चक्कर आल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रिक्षाचालक, दुचाकीस्वारावर गुन्हा


प्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करता पळून गेल्याचा आरोप

पुणे – मित्रमंडळ चौकात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने ती रिक्षातून उतरली. त्यानंतर नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किरकोळ अपघातानंतर भर चौकात भांडणे करून प्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करणाऱ्या बेजबाबदार रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध दत्तवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षातील प्रवासी महिला वत्सला केरबा डोईफोडे (वय 68, रा. नेरळ, नवी मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोईफोडे या एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यांचे नातेवाईक स्वारगेटनजीक असलेल्या मुकुंदनगर भागातील शैलेंद्र अपार्टमेंटमध्ये रहायला आहेत. शुक्रवारी (27 एप्रिल) डोईफोडे दुपारी बाराच्या सुमारास रिक्षातून निघाल्या होत्या. मित्र मंडळ चौकात रिक्षाचालक आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांनी रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, रिक्षाप्रवासी डोईफोडे यांना रिक्षात चक्कर आली. त्या रिक्षातून बाहेर उतरल्या आणि बेशुद्ध पडल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार तेथून पसार झाले.

पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि डोईफोडे यांच्या पुण्यातील नातेवाईकांशी संपर्क साधला. अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. मात्र, रिक्षातील प्रवासी महिला डोईफोडे यांना रुग्णालयात दाखल न करता पसार झालेला रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध डोईफोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात येत आहे. त्याआधारे रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर डोईफोडे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तपास करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)