घसरगुंडी …!

सुटीच्या दिवशी नातवाला घेऊन बागेत जाणे हा आमचा एक आवडीचा कार्यक्रम. पूर्वी घरातील सर्वजण बागेत जात असत. पूर्वी, म्हणजे फार फार पूर्वी. आता फक्त बालवाडीतला नातू आणि निवृत्त मी, आम्ही दोघेच जातो; अत्यंत उत्साहाने! घरातील बाकी कोणला फुरसत नसते. दुपारची झोप झाली की आवरून चहा घेऊन बागेत जायचे. बागेत हिरवळीवर धावण्या-बागडण्यात, लोळण्यात, झोका-घसरगुंडी खेळण्यात वेळ कसा जातो, हे कळतच नाही. बाग बंद व्हायची वेळ झाल्यानंतरच घरी जायची आठवण होते.
खरं तर दुपारी दोघांनाही झोपायचे नसते. दुपारी करण्यासारख्या घरातसुद्धा असंख्य गोष्टी असतात; पण नातवाला त्याची आजी जबरदस्तीने झोपायला लावते म्हणून तो झोपतो किंवा झोपेचे नाटक करतो आणि आजोबा डोळे टक्क उघडे ठेवून सीलिंगमधील संथ गतीने फिरणाऱ्या पंख्याकडे बघत बेडवर पडून राहतात… साडेचार वाजण्याची वाट बघत.
नातवाला अजून “ज’ म्हणता येत नसल्याने तो आजोबांना “आदोबा’ असेच म्हणतो नेहमी. पण आजोबाइतकेच किंवा त्याहून थोडे जास्तच, “आदोबा’ गोड वाटते ऐकायला.
“”आदोबा, बागेत तला!” तो म्हणतो. बागेत जाणे हा त्याच्या अत्यंत आवडीचा भाग. एका पायावर म्हणतात तसा तयार असतो बागेत जायला. सुदैवाने आमच्या घराजवळच एक सोडून दोन बागा आहेत.
बागेत गेल्यावर ओळखीचे अनेक लोक भेटतात. नवीन ओळखी होतात. काही टिकतात, काही एखादे फुलपाखरू फुलांभोवती बागडून निघून गेल्यावर जेवढे लक्षात राहते, तेवढ्याच टिकतात. बरीच मंडळी नित्य नियमाने येणारी असते. त्यात पहिल्या आणि तिसऱ्या पिढीचे-म्हणजे आजी-आजोबा आणि नातवंडे यांचे प्रमाण मोठे.
दुसरे एक आजोबा आहेत. त्यांना निवृत्त होऊन सात-आठ वर्षे झालीत. ते नातीला घेऊन येतात, फक्त शनिवारी-रविवारी. एरवी त्यांच्या वाट्याला नात येत नाही, शाळा-क्‍लास-पाळणाघर… असा तिचा दिवस जातो. शनिवारी-रविवारी ती आजोबांच्या वाट्याला येते.
नातीच्या सुखाच्या बाबतीत माझा थोडासा “नटसम्राट’ झाला आहे, असे ते गप्पा मारताना कधी कधी म्हणतात. त्यांच्या चेहऱ्यावर खंत असते. त्यांचा स्वत:चा बंगला आहे, घरात एक सोडून दोन गाड्या, एक बाईक आहे. एक ड्रायव्हरही आहे; पण ते रिक्षाने येतात नातीला घेऊन.
नात आई-बाबांबरोबर काही कारणाने बाहेरगावी गेल्याने आजोबा बागेत एकटेच यायचे. रोजच. घरी करमत नाही म्हणायचे. बागेत आले, की घसरगुंडीजवळ उभे राहायचे. घसरगुंडीला हात लावून. खेळणाऱ्या मुलांकडे बघत राहायचे. त्यांच्या नजरेत आसूसलेपण असायचे.
एका बिनसुटीच्या दिवशी बागेत बिलकूल गर्दी नव्हती. मोजकी चार मंडळी होती, तेव्हाही तासन्‌ तास त्यांना असे घसरगुंडीला धरून उभे पाहून मी म्हटले, “”दादा, तिकडे बाकावर का बसत नाही, असे उभे राहण्यापेक्षा.”
क्षणभर ते गप्प राहिले. मग हळुवार आवाजात म्हणाले, “”खरं सांगू का, कधी तरी पुन्हा लहान व्हावेसे वाटते. नातीला घेऊन येतो ना, तेव्हा तिच्यासोबत मीही मनाने घसरगुंडी-झोका खेळत असतो. आता ती नाही, तर बेचैन होते बघा. कधी मलाही घसरगुंडी’ खेळायची मोठी ऊर्मी येते बघा.”
मी त्यांच्याकडे पाहिले, त्यांच्या डोळ्यातील हरवलेले बालपण पाहून म्हटले, “”मग खेळा की ! आज तर बागेत कोणीच नाही. खेळा घसरगुंडी!”
ते बिचकत बिचकत घसरगुंडीच्या पायऱ्या चढू लागले. पाचपन्नास वर्षात घसरगुंडीच्या पायऱ्या कधी चढलेच नसावेत. डगमगत्या पावलांनी घाबरत घाबरत वर गेले. घसरगुंडीच्या उतरणीवर पाय सोडून बसले. बाजूच्या कठड्यांना पकडून. पायातील चपला त्यांनी पाय झटकून फेकून दिल्या, खट्याळपणेच. मी म्हटले, “”या आता खाली…” त्यांनी इकडे तिकडे बघितले, हात उंच केले, आणि घसरगुंडीवरून स्वत:ला खाली झोकून दिले. त्या नागमोडी घसरगुंडीवरून ते काही क्षणात खाली आले. हात झटकत उठून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातच नाही, तर साऱ्या शरीरात उल्हास भरला होता. माझा हात हाती धरून ते हर्षाने म्हणाले, “”भाऊ, कितीतरी वर्षांनी आज मला खरा आनंद काय असतो ते कळले. थॅंक यू… थॅंक यू सो मच… आणि ते पाठ फिरवून चालत राहिले. त्यांच्या चालण्यातही आता चैतन्य आल्यासारखे वाटत होते.

– नरेंद्र आढाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)