घोड्यावरचे शहाणे…

महाराष्ट्रात सांप्रत काळी ‘बोंडअळी’ नामक अळीने उच्छाद मांडला आहे. एरवी खरे पाहता अळीचा जीव तो काय? मात्र या ‘बोंडअळी’ने अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. कापूस उत्पादक शेतकरी आणि सरकार दोघेही या ‘बोंडअळी’ने त्रस्त झाले आहेत. शेतकरी आणि राज्यातील फडणवीस सरकार कर्जमाफीच्या जंजाळातून जरा कोठे सावरते न सावरते तोच या ‘बोंडअळी’ने असा ‘आ’ वासला की ठिकठिकाणी पेरलेला कापूस बघता बघता फस्त झाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर आला.

आता या ‘बोंडअळी’ने नेमका किती कापूस फस्त केला म्हणजे थोडक्‍यात कापूस उत्पादकांचे नेमके किती नुकसान झाले ते पाहण्यासाठी सरकारने त्या त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना म्हणे पाहणी करायला सांगितले. आता राज्यसरकारचा आदेश अधिकाऱ्यांनी पाळायलाच हवा ना. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी शेताशेतात घोड्यावर जाऊन पाहणी केली आणि ‘बोंडअळी’ने नेमका किती कापूस फस्त केला त्याचा म्हणे शोध घेण्याचा प्रयत्न केला.

आता तेथील शेतकऱ्यांना तसेच इतरांना हे अधिकारी म्हणजे ‘घोड्यावरचे शहाणे’ वाटले असावेत; कारण नुकसानीची पाहणी घोड्यावरूनही केली जाऊ शकते, हे त्यांना आजपर्यंत माहीत नव्हते. शिवाय अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तर यानिमित्ताने पहिल्यादांच घोड्याचे पाय लागले होते. या शेतकऱ्यांना आजपर्यंत ‘उंटावरचे शहाणे’ माहीत होते. मात्र ‘घोड्यावरचे शहाणे’ ते प्रथमच पाहात होते. आता त्या अधिकाऱ्यांना शेतात घोड्यावरून ‘रपेट’ मारताना किती “बोंडअळ्या’ दिसल्या आणि त्यांनी कापसाचे किती नुकसान केले हे नेमके कळले असेल काय, असा प्रश्न साहजिकच शेतकऱ्यांच्या मनात आला असेल. कारण ‘बोंडअळी’ ही कापसाच्या बोंडाच्या आत असते आणि कापूस तर जमिनीवर असतो, एवढेच शेतकऱ्याचे मर्यादित ज्ञान. त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या शंकेला वाव होताच. कारण संपूर्ण वावरात घोड्यावरून फिरताना त्या अधिकाऱ्यांना किती बोंडअळ्या दिसल्या असतील आणि त्यांनी त्यावरून किती नुकसान केले असेल याचा अंदाज कसा बरे बांधता येणार, हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला असणार. परंतु हे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास थोडेच बांधील होते? त्यांनी घोड्यावरून रपेट करण्याची आपली हौस भागवून घेतली असेल आणि दुसऱ्या दिवशी कार्यालयात जाऊन नुकसानीचा पंचनामा केला असेल.

परंतु यानिमित्ताने ‘बोंडअळी’ने केलेल्या नुकसानीची घोड्यावरून पाहणी करण्याच्या प्रकरणाबाबत काही प्रश्न साहजिकच निर्माण होतात. मुळात हा घोडाही त्या अधिकाऱ्याप्रमाणे ‘सरकारी’ होता की काय? नसल्यास तो भाड्याने घेतला होता का? आणि या भाड्याचे पैसे नेमके कोणाकडून वसूल करायचे? भाड्याचे पैसे सरकारी तिजोरीतून द्यायचे की ज्या शेतकऱ्याच्या शेतात घोड्यावरून पाहणी केली त्याने ते द्यायचे? अर्थात या सर्व प्रश्‍नांना त्या अधिकाऱ्यांचे उत्तर तयार असणारच त्याशिवाय का त्यांनी घोड्यावर पाहणी केली असेल? तेवढे शहाणपण नक्कीच त्यांच्याजवळ असणार. शिवाय यानिमित्ताने शहाण्या लोकांना आजपर्यत फक्त उंटावर स्वार होण्याचा अधिकार आहे असा समज होता. हा मान आता घोड्यालाही मिळणार आहे आणि तोही एका बोंड अळीमुळे. त्यामुळे एरवी नुकसानग्रस्त म्हणून ओळखली जाणारी ही बोंडअळी किमान घोड्याच्या तरी फायद्याची ठरली आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे भविष्यात ‘बोंडअळी’ आणि घोडा यांचे असे काही समीकरण तयार होईल कीं ‘बोंडअळी’ग्रस्त कापसाच्या शेतात ‘तयार’ घोड्यांनाच सोडून नुकसानीचा अंदाज घेतला जाईल.
– सत्यश्री


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)