चमकोबाजांनो, आता तरी सुधारा…

अनधिकृत जाहिरातबाजीने शहराचे विद्रूपीकरण वाढले

– सुनील राऊत

-Ads-

पुणे – गेल्या काही वर्षांत शहरात अनधिकृत जाहिरातबाजीला अक्षरश: उत आला आहे. त्यामुळे जागोजागी शहर विद्रूपीकरण होत असतानाच; त्याला आळा घालण्याची जबाबदारी असलेली महापालिका मात्र राजकीय दबावामुळे कारवाई करण्यात उदासीनता दाखवित असल्याने शहराची पुरती वाट लागली आहे. अखेर अनधिकृत जाहिरातबाजीची थेट उच्च न्यायालयानेच दखल घेत, सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांवर थेट गुन्हेच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकारानंतरही या जाहिरातबाजीत तसूभरही फरक पडलेला नाही.

शहरात गेल्या काही वर्षांत गल्लोगल्ली आणि प्रत्येक चौकात चमकोगिरी करणाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे नेता असो वा कार्यकर्ता प्रत्येक गल्लीत, रस्त्यावर आणि चौका चौकात फ्लेक्‍सबाजीला उधान आले आहे. रस्ते, सिग्नल, पदपथ, दिशादर्शक कमानी अडवून महापालिकेची कोणतीही परवानगी अथवा मान्यता न घेताच; हे जाहिरातबाज मनमानी पद्धतीने बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्‍स लावतात. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या चमकोगिरीला आळा घालण्यासाठी थेट न्यायालयातच दाद मागण्यात आली. त्याची सुनावणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून न्यायालयाने वेळोवेळी अशा जाहिरातबाजांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यासाठी राज्यशासनाला कार्यपद्धती निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून शासनाने त्या प्रमाणे संबधितांवर जबाबदारीही निश्‍चित केलेली आहे. मात्र, त्यानंतर पुढे काहीच होताना दिसत नाही.

न्यायालयाच्या सुनावणीच्या काही दिवस आधी महापालिकेकडून या अनधिकृत जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून हे कारवाईचे आकडे न्यायालयात सादर केले जातात. पण सुनावणी होताच; पुन्हा स्थिती जैसे थेच राहते. त्यामुळे काही नागरिकांकडून आता पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असतानाच, शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍सबाजी होत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक दीपक पोटे आणि नगरसेविका अर्चना पाटील यांच्यावर थेट फौजदारी गुन्हेच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतरही शहरातील स्थिती कायम आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देणारे शेकडो फलक शहरात आहेत. या फलकांवर कारवाई करण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नाही. तर न्यायालयाने ती पोलिसांनाही दिली आहे. मात्र, तक्रार देण्यासाठी आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तासंतास बसवून पोलीसही या राजकीय चमकोगिरीला खतपाणी घालत गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे या यंत्रणा सुधारण्यास तयार नसल्या तरी, न्यायालयाने दोन नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने राजकीय नेत्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)