घुसळखांब

डॉ. नीलम ताटके

सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत “घुसळखांब’ नावाचे गाव आहे. परंतु, मी त्या गावाविषयी तुम्हाला सांगणार नाही, तर पूर्वीच्या काळच्या घुसळखांबाविषयी सांगणार आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत ताक, लोणी हे सगळं मुबलक प्रमाणात लागायचं. कारण पंगत बसली की त्यात फक्त घरातली माणसंच असायची असं नाही, तर आला-गेला, पै-पाहुणा, आणि घरातली गडी माणसं असे सगळे असायचे. त्यामुळे थोडं-थोडकं काही पुरायचंच नाही. त्यासाठी घुसळखांबाला दोरी बांधून तो दोन स्त्रिया हलवत व ताक करत असत. हे करताना कधी-कधी गाणीही म्हणत असत. त्यांना ताक करण्यासाठी वेळेचं बंधन असायचं. ताक सकाळी फार लवकर करून चालत नसे. कारण ते उन्हाच्या वेळी आंबट व्हायचं. पा’ सगळं भरलेलं असावं व जेवणाच्या शेवटी पाणी प्यायच्या भांड्यात ताक घ्यायचं आणि प्यायचं, वाटीत नाही कारण नाहीतर त्याला आमटीची चव लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आणि शरीराला ताकाची आवश्‍यकता आहे तशीच साजूक तुपाचीही आहे. त्यासाठी हे करायलाच हवं. घुसळखांब हा डेरा आणि मोठ्या आकाराची रवी यांचा असायचा. डेरा अर्थातच मातीचा. रवी दोरीने बांधलेली असायची आणि दोघीजणींच्या हातात दोऱ्या असायच्या एकदा एकीने आणि एकदा दुसरीने त्या दोऱ्या ओढायच्या आणि ताक करायचं. दोऱ्या रवीला गुंडाळलेल्या असायच्या. याला वेळ लागायचा बरं का! कारण पूर्वी घरच्या दुधाचं घट्ट दही त्यामुळे खूप हलवावं लागायचं आणि दुसरं म्हणजे भरपूर लोणीही यावं लागायचं कारण पूर्वीच्या साग्रसंगीत जेवणात रोजच साजूक तूप लागायचं शिवाय सणवार तर असायचेच.

घुसळखांब स्वच्छ करणं हेसुद्धा अवघड काम असायचं. अगदी अलगद धुऊन पालथा घालावा लागे. तो सतत हालू नये म्हणून स्थिर राहील अशा जागी आणि करणाऱ्या स्त्रियांचा कोणाला अडथला होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागे. दही एकदा सैल झालं की घुसळखांब फिरवायला वेग येई आणि तो फिरताना आतल्या ताकाचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येई. घुसळखांब फिरवण्याची सुद्धा एक लय होती बरं का!

नंतरच्या काळात कुटुंबे विभक्त झाली आणि छोट्या कुटुंबांच्या गरजाही कमी झाल्या. गृहिणी कमावती झाली. परंतु, ताकाची आवड मात्र सगळीकडेच तशी राहिली. घुसळखांबाची जागा रवी आणि दह्यासाठी बनवलेल्या विशिष्ट डिझाइनच्या भांड्याने घेतली. तूप विकत मिळत असल्याने लोण्याची गरज उरली नाही. त्यामुळे दह्यात पाणी घालून हलवून ताक करण्याची सोप्पी पद्धत आली. घुसळखांबावर ताक करताना त्या स्त्रियांना उभं राहून ताक करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आधुनिक काळात डायनिंग टेबलवर भांडं ठेवून आरामात खुर्चीवर बसून ताक करण्याची सोय झाली. बरं, फारवेळ हलवत बसायची गरजही उरली नाही.

शहरी भागात स्वतःच्या गाई-म्हसी असलेले लोक ताक विकतात. त्यामुळे ती गरजही भागली जाते. जुन्या वस्तूंच्या संग्रहालयात कदाचित तो बघायला मिळेलही कारण जुन्या मालिकांमद्येही तो बघायला मिळत नाही. परंतु आपल्या वापरातून घुसळखांब गेला असला तरीही प्रत्येकवेळी ताक पितांना सगळ्यांना त्याची आठवण होत असेल हे नक्की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)