‘घोरपडी उड्डाणपूलाच्या कामाची सुरूवात 15 सप्टेंबरच्या आत करा’

संरक्षण विभागाची महापालिकेला तंबी
नियोजित पुलाच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंगळवारी मंजुरी
प्रभात वृत्तसेवा
पुणे – घोरपडी येथे पुणे-मिरज रेल्वे लाइन आणि पुणे-सोलापूर रेल्वे लाईन क्रॉसिंग येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला 15 सप्टेंबरच्या आत सुरूवात करा अन्यथा लुल्लानगर येथील उड्डाणपूलाचे काम होऊ देणार नाही, अशी तंबी संरक्षण विभागाने महापालिकेला दिली आहे. महापालिकेकडून होणारी दिरंगाई, राजकारणामुळे होणारा विलंब या सगळ्यांना कंटाळूनच संरक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे. या दोन्ही ठिकाणी संरक्षण खात्याची जागा महापालिकेने मिळवली असून, त्यावर हे काम होणार आहे. या पूलाच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहरालगतचा मुंढवा, खराडी, कल्याणीनगर असा पुर्वेकडील भाग हा मध्यवर्ती पुणे शहराशी घोरपडी गावातील अरुंद रस्त्याने जोडला गेला आहे. या गावाचा काही भाग पुणे कॅन्टोन्मेण्ट हद्दीतील आणि सभोवतालचा भाग संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. तसेच सुमारे 700 मी. अंतराच्या फरकाने पुणे-मिरज रेल्वे लाईन आणि पुणे -सोलापूर रेल्वे लाईन असे दोन रेल्वे क्रॉसिंग आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची मोठ्याप्रमाणात कोंडी होते. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सन 2008 मध्ये या ठिकाणी दोन संलग्न उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले होते. तेव्हापासून या प्रकल्पासाठी दक्षिण महाराष्ट्र सब एरिया, पुणे कॅन्टोन्मेण्ट, संरक्षण विभाग, रेल्वे विभाग यांच्याशी महापालिकेने पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यानुसार या सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत.

लष्कराने मात्र परवानगी देतानाच टाकलेली अट म्हणजे तंबीच असून, जर या उड्डाणपूलाचे काम 15 सप्टेंबर पर्यंत सुरू केले नाही तर लुल्लानगर येथील उड्डाणपूलासाठी संरक्षण खात्याच्या दिलेल्या जागेत काम होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेला हे काम पुढील महिन्यात सुरू करावेच लागणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
त्यानुसार संरक्षण खात्याने मान्य केलेल्या “वर्किंग परमिशन’ बाबत परवान्यातील नमूद अटी आणि शर्तीनुसार संरक्षण खात्याशी समजुतीचा करारनामा करणे, संरक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या परवानग्यांच्या मोबदल्यात पुढील 30 वर्षांसाठी प्रती चौ. मी. एक रुपया याप्रमाणे प्रतिवर्षी 11 हजार 564 रुपये दरवर्षी एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संरक्षण विभागाकडे जमा करणे, या जागेवर प्रत्यक्षात काम सुरू करण्यापूर्वी संरक्षण विभागाकडील मूल्यांकनानुसार कामातील बाधित एकूण जागेच्या किंमतीच्या पाच टक्के इतकी म्हणजेच दोन कोटी 11 लाख 52 हजार 890 रुपये अनामत रक्कम महापालिकेने कॅन्टोन्मेण्ट बोर्डाकडे जमा करावी याशिवाय संरक्षण विभागाच्या बाधित जागेवरील मिळकती शिफ्ट करण्यासाठी महापालिकेने 34 लाख 40 हजार रुपयेही कॅन्टोन्मेण्ट बोर्डाकडे जमा करावेत, पुनर्प्रस्थापित कराव्या लागणाऱ्या संरक्षण विभागाच्या मिळकतींची त्यांच्याकडील मान्यतेनुसार सुचवलेल्या जागेवर आणि त्यांच्या स्पेसिफिकेशन आणि डिझाइननुसार आणि खासगी मिळकतींची पुनर्बांधणी करणे, संरक्षण विभागातील आठ अधिकाऱ्यांसाठी निवास बांधून देणे, महापालिकेच्या जागेवरील बाधितांचे पुनर्वसन करणे, रेल्वे हद्दीतील जगेवरील बाधितांचे पुनर्वसन करणे या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)