घारगावची प्राथमिक शाळा अखेर रात्री कोसळली!

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुर्घटनेचा विषय ताजा असतानाच श्रीगोंदा तालुक्‍यातील मोठी बाजारपेठ व नगर-दौंड रस्त्यावरील घारगाव येथील जिल्हा परिषद शाळाही मंगळवारी रात्री अचानक कोसळली. जिल्ह्यात शाळा पडण्याची ही दुसरी वेळ असून, प्रशासनाने या विषयात वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. सुदैवाने मंगळवारी रात्री ही घटना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातल्याने आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्‍यातील बऱ्याच जुन्या शाळांची स्थिती केव्हाही कोसळण्याची बनली आहे. अशीच घारगाव येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील प्राथमिक शाळा मंगळवारी रात्री अचानक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. घारगाव प्राथमिक शाळेचा तर भोंगळ कारभार एवढा गलथान आहे की या शाळेची नोंद महसूलच्या सात-बारा उताऱ्यावरही नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे मालमत्ता रजिस्टरला शाळेचा उल्लेखच नाही. याच कारणाने या शाळेचे निर्लेखन प्रशासन दरबारी गेल्या 1 ते दीड वर्षांपासून रेंगाळत पडून आहे. या शाळेचे निर्लेखन आजतागायत झालेले नसून यामुळे नवीन शाळा खोल्यांना मंजुरी मिळालेली नाही. शासनाची मुख्यत्वे मालकी जिल्हा परिषद असतानादेखील जिल्हा परिषदेने आजतागायत शाळा त्यांच्या दप्तरी नोंदविण्यास असमर्थता दर्शविली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावे संबंधित विभागांकडे केलेले आहेत.

याच शाळेचे बांधकाम निकृष्ट असल्याबाबत लेखी निवेदन प्रशासनाला व मंत्रिमहोदयांना दि. 24 रोजीच सर्व पालक व ग्रामस्थांनी दिले होते. यानुसार दि. 7 पासून बेमुदत शाळा बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांनी प्रशासनाला केलेले आहे. यातच दि. 28 ला निंबोडीची घटना घडल्याने शाळांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार यातून चव्हाट्यावर येत आहे.
शाळा कोसळल्याचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर ही इमारत पडल्याच्या निषेधार्थ नगर-दौंड रस्त्यावर दोन ते तीन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेला 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. या 7 दिवसांत जर काम सुरू न झाल्यास परत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. शाळा बांधकाम होईपर्यंत शाळेला जागा सोसायटीने देण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात बबनराव पाचपुते, दत्तात्रेय पानसरे, दिनकर पंधरकर, सभापती-उपसभापती, शहाजी हिरवे, सरपंच-उपसरपंच, निंभोरे मेजर, बापूराव शिंदे, भूषण बडवे, नीलेश पवार, अविनाश निंभोरे, शरद खोमणे, संगीता खामकर, अशोक खडके, हंबीर पवार, रामसिंग खामकर, अनिल मोकळ, विष्णू खामकर, सागर कळमकर, रमेश खोमणे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आज सकाळपासून गावात बंद पाळण्यात आला होता. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, आमदार राहुल जगताप यांनी आमदार निधीतून 10 लाख शाळेसाठी दिल्याचे फोनवरून जाहीर केल्याची माहिती समजली.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही भेट देऊन घटनेचा निषेध केला. अशा घटना घडणे ही प्रशासकीय दृष्टीने अतिशय खेदाची बाब आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळालेली असून, या घटनेचा योग्य तो निर्णय मंत्रिमंडळातून घेण्यास तयार आहोत. याबाबत ग्रामविकासमंत्र्यांशी व पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे. योग्य निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)