चंद्र आणि सूर्य

कथाबोध- डॉ. न. म. जोशी 

सूर्य आणि चंद्र हे दोन्हीही आपल्या जीवनाचे आधार आहेत. सूर्य, ऊर्जा आणि उष्णता देतो तर चंद्र शीतलता देतो.
ग्रहमंडलात दोन्हीही एकमेकांना पूरकच आहेत.
पण
एकदा सूर्याला झाला गर्व.
सूर्य चंद्राला म्हणाला,

“सारखा माझ्या मागे मागे काय धावतोस? तू तर परप्रकाशी आहेस. तुला स्वतःचं म्हणून काही नाही. जरा स्वतंत्रपणे काही करायला शिक.”
चंद्र मंद हसला आणि म्हणाला,

“सूर्या तू म्हणतोय ते बरोबर आहे. मी परप्रकाशी आहे. मला तुझ्या मागं मागं यावं लागतं. माझं स्वतःचं अस्तित्व मी दाखवू शकत नाही.”

“मग? आहे ना तुला मी म्हणतो ते मान्य? मी आहे ना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ.”
“सूर्या, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहेस. तू दिनकर, तू उगवलास की पृथ्वी जागी होते. माणसं उद्योगाला लागतात. तुझ्या प्रकाशात सारा आसमंत उजळून निघतो. त्यामुळं तुझी महती माझ्यापेक्षा अधिक आहे हे निश्‍चित. पण… पण… एक गोष्ट सांगावीशी वाटते.”
“काय ते लवकर सांग.”
“सूर्या माझ्याविना तू अपूर्ण आहेस. मी तुझ्यामागे येण्याचं सोडून देईन व पृथ्वी उजाड होईल. कारण हे भास्करा तुझा तापही पृथ्वीला आहेच.”
“तो कसा काय?”

“सकाळी तू अस्पष्ट असतोस. पण दुपारी भाजणारा भास्कर असतोस. तुझ्या पदचिन्हांनी पृथ्वी पोळलेली असते. तिच्या अंगाची लाहीलाही होते. तेव्हा मी मागून येतो आणि मी तिच्यावर चंदनचांदण्याचा शिडकावा करतो. मग पृथ्वी शांत होते. माणसं माझ्या चांदण्यात मनस्वी आनंद घेतात. तेव्हा हे सूर्या तू भाजणारा, मी शांत करणारा, तू तपन, मी चंदन… मग सांग…” चंद्राचं हे भाषण ऐकून सूर्यही खजील झाला. आपल्या गर्वोन्नत स्वभावाबद्दल त्यालाही वाईट वाटलं. आणि सूर्य म्हणाला,
“होय चंद्रा! तू आणि मी, एकमेकांना पूरकच आहोत.”
***
छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत, मालक-नोकर, साहेब-कारकून, धनी-सेवक, असे अनेक भेद आपल्या समाजजीवनात नेहमीच असतात. समाजाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांच्याच भूमिका आवश्‍यक असतात. पण कोणी कोणाला कमी मानू नये, हीन समजू नये, तुच्छ लेखू नये. कारण ज्याचे त्याचे कार्य मानवी जीवनव्यवहाराच्या दृष्टीने उपयुक्‍त आणि मोलाचेच असते. त्यात लहान मोठा असा भेदभाव करण्याचे कारण नाही. महावृक्ष जे उपयुक्‍त आहेत तसे लवलवते गवताचे पातेही उपयुक्‍तच आहे. ही भूमिका असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जीवनरथ पुढे नेता येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)