सुत एकमेकांशी चटकन जुळते असे म्हटले जाते. तोच भाग या सूत्राविषयीही लागू होतो. आत्महत्येचा विचार अत्यंत सुप्तपणे मनामध्ये जोर धरत असल्याने, त्याचा विस्फोट कधी होईल हे सांगणे कठीण असते. विचार विस्फोटाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू लागल्यावर कुणाचेही ऐकले जात नाही.

जीवनात कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला नाही, असा एकही सुखी व्यक्ती या भूतलावर नाही. कारण सर्वच गोष्टी पैशांनी खरेदी करता येत नाहीत. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा स्वरूपातील संकटे व्यक्तीला नामोहरम करून टाकतात. अशावेळी खचून न जाता त्या संकटांनाच खचून (गाडून) टाकण्यासाठी काय करता येईल त्या दिशेने पावले टाकली पाहिजे. एकटे न रहाता आदर्श व्यक्तीमत्वांच्या विचारांचे साहाय्य घेतले पाहिजे. कारण माणसाला यशस्वी करण्यासाठी आणि अपयशी होण्यासाठी विचार हेच प्रामुख्याने कारणीभूत असतात. नकारात्मक विचार माणसाला निराशेकडेच घेऊन जातात आणि टोकाचे पाऊल टाकण्यास बाध्य करतात.

सैनिक अहोरात्र सीमेवर शत्रूशी संघर्ष करून देशवासियांचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आजमितीस अनेक अतिरेक्‍यांना कंठस्नान घालणे शक्‍य झाले आहे. सीमेवर प्रत्येक क्षण संघर्षाचा असतो. कधी कुठून शत्रूची गोळी, बॉम्ब येईल याची शाश्‍वती नसते. सीमेवरील संघर्षाचा विचार केला तरी सैनिकांना किती कठीण परिस्थितीला तोंड देत स्वतःसह देशवासियांच्या प्राणांचे रक्षण करायचे असते, हे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. केवळ आपल्यासाठी भीषण संकटांना तोंड देऊन शत्रूला घुसखोरी करण्यापासून रोखले जात आहे. सैनिक देशाचे रक्षण करण्याची राष्ट्रसेवा करत आहेत. असे असतांना टोकाचे पाऊल उचलून बहुमूल्य जीवन का संपवत आहोत? सतत कडव्या संघर्षाला निकराने तोड देणाऱ्या सैनिकांच्या शक्तिशाली सकारात्मक मानसिकतेचा विचार हा अत्यंत प्रेरणादायी असतो. देशासाठी, म्हणजेच आपल्यासाठी हुतात्मा होणाऱ्या सैनिकांचा आदर्श कायमच स्फूर्ती देतो.

दुसरे सूत्र असे की, मनाची खंबीरता आणि स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा अंगाशी बाळगून पाच मोघल पातशाह्यांचा निप्पात करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची केवळ गगनभेदी घोषणा जरी केली, तरी भय दूर पळून जाऊन अंगात वीरश्री संचारून, अशक्‍य गोष्टही शक्‍य वाटू लागते; अशी अलौकिक शक्तीच त्या नावात आहे. कायम भवानी देवीचा (“जगदंब, जगदंब’ असे म्हणत) धावा करणारे शिवाजीराजे यशस्वी होण्यामागे भक्कम असे ईश्‍वरी पाठबळ होते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आपले प्रत्येक पाऊल शिवरायांच्या आदर्शाप्रमाणे पडत असल्याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. असे होत असल्यास “राजे जन्माला या पुन्हा’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही. कारण त्यांच्या जाज्वल्य विचारांच्या रुपात ते कायमच सर्वांत आहेतच. त्यामुळे “आठवावा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप’ असे म्हणावेसे वाटते.

आदर्श राजा ते आदर्श व्यवस्थापक अशी ओळख असलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रवासियांसाठी आदर्श आहे. असे व्यक्तिमत्व राज्यासाठी लाभणे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावानेच शत्रू थरथर कापत असे, तर प्रत्यक्षात आक्रमण केल्यावर त्यांची काय धूळधाण उडत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. कोणत्याही संकटाला धैर्याने तोंड देण्यास शिकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूया आणि
राष्ट्रासाठी बहुमूल्य असलेले जीवन ताठ मानेने जगूया.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)