चंदेरी दुनियेची दुसरी बाजू…. 

फिल्म इंडस्ट्री मध्ये होणारे मुलींचे लैगिग शोषण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही महिन्यापूर्वी ‘मी टू’ या सोशल मिडियावरील मोहिमेतून या प्रश्नावर जगभर चर्चा झाली, तसेच अलीकडे दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डी हिनेही कास्टिंग काउच विरुद्ध आवाज उठविला होता. मराठीतील पहिला बोल्डपट अशी चर्चा असलेला विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ हा चित्रपट या चंदेरी दुनियेतील या काळ्या बाजूवर भाष्य करतो.

‘शिकारी’ ही सविताला चित्रपटात काम करण्याची प्रचंड इच्छा असते. तिचा पती भरत (प्रसाद ओक) देखील पूर्वी एक नाटककार असतो. त्यामुळेच या दोघांची ओळख झालेली असते. या क्षेत्रात आपल्याला यश मिळणार नाही याची जाणीव भरतला झाल्याने तो या क्षेत्रापासून दूर जातो. सविताने लग्न केले असले तरी ती संसारात कधीच खूश नसते. मी कधीतरी अभिनेत्री बनणार हेच तिच्या कायम डोक्यात असते. त्यांच्या गावात मुंबईवरून रघु (सुव्रत जोशी) येतो. गावात आल्यावर त्याचे मामा (भाऊ कदम) त्याचे लग्न फुलवासोबत (मृण्मयी देशपांडे) ठरवतात. फुलवा अतिशय अल्लड मुलगी असते.

पती-पत्नी त्यांच्यातील नात्याविषयी देखील तिला काहीच कल्पना नसते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला लागतात. त्याचदरम्यान रघु सविताला पाहातो. सुरुवातीपासूनच मुलींच्या बाबतीत त्याची नजर अतिशय वाईट असते. तो सविताला आपल्या जाळ्यात अडकवतो. सवितादेखील अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत त्याच्यासोबत येते. मुंबईत आल्यावर सवितासोबत काय होते? या सगळ्या जाळ्यातून ती बाहेर पडते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.

शिकारी या चित्रपटात कास्टिंग काऊच हा सध्या चांगलाच चर्चेत असलेला विषय हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट इतर मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. चित्रपटाची कथा चांगली असली तरी शेवट तितकासा चांगला नाहीये. आता चित्रपटाचा शेवट काय असणार याविषयी नक्कीच उत्सुकता ताणली जाते. पण शेवट अगदीच निराशा करून जातो. चित्रपटाचा शेवट देखील तितकाच प्रभावी करता आला असता असेच चित्रपट पाहाताना वाटते.

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, नेहा खान, प्रसाद ओक आणि सुव्रत जोशी यांनी त्यांच्या भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. त्यांच्या तुलनेत वैभव मांगले, भाऊ कदम, कश्मिरा शहा, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका छोट्या आहेत. पण तरीही या कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

कथेच्या मागणीनुसार चित्रपटात बोल्ड सीन असणे यात काही वावगं नाही. पण या चित्रपटात उगाचच बोल्ड सीनचा भरणा केला असल्याचे वाटते. शहारल्या मनात हे गाणे तर मर्डरमधील भिगे ओठ तेरे या गाण्यापेक्षा देखील अधिक बोल्ड आहे.  एकंदरीत एक वेगळा विषयावरचा चित्रपट म्हणून शिकारी पाहायला हरकत नाही.
चित्रपट – शिकारी
निर्मिती – आर्यन ग्लोबल एंटरटेनमेंट
दिग्दर्शक – विजू माने
कलाकार – नेहा खान, सुव्रत जोशी, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, भाऊ कदम, कश्मिरा शहा, भारत गणेशपुरे,

रेटींग – २.५

– भूपाल पंडित 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)