घोरपडीत मंडळाच्या अध्यक्षाला दणका

डीजे लावून राडा करण्याच्या तयारीत असताना कारवाई : मंडळांना नोटीसा बजावल्या

पुणे – डीजे लावून दणक्‍यात मिरवणूक काढणार, असे सोशल मीडियावर आव्हान देणाऱ्या घोरपडी गावातील मंडळांच्या अध्यक्षांवर पोलिसांनी कारवाई केली. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होवू नये यासाठी मंडळांना नोटिसा देवूनही त्यांनी अशाप्रकारचा मेसेज व्हॉट्‌स अॅपवर व्हायरल केल्याचे दिसून आल्यानंतर बुधवारी मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपक वाघमारे, पंकज परदेशी मुकेश पाटे, राज राजपुत, आकाश पुजारी, केविन ऍन्थोनी (सर्व रा. घोरपडीगाव) यांच्यावर “सीआरपीसी’नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव दि. 13 ते 23 सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घोरपडीगाव हद्दीतील राज मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, नटराज मित्र मंडळ, विशाल गजानन मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ, उमेश मित्र मंडळ, साई मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ, शिव मित्र मंडळ, सुवर्ण मित्र मंडळ या मंडळांच्या नावाचा उल्लेख असलेला एक मेसेज बुधवारी व्हॉट्‌स अॅपवर फिरत होता. त्यामध्ये घोरपडीगाव भव्य मिरवणूक, याला म्हणतात घोरपडीगावचा राडा, देखते है किसमे कितना दम, आता राडा होणार, असा मजकूर होता. तसेच गुरूवार दि. 13 सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाकरिता अंबिका डिजिटल, त्रिमूर्ती डिजिटल, सनयोग डिजिटल, एम. व्ही. नाईन, रणजीत ऑडिओ, ओमकार डिजिटल आदी डी. जे. वाद्य चालकांची नावे नमूद केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

मुंढवा पोलिसांनी सर्व गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी यांची बैठक घेवून ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत सर्वांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, वर नमूद केलेल्या मजकुराच्या मेसेजवरून त्यांनी कायद्याला घाबरत नसल्याचे दाखवून दिले. याची दखल घेत या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिली.

रस्ता आडल्याने मंडप हटविला
घोरपडी गाव परिसरात रहदारी असलेल्या रस्त्यावर मंडपाने साठ टक्‍के जागा व्यापल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी मंडळाच्या अध्यक्षासह कार्याध्यक्ष यांना मंडपाचा आकार कमी करण्यास सांगितले. मात्र, तरीही मंडपाचा आकार कमी न केल्याने मुंढवा पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागास माहिती देत बुधवारी दि. 12 रोजी रात्री घोरपडीगाव येथील श्रावस्ती मित्र मंडळाचा मंडप रस्त्यावरून हटविला. तसेच रस्ता अडवून रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी अध्यक्ष निलेश कांगाळे व कार्याध्यक्ष विनोद गायकवाड यांच्याविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)