चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांमुळे अपघातांमध्ये वाढ

वडगाव मावळ  -मावळ तालुक्‍यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे ते नायगाव दरम्यान दुभाजकांमध्ये चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांमुळे अपघात वाढले आहेत. दुभाजकामध्ये धोकादायक पद्धतीने चरायला सोडणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मावळ तालुक्‍यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर 24 तास औद्योगिक क्षेत्रातील अवजड वहानांची तसेच इतर वाहतूक सुरु असते. काही ठिकाणी महामार्गाच्या दुभाजकाची रुंदी जास्त आहे. त्यामध्ये चरण्यासाठी गवत असल्याने महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची तसेच गोशाळेतील गाई, बैल, म्हैस तसेच वासरू अशी अनेक जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. ही जनावरे चरता चरता अचानक महामार्गावर येतात. वेगात असलेल्या दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनाचा ब्रेक न लागल्याने धडकून अपघात होतात. तसेच सीआरपीएफ दरम्यान काळा वळू दुभाजकामध्ये चरत असतो.

सायंकाळी चरत चरत महामार्गावर आल्याने अनेकवेळा दुचाकीस्वार धडकून गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील काहींना जीव गमवावा लागला आहे. आयआरबी महामार्गावर टोल वसूल करते; पण महामार्गावरील प्रवास सुखाचा होण्यासाठी दुभाजकांमध्ये चारणाऱ्या जनावरांवर कारवाई करत नाही. तसेच महामार्गाच्या बाजूलाच हॉटेलमधील उरलेले अन्न व कचरा टाकला जात असल्याने या जनावरांसह भटकी कुत्री, डुक्करे मुक्तपणे वावरत असतात. ही जनावरेदेखील अचानक महामार्गावर आल्याने दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण होते आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार या जनावरांना धडकून महामार्गाच्या बाजूला पडल्याने त्यांना वेळेत उपचारही मिळत नसल्याने त्यांचे जीवही जात आहे.

महामार्गावर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांच्या मालकांवर तसेच महामार्गालगत हॉटेलमधील उरलेले अन्न व कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रुपेश गराडे, अतुल वायकर, विशाल वहिले, अल्ताफ सय्यद, संतोष भिलारे, हरीष दानवे, शरद मोरे, प्रतिक पिंजण आदींनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)