रुपयाचे घसरणे आणि क्रुडची वाढ मंदावली

दूरसंचार, वाहन, धातू, आरोग्य क्षेत्रांची आगेकूच

मुंबई: सरकारने पर्यायी इंधनावरील वाहनांना परवाण्याची गरज नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सपाटून मार खाल्लेल्या रुपयाची घसरण आता थांबण्याची चिन्हे आहेत. या कारणामुळे कालच्याप्रमाणे आजही शेअर बाजारात खरेदी होऊन निर्देशांक वाढले. मात्र त्या अगोदर निर्देशांकांत मोठी घट झाल्यामुळे आझवड्याच्या पातळीवर मात्र निर्देशांक कमी झाले. त्या अगोदर सहा आठवड्यापासून निर्देशांक वाढत होते.

शेअरबाजारात सकाळी खरेदीचा जोर कमी होता. तो बाजार बंद होताना वाढत केला. बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 147 अंकांनी म्हणजे 0.38 टक्‍क्‍यांनी वाढून 38389 अंकावर बंद झाला. गेल्या सहा दिवसात सेन्सेक्‍स तब्बल 878 अंकांनी कमी झाला होता. आज राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंकांनी वाढून 11589 अंकांवर बंद झाला.

कालच्या कामकाजाबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 611 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 455 कोटी रुपयांच्या शेअरी विक्री केली. मोठ्या कंपन्यांप्रमाणे छोट्या कंपन्यांच्या शेअरचीही आज बऱ्यापैकी खरेदी झाल्यामुळे मिडकॅप 1.15 टक्‍क्‍यांनी तर स्मॉल कॅप 0.55 टक्‍क्‍यांनी वाढले.

जागतिक वातावरण मात्र अजूनही खराबच आहे. देशांतर्गत अडचणीमुळे हैराण असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनविरोधात कडक आर्थिक धोरणाचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर डॉलरच्या सुधारण्यामुळे इतर देशही हैराण आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे क्रुडच्या दरातील वाढ काही प्रमाणात थांबली आहे.

आज झालेल्या निवडक खरेदीमुळे इतर क्षेत्रांचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले असले तरी ऊर्जा. बॅंकिंग, पायाभूत सुविधा क्षेत्रांचे निर्देशांक आजही 0.08 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. आजच्या बाजारातील परिस्थितीबाबत बोलताना जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगतले की, काही कंपन्यांचे शेअर चांगल्या भावावर उपलब्ध असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. वाहन उद्योगाच्या परिषदेत सरकार काही धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. रुपयाची घसरण आणि क्रुडची वाढ मंदावल्यामुळे काही गुंतवणूकदारांकडून खरेदी होत असल्यामुळे निर्देशांक वाढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)