चक्कर येणे किंवा घेरी येणे (भाग-३)

डॉ. शाम अष्टेकर 
 
चक्‍कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्‍कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुद्धीही येऊ शकते. पण बऱ्याच वेळा आपोआप बरे वाटते. चक्‍कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याचे दोन भेद लक्षात घेणे आवश्‍यक आहे चक्‍कर येणे. म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्‍तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे. काही आजारांमध्ये असे गरगरणे किंवा चक्‍कर येणे एवढ्यापुरताच त्रास मर्यादित असतो. पण काही आजारांमध्ये मात्र डोळ्यासमोर अंधारी येणे, उभे असेल तर खाली पडणे, बेशुद्धी इथपर्यंत घटनाक्रम जातो. 
धनुर्वात 
धनु म्हणजे धनुष्य आणि धनुर्वात म्हणजे आकडीमध्ये धनुष्यासारखा बाक येणे. हा आजार विशिष्ट जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात. लसटोचणीचा प्रसार व्हायच्या आधी या रोगाने असंख्य बळी जात. यात अगदी नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत सर्वांना धोका होता. आता मात्र प्रतिबंधक लसटोचणीच्या प्रसारामुळे धनुर्वाताचे प्रमाण नगण्य झाले आहे. रोग कसा होतो धनुर्वाताचे जीवाणू मातीमध्ये सगळीकडे असतात. प्राण्यांच्या व मनुष्याच्या विष्ठेमधून ते मातीत येतात. (म्हणूनच कापलेल्या नाळेवर शेण लावणे चूक आहे.) हे जंतू अन्नपाण्याबरोबर पोटात गेले तर काही होत नाही, पण जखमेत गेल्यास धनुर्वात होऊ शकतो.
जखमांमध्ये धनुर्वाताचे जंतू मिसळण्याचा धोका नेहमीच असतो. पण प्रत्येक जखमेतून धनुर्वात होतोच असे नाही. त्या व्यक्तीमध्ये विशिष्ट प्रतिकारशक्ती नसेल आणि जखमेत पू तयार करणारे जंतू असतील तर मात्र धनुर्वात होण्याची शक्‍यता असते. जखमेतले मपूफजनक जंतू जखमेतला प्राणवायू वापरतात. अशा प्राणवायूविरहित जखमेत नुर्वात जंतू वेगाने वाढतात आणि धनुर्वाताचे विष निर्माण करतात. हे विष रक्तात मिसळून चेतासंस्थेपर्यंत जाते. त्यामुळे स्नायुगटांना झटके येतात. यालाच आपण धनुर्वात म्हणतो.
धनुर्वाताची जखम कोठल्याही प्रकारची असू शकते. अगदी वर्ष सहा महिन्यापूर्वी मोडलेला ते रस्त्यावरच्या वाहन अपघातापर्यंतची कोठलीही जखम धनुर्वाताला निमित्त होऊ शकते. लक्षणे व चिन्हे धनुर्वाताची सुरुवात बहुधा जखमेच्या भागातील स्नायू जडावण्यापासून होते. त्यानंतर जबडा जड होणे, दातखीळ बसणे, इतर स्नायूंमध्ये जडपणा, झटके पसरणे,श्वसनाचे स्नायू आखडून श्वसन बंद पडणे, इत्यादी परिणाम होतात. यामुळे मृत्यूही येऊ शकतो.
नवजात अर्भकास धनुर्वात झाल्यास मूल विचित्र हसल्यासारखे दिसते. (चेह-याचे स्नायू आखडल्याने), मूल अंगावरचे दूध ओढत नाही, झटके येतात, श्वसन थांबते व मृत्यूही येतो. हा धनुर्वात दूषित नाळेमुळे होतो. उपचार ताबडतोब रुग्णालयात न्या. रुग्णालयात पेनिसिलीन, धनुर्वातविरोधी औषधे, झटके थांबवणारी औषधे व प्राणवायू, इत्यादी उपचार करतात. योग्य उपचाराने रुग्ण वाचू शकतो. प्रतिबंधक उपाय प्रत्येक जखम स्वच्छ ठेवा, दूषित जखम रोज हैड्रोजन द्रावाने धुवून घ्या. प्रत्येक गरोदर स्त्रीस प्रतिबंधक टी.टी. लसीचे दोन डोस मिळाले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीस टी.टी.चे दोन डोस व दर पाच वर्षानी एक बूस्टर डोस द्या. जखमेच्या वेळी टी.टी. दिले तरी त्याचा उपयोग महिन्याभरानेच होतो; लगेच नाही. 
 
लकवा : हा वृद्धापकाळाचा आजार आहे.60 वर्ष वयापुढच्या 7% व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार लकवा म्हणूनही ओळखला जातो. वृद्धापकाळात येणारा हा आजार लगेच ओळखू येतो. हाताच्या मनगटाची आणि बोटांची न थांबणारी हालचाल (जपमाळ ओढल्यासारखी) ही याची खूण आहे. हाताने काही करायला गेले की तात्पुरती ही हालचाल थांबते पण काम संपले की लगेचच हालचाल चालू होते. हाताबरोबरच मान, डोके यांचीही हालचाल असू शकते. 
थरकाप/कंप नसतो तेव्हा स्नायूंना ताठरपणा असतो. या आजारात चेहरा भावहीन मुखवटयासारखा असतो. एकूण हालचाल मंद असते. कपडे घालणे, खाणे, चालणे व इतर दैनंदिन व्यवहार खूपच सावकाश होतात. हस्ताक्षर लहान लहान होत जाते आणि ओळखू येईनासे होते. हातांच्या हालचाली परत परत त्याच त्याच क्रमाने होत राहतात. आवाज घोगरा, एकसुरी, अडखळत होतो. मात्र बोलणे नेहमीपेक्षा वेगाने चालते. घाम थोडा जास्तच येतो. चेहरा जास्त तेलकट-मेणचट दिसतो. मान-चेहरा पुढे जास्त सुकलेले असतात आणि पाठीला कुबड असल्याप्रमाणे दिसते. हातांचे कोपरे आणि मनगट नेहमी वाकलेले दिसतात. बसल्या जागी उठताना जड जाते, यात बराच प्रयत्न करावा लागतो. चाल थोडी मंद आणि दुडकी असते आणि थोडी लंगडताना दिसते. पाय जमिनीवरून लवकर उचलत नाहीत. 
उपचार 
या आजारासाठी औषधोपचाराबरोबरच हलके व्यायामोपचार करावे लागतात. औषधांचे दुष्परिणामही होतात. रुग्णाला मानसिक/कौटुंबिक आधाराची गरज असते. या आजारावर चांगली औषधे उपलब्ध आहेत. गोळया आयुष्यभर घ्याव्या लागतात. औषधोपचाराचा उपयोग नाही झाला तर मेंदूवर शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)