चंद्रकांत दळवी प्रशासनातील मॅनेजमेंट गुरू

विधानभवन येथे निवृत्तीनिमित्त सत्कार सोहळ्यात मान्यवरांकडून गौरवोद्‌गार

पुणे- चंद्रकांत दळवी हे प्रशासनातील मॅनेजमेंट गुरू असून ते सर्वांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असल्याची भावना कोतवालांच्या प्रतिनिधींपासून ते विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दळवी यांच्याबद्दल व्यक्त केली. तसेच चंद्रकांत दळवी यांच्याप्रमाणेच चांगला प्रशासक व चांगला माणूस बनण्यासाठी कायमच प्रयत्न करू असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे आयुक्‍त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांचा निवृत्तीनिमित्त जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मावती चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक शेखर गायकवाड, अतिरिक्‍त आयुक्‍त सुभाष डुंबरे, पीएमपीलच्या कार्यकारी संचालिका नयना गुंडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. विजय काळम-पाटील, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अभिजीत राऊत, राजेंद्र भारूड, कुणाल खेमणार यांच्यासह पुणे विभागातील सर्व अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

यावेळी जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम म्हणाले, चंद्रकांत दळवी हे कल्पक अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी केलेल्या झिरो पेन्डसी राज्यभर राबविण्यात आली आहे. तसेच त्यांनी यापूर्वी संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्‍त गाव अभियानात महत्वपूर्ण काम केले आहे. त्यांनी लोकाभिमुख काम करून ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची नोंद राज्याच्या प्रशासनात ठळकपणे घेतली जाईल.

सत्काराला उत्तर देताना विभागीय आयुक्‍त दळवी म्हणाले, 1981 साली याच विधानभवनाच्या सभागृहात मुलाखत देवून माझी प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली होती. त्याच सभागृहात आज विभागीय आयुक्‍त म्हणून मी निवृत्तीचा सत्कार स्वीकारत आहे. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वांचा हा सन्मान असून माझ्या कुटुंबीयांनी दिलेल्या साथीमुळेच मी हे काम करू शकलो. निढळ सारख्या छोट्याशा गावात जन्माला येवून हा मोठा टप्पा मी गाठला आहे. माझ्या निढळ या गावाशी असणारी घट्ट नाळच मला प्रशासकीय सेवेत काम करताना उपयोगी पडली. याच मातीत मी लोकांच्यात मिसळून काम केल्यामुळेच कायमच माझे पाय जमिनीवर राहिले, लोकांचे प्रश्न मला समजले. त्याचा उपयोग मला माझी यशस्वी प्रशासकीय कारकीर्द घडविताना झाली. या क्षेत्रात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविता आले. प्रत्येक क्षेत्रातील अनेक मित्र जोडता आले. त्यामुळे मी कृतार्थ असल्याची भावना त्यांनी व्यक्‍त केली.

कार्यक्रमाला विभागातील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपायुक्‍त संजयसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार सुनील जोशी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)