चक्कर येणे किंवा घेरी येणे (भाग-२)

डॉ. शाम अष्टेकर 
 
चक्‍कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्‍कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुद्धीही येऊ शकते. पण बऱ्याच वेळा आपोआप बरे वाटते. चक्‍कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याचे दोन भेद लक्षात घेणे आवश्‍यक आहे चक्‍कर येणे. म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्‍तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे. काही आजारांमध्ये असे गरगरणे किंवा चक्‍कर येणे एवढ्यापुरताच त्रास मर्यादित असतो. पण काही आजारांमध्ये मात्र डोळ्यासमोर अंधारी येणे, उभे असेल तर खाली पडणे, बेशुद्धी इथपर्यंत घटनाक्रम जातो. 
सोबतचा रोगनिदान मार्गदर्शक वापरताना पुढील काही मुद्दे लक्षात घ्यावेत : 
दम लागणे : म्हणजे श्‍वास वेगाने चालणे, लवकर थकवा येणे. 
पोटात वायू, गुबारा : विशेषतः उतारवयात हा प्रकार आढळतो. बऱ्याच वेळा गुबाऱ्यामुळे हृदयविकाराच्या झटक्‍यासारखे परिणाम दिसतात. मात्र अपचन, गुबाऱ्याची माहिती रुग्णाकडून सहज मिळू शकते. 
जास्त रक्‍तस्राव : जास्त रक्‍तस्रावामुळे रक्‍ताभिसरण कमी पडून अंधारी येते. बाहेर दिसणारा रक्‍तस्राव असेल तर कारण स्पष्ट असते. पण शरीराच्या आत झालेले रक्‍तस्राव कळण्यासाठी तपासणी करावीच लागते. असे मोठे रक्‍तस्राव उदरपोकळी, छाती, मांडी या तीन भागांत होऊ शकतात. (मेंदूतल्या रक्तस्रावानेही चक्कर येईल. पण त्याचे कारण मेंदूच्या कामकाजात असते.) मांडीच्या हाडाचा अस्थिभंग असेल तर वरवर मांडी फार न सुजता आत एक-दोन लिटर रक्‍तस्राव होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थिभंगाच्या इतर खाणाखुणा (हालचाल न करणे, वेदना, इ.) दिसतील. 
छातीतला रक्तस्राव असेल तर दम लागणे, छातीच्या त्या बाजूच्या भागाची श्वसनाबरोबर हालचाल न होणे ह्या खुणा दिसतात. याबरोबरच क्वचित खोकल्यातून रक्‍तस्राव असेल. 
उदरपोकळीतील रक्‍तस्राव असेल तर पोटात वेदना, दुखरेपणा, कडकपणा जाणवेल, (पोटाचा आकार वाढण्याची अपेक्षा चूक आहे) 
गरोदरपण – मग ते दोन-तीन महिन्यांचे का असेना- असेल तर अंतर्गत रक्‍तस्रावाची शक्‍यता लक्षात घेतली पाहिजे. हा रक्‍तस्राव योनीमार्गे दिसेलच असे नाही. 
अतीव वेदना : कोणतीही अतीव वेदना अंधारी येण्यास कारणीभूत ठरू शकते. हृदयविकाराची वेदना, अस्थिभंग, पोटातील कळ (जास्त असेल तर), इत्यादी उदाहरणे सांगता येतील. 
खूप ताप : खूप ताप असेल तर तापाचे कारण असलेल्या रोगप्रक्रियेमुळे अशक्तता येऊन अंधारी येऊ शकते. 
उष्मा : उष्माघातात शोष व उष्णतेमुळे अंधारी येते. 
शोष : जुलाब-उलट्यांमुळे शोष पडून अंधारी येते. 
रक्‍तातील साखर कमी होणे : मधुमेहावर इन्शुलिन उपचार चालू असेल तर (अ) इन्शुलिन जास्त होऊन किंवा (ब) जास्त व्यायाम व (क) उपवास यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण उतरून अंधारी येते. थोडी साखर खायला दिल्यास ही अंधारी लगेच थांबते. 
मानसिक धक्का : मानसिक धक्‍क्‍यामुळे रक्‍तप्रवाहात तात्पुरते बदल होऊन अंधारी येते. कधीकधी बेशुद्धीही येते. मात्र खाली पडल्यावर रक्‍तप्रवाह सुधारून आपोआप बरे वाटते. 
मानेतील मणक्‍याचा आजार : मानेतील मणक्‍याची कुर्चा सरकणे किंवा हाडाचे कण तयार होणे, किंवा मणक्‍यातले अंतर कमी होणे, यामुळे चेतासंस्थेवर दबाव येतो. यामुळे चक्‍कर येऊ शकते.
 
औषधांचा परिणाम : क्षयरोगाच्या औषधांचा (स्ट्रेप्टोमायसिन) अंतर्कर्ण व त्याच्याशी संबंधित नसेवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा वेळी चक्कर येणे, कानात बारीक आवाज होत राहणे हा त्रास जाणवतो. अंतर्कर्णाचे अनेक आजार चक्कर येण्यास कारणीभूत ठरतात. 
दृष्टीदोष : दिसायला त्रास होणे, खूप डोकेदुखी व चक्कर असेल तर काचबिंदू असण्याची शक्‍यता असते. 
प्रवास : प्रवास आणि चक्कर येणे यांचा संबंध सर्वांना माहीत आहे. असाच त्रास झोक्‍यावरही होऊ शकतो. 
 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)