घोडा, बसंती व टांगा

स्थळ – दिल्ली तख्त; वेळ- टांगा चालवण्याची
दरबार रिकामा झाला आहे, दरबारी येईनासे झालेत, वातावरणात निगेटिव्हीटी ठासून भरली आहे. महाराज व प्रधानजी भकास नजरेने एकमेकांना न्याहळत आहेत.
“तडप तडप के इस दिल से आह निकलती रही,

मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्‍या गुनाह किया, के लुट गये…..’ हे भाव उभयंतांच्या तोंडावर जराही ऍक्‍टिंग न करता स्पष्टपणे दिसताहेत. वातावरणात जिवंतपणा आणावा या उद्देशाने प्रधानजी सारेगामा वर गाणं लावतात.
‘सुख के सब साथी, दु:ख मे ना कोई, मेरे राम… तेरा नाम एक साचा दुजा ना कोई…’
‘प्रधानजी ! किती सत्यता आहे या गाण्यात, बघा ना काल पर्यंत, म्हणजे कर्नाटकचा निकाल लागेपर्यंत सारे आपल्या सोबत येण्यास धडपडायचे, एक निकाल नकारात्मक लागला आणि त्यांची चक्क आघाडी बनते आहे? त्यात महागाईने तेल ओतले.’

‘होय महाराज, महागाईने जनता त्राहीमान करते आहे बरं. त्यात पेट्रोलियम कंपन्यांनी छळ चालवला आहे. महाराज आणीबाणी येईल. ‘
‘प्रधानजी, आणीबाणी हा शब्द का वापरता? ते ही आमच्या राज्यात? अहो, आणीबाणीला विरोध करून तर आम्ही सत्तेवर आलो आहोत प्रधानजी! ‘
‘महाराज, मी केवळ तुलना करीत होतो. शब्दशः आणीबाणी नाही काही.’
‘प्रधानजी, इंधन जरी महागले तरी आपण त्यासाठी कर्जाची सोय केली आहे ना? मग पब्लिक का बोंबलते? आय मीन ओरडतं आहे? ‘

‘महाराज, तो उपाय नव्हे, ती तडजोड आहे, मजबुरी म्हणतात त्याला. कर्नाटकात आपली अवस्था काहीशी महाग पेट्रोलसाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य जनतेसारखीच झाली होती की नाही? सत्ता स्वबळावर मिळतं नव्हती म्हणून दहा-पाच आमदार फायनान्सवर…’

‘कळले बरं ! इंधनासारखेच बहुमतही आवाक्‍याबाहेरचे झाले आहे का प्रधानजी?’
‘शुभ शुभ बोला महाराज, गोवा, गुजरात नंतरच हे आपल्या लक्षात यायला हवे होते.’
‘हूँ ….’ महाराज लांब सुस्कारा सोडतात. ‘बरं, त्या गाण्याच्या दुसऱ्या बाजूवर कॉन्सन्ट्रेट करा बरं. “मेरे राम, मेरे राम ‘ आता 2019 आलं आहे, निवडणुकांचे वर्ष आहे हे.’
‘महाराज, कर्नाटकची सुरू झालेली घसरगुंडी थांबवायची असेल तर इंधन दरवाढीवर विचार करावा. सोशल मीडियावर जोक चालले आहेत की, पेट्रोलियम मंत्री हे धर्मेंद्र असल्याने घोळ झाला आहे. त्यांना वाटते अजूनही बसंतीचा टांगा सव्वादोन रुपयांत ठाकूरच्या हवेलीला सोडतो.’

‘अस्स! तो फोन घ्यावा, आणि लावा फोन धर्मेंद्रजी ना, म्हणजे पेट्रोलियम मंत्र्यांना.’
‘जी महाराज,’ प्रधानजी फोन घेतात व डायल करतात. महाराजांचा निरोप दिला जातो की, इंधन दरांवर लगाम लावा, पलिकडून काहीतरी सुनावले जाते तसा प्रधानजीचा चेहरा काळवंडतो.
‘महाराज, आपली पत घसरली हं. आपले लोकसुद्धा ऐकत नाही आता. महाराज ते धर्मेंद्र बसंतीसारखे म्हणाले की ‘घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्‍या?’
महाराजांचाही चेहरा चिंतेने काळवंडून जातो. प्रधानजी हळूच महालाबाहेर धूम ठोकतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)