घोरावडेश्‍वर : एक अध्यात्मिक पर्यटनस्थळ

सोमाटणे – पुण्यावरून मुंबईकडे जाताना द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग यांच्यामध्ये असणाऱ्या डोंगर रांगा आहेत. ज्या पावसाळ्यात निसर्गाची हिरवीगार शाल पांघरून पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालतात. आणि याच डोंगरामध्ये एक कोरीव अशी पांडव कालीन लेणी आणि दगडातच कोरलेल शंकराच अगदी प्राचीन असे मंदिर आहे. ज्याच नाव घोरावडेश्‍वर. ज्याच पर्यटनाच्या व अध्यात्माच्या दृष्टीने याला फार महत्वाचे स्थान आहे. हे इतक मोहक आणि सुंदर आहे की कलेचा एक अद्भुत नमुना म्हणावा लागेल. येथून जाताना प्रत्येक पर्यटक भक्‍ताला याविषयी विचारण्याचा आणि येथे भेट देण्याचा मोह झाला नाही, तर नवलच. पांडव जेव्हा दोन वर्ष अज्ञात वासात होते तेव्हा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली असल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. आणि या मंदिराच्या पायथ्याशी वसलेलं अमरजाई देवीचे मंदिर आहे.

या पांडवांची काळजी घेण्यास स्वतः अमरदेवी देवी येथे प्रकट झाली अशी अख्यायिका आहे. मंदिर हे पूर्णपणे खडकामध्ये कोरलेले असल्याने याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत जाते. शिवाय जवळच अगदी काही फुटांवर बौद्धकालीन आणि पुरातन अशा लेण्यामध्ये सुमारे नऊ खोल्या आहेत. ज्यात साधू तप करण्यासाठी बसत असल्याची कथा सांगितली जाते. येथील लेण्या आणि खोल्या खडकांमध्येच कोरल्या आहेत. त्यामुळे पर्यटक आणि इतिहासाचे अभ्यासक यांची नेहमी रेलचेल असते. विशेषत: सोमवारी येथे जमा होणारी गर्दी चांगली असते. या मंदिराचे सौंदर्य म्हणजे शंकराचे मोठे शिवलिंग तेही पूर्णपणे दगडामध्ये कोरीव आहे. या मंदिरात नेहमी मोठमोठे धार्मिक कार्यक्रम वर्षभर होत असतात. या मंदिराला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते. कारण दर सोमवारी येथे येणारे भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. तिसऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते या यात्रेत लाखो भक्‍त शंकराचे दर्शन घेऊन आपल्या जन्मांचे सार्थक झाल्याचे मानतात.

मंदिर असलेल्या गाभाऱ्यात तीन ते चार कोरलेल्या खोल्या आहेत. ज्यातील काही खबरदारी म्हणून बंद केल्या आहेत. याच बंद खोल्यामध्ये एक जमिनी खाली भुयार आहे. ते थेट चाकण येथे उघडते, असे जुन्या जाणत्या माणसांकडून ऐकले जाते. मधल्या काळात इतिहास संशोधकाकडून हे भुयार शोधण्याचे प्रयत्न झाले होते. या मंदिराच्या बाजूलाच एक कोरलेली खोली आहे. ज्यात विठ्ठल रुखमाईच्या अगदी लोभस अशा मूर्ती आहेत. याच मंदिरात कधी कधी संत तुकाराम महाराज अभंग लिहायला यायचे अशा कथाही सांगितल्या जातात. या डोंगरावर वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. या लेण्यांचे एक विशेष आकर्षण म्हणजे येथे असलेल्या पाण्याच्या टाक्‍या सध्या चार ते पाचच शिल्लक आहेत ज्यात पूर्ण वर्षभर स्वच्छ व संथ असे पाणी असते जे आलेल्या पर्यटक भक्तांची तहान भागवत असते.

या मंदिरात जाण्यासाठी अगदी खालपासूनच पायऱ्या आहेत ज्यांची संख्या तिनशे ते साडेतीनशे आहे. परंतु नागमोडी वळणे घेत आडवाटेवरून जाणे बरेचशे पर्यटक पसंद करतात. या संपूर्ण पायऱ्यांवर प्रकाशाची सोय केली असल्याने रात्री हे मंदिर अतिशय आकर्षक भासते.

लेणीकडे व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर जुने रेलिंग तुटल्याने आता मजबूत आणि लांबपर्यंत लोखंडी रेलिंग केले असल्याने अचानक वाढणारी गर्दी नियंत्रात आणता येते. व काही दुर्घटना होण्यापासून बचावही करता येतो. येथून दक्षिणेला मन फिरवल्यास झाडामधून मार्ग काढत जाताना खाली दिसतो, तो मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जगप्रसिद्ध असे एमसीएचे क्रिकेट मैदान आणि शिरगाव येथील साईबाबा मंदिर दिसते. खाली खोल अशी दरी आणि तिच्यातून येणारी थंडगार हवा पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात तर हा परिसर अगदी नटलेला दिसतो.

हिरवागार शालू घालून जणू आकाशाला गवसणी घालण्याची कामना करतेय, असे वाटते. येथील शिवमय वातावरण, पावसाच्या हलक्‍या सरी अन्‌ वाऱ्याची मंद झुळूक अनुभवल्यावर तर जणू धर्तीवर स्वर्ग निर्माण झाल्याचा भास होतो आणि याच पावसाच्या पाण्यात भिजण्याचा मोह भल्याभल्यांना आवरणे महाकठीण होते. जमिनीपासून बरेच उंच असल्याने ढग जणू आपल्याला स्पर्श करून जातात किंवा पाऊस आपल्यासमोर तयार होतो, असे वाटले, तर नवल नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)