चक्कर येणे किंवा घेरी येणे (भाग-१)

डॉ. शाम अष्टेकर 
 
चक्‍कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्‍कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुद्धीही येऊ शकते. पण बऱ्याच वेळा आपोआप बरे वाटते. चक्‍कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याचे दोन भेद लक्षात घेणे आवश्‍यक आहे चक्‍कर येणे. म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्‍तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे. काही आजारांमध्ये असे गरगरणे किंवा चक्‍कर येणे एवढ्यापुरताच त्रास मर्यादित असतो. पण काही आजारांमध्ये मात्र डोळ्यासमोर अंधारी येणे, उभे असेल तर खाली पडणे, बेशुद्धी इथपर्यंत घटनाक्रम जातो. 
नुसती गरगरण्याची भावना असेल (केवळ चक्‍कर) तर अंतर्कर्ण किंवा त्याच्याशी संबंधित मेंदूचा भाग यांचे आजार असतात. प्रवास लागणे हा प्रकार यातच येतो. कारण बस किंवा बोट लागण्याचा त्रास हा अंतर्कर्णाच्या संवेदनशीलतेमुळेच निर्माण होतो. डोळ्यासमोर अंधारी, चक्करपेक्षा वेगळा प्रकार म्हणजे डोळ्यापुढे अंधारी येऊन खाली पडणे किंवा जागच्या जागी बेशुद्ध होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूचा रक्‍तपुरवठा अचानक कमी पडणे. ही घटना अनेक कारणांमुळे घडते. 
  • अतिरक्‍तदाब असताना अचानक उभे राहणे. 
  • अल्परक्‍तदाब. यामुळे मेंदूत रक्‍तपुरवठा कमी होतो.
  • पोटातील चलनवलन एकदम (वायू, विकार, कळ) बदलून रक्‍तप्रवाहात घट येणे.
  • अतिवेदनेमुळे चेतासंस्थेवर तात्पुरता परिणाम होऊन त्यामुळे रक्‍तदाब अचानक कमी पडणे.
यापैकी कारणे असतील तर उभी असलेली व्यक्ती खाली पडते. पण खाली पडल्यावर हृदय व मेंदू एकाच पातळीवर येऊन मेंदूचा रक्‍तप्रवाह लगेच सुधारतो. यामुळे ती व्यक्ती तात्पुरती बेशुद्धी संपून लगेच सावध होते. काहीवेळा अचानक खाली पडलेल्या व्यक्ती काही क्षणानंतर आपोआप सावध कशा होतात हे यातून समजते. अशी व्यक्ती चक्‍कर येताना खाली पडत असल्यास तिला उभे धरून ठेवणे चुकीचे आहे. कारण यामुळे मेंदूस रक्‍त पोहोचणार नाही. याऐवजी या व्यक्तीस हलकेच सुरक्षित आडवे होऊ देणे महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.
 
पण काही आजारांमध्ये केवळ आडवे झाल्यामुळे रक्‍तप्रवाह सुधारण्याची फारशी शक्‍यता नसते. रक्‍तस्राव, हृदयविकाराचा झटका, शोष (शरीरातले पाणी कमी होणे), मेंदूत रक्‍तस्राव होऊन किंवा रक्‍तवाहिनी अरुंद होऊन रक्‍तप्रवाह थांबणे. या आजारांमध्ये मेंदूचा रक्‍तपुरवठा कमी राहिल्याने ही स्थिती दीर्घकाळ राहते. 
इतर काही आजारांमुळे चक्‍कर येण्यासारखी भावना दिसते. रक्‍तपांढरी, खूप ताप, दृष्टिदोष, रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (उपास, मधुमेहात जादा इन्शुलिन दिल्याने किंवा इतर कारणाने), इत्यादींमुळे चक्‍कर येणे किंवा त्यासारखी भावना होते. 
चक्‍कर किंवा अंधारी : रोगनिदान 
सोबतच्या रोगनिदान तक्‍त्तयाचा आणि मार्गदर्शकाचा आधार घेऊन रोगाविषयी अंदाज बांधता येईल. चक्कर येण्यामागची अनेक कारणे डॉक्‍टरांनीच हाताळणे आवश्‍यक आहे. म्हणून तात्पुरती मदत केल्यानंतर रुग्णास योग्य ठिकाणी तपासणीसाठी पाठवणे आवश्‍यक आहे.  यापैकी प्रवास लागणे, उपवास, अपचन, पोटातील गॅस, उष्माघात ही कारणे असतील तर उपचार तुम्ही स्वतः करू शकाल. 
रक्‍तपांढरी (जास्त प्रमाणात), हृदयविकार, अंतर्कर्णाचे आजार, मेंदूचे आजार, मानसिक आजार, क्षयरोगविरोधी औषधांचा दुष्परिणाम, काचबिंदू, मधुमेह, इत्यादी कारणांसाठी योग्य तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्‍यक आहे. 
 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)