घरात मधुमेही रुग्ण आहे, मग हे अवश्‍य वाचा…

मधुमेही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जबाबदाऱ्या…

मधुमेह हा इतका परिचित आजार आहे, की जवळजवळ सर्व नागरिकांना याची जुजबी तोंडओळख असतेच. तरीही, जेव्हा आयुष्यभर डायबेटीस सांभाळायचा असतो तेव्हा तो सर्वांनाच कंटाळवाणा होऊ शकतो. त्याचमुळे डायबेटीस कंट्रोलची जबाबदारी जर सर्व आप्तेष्टांनी उचलली तर पेशंटची उमेद आणि इच्छा हे दोन्ही वृद्धिंगत होते, पर्यायाने रुग्णाला निरामय आयुष्य लाभते. म्हणूनच काही आवश्‍यक गोष्टींचा ऊहापह करणे गरजेचे आहे.

प्रथम सर्व कुटुंबियांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की मधुमेह, हा वेदना न देणारा पण तरीही गंभीर आजार आहे. हा आजार सुदृढ अवयवांना निकामी करतो. त्याचमुळे फक्त शुगरचा आकडा म्हणजे डायबेटीस ही कल्पना डोक्‍यात ठेऊन आपण गाफिल राहू नये. नॉर्मल साखर असणे हा मधुमेह नियंत्रणाचा एक भाग आहे. मधुमेहतज्ज्ञ डॉक्‍टर हे साखरेच्या आजाराचे शरीरावर होणारे अपाय टाळण्यासाठी, संपूर्ण शरीर तपासून आवश्‍यक ते सर्व उपाय करत असतात. त्याचमुळे घरी मशिनवर किंवा लॅबमध्ये साखर नॉर्मल आली तरी, आपला रुग्ण साधारण वर्षातून 4-6 वेळा तरी योग्य त्या मधुमेहतज्ज्ञांकडे शरीर तपासणीकरिता नेणे अत्यावश्‍यक आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी ही बाब प्रामुख्याने लक्षात ठेवावी.

रुग्णाच्या नातेवाईकांनी पेशंटसोबत मधुमेहतज्ज्ञांकडे जाऊन रुग्णाच्या आजाराची शास्त्रीय माहिती ठेवावी. साधारण एका जबाबदार व्यक्तीने कायम डॉक्‍टरांकडे यावे व मग घरच्या सर्वांना माहिती द्यावी. दरवेळेस वेगवेगळे नातेवाईक रुग्णासोबत असल्यास संभाषणत्रुटी राहतात व कोणालाच नीट काही माहीत नाही असे होते. डॉक्‍टरांनी सांगितलेल्या अवांतर चाचण्या नियमितपणे केल्या जातात का? पेशंटची पुढची ऍपॉईंटमेंट काय आहे? औषधे योग्य आहेत का ते वाचून पाहणे, औषधांची पॉवर, नाव हे डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशी जुळते आहे ना हे नातेवाईकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे.

बऱ्याच वेळेस पेशंटच्या औषधोपचारात 3-4 दिवस खंड पडलेला आढळतो, कारण मुलांना औषधे आणण्यास वेळ मिळाला नाही, गावी गेलो होतो, घरात लग्न होते अशी कारणे सांगितली जातात. काही वेळा पेशंटची ऍपॉईंटमेंट चुकते व पुन्हा भेटेपर्यंत रुग्णाला काय करावे हे न समजल्याने औषधे बंद राहतात. या व अशा कोणत्याही इतर कारणांनी दिलेल्या औषधात खंड पडता कामा नये. कोणतीही शंका असली तरीही डॉक्‍टरांना भेटून निराकरण करावी.

कित्येक रुग्णांचे नातेवाईक पेशंट ऐकत नाहीत असे सांगतात. जवळजवळ 70 टक्के मधुमेही रुग्णांमध्ये चिडचिड, झोपेच्या तक्रारी, डिप्रेशन, उपचारांशी जुळवून न घेणे असे विविध कंगोरे आढळतात. अशा वेळी नातेवाईकांनी अशास्त्री सल्ले टाळून फक्त डॉक्‍टरांच्या शास्त्रशुद्ध उपचारांकडे भर द्यावा. गंडेदोरे, बुवाबाजी, अशास्त्री जाहिराती, इंटरनेटची अर्धवट माहिती, मित्र-मैत्रिणींचे अनुभव या कोणत्याही गोष्टींनी विचलित न होता फक्त, नियमित शास्त्रशुद्ध उपचारांवर भर द्यावा. विसंगत सल्ल्यांमुळे पेशंट वैतागतो.

पेशंटला सतत सूचना, टोमणे, अतिरिक्त शिस्त असे करू नये, किंवा उगीच मोकाटही वागू देऊ नये. Balanced व deciplined वर्तणूक ठेवावी. पेशंटच्या विचित्र वागण्यासाठी काही वेळा मानसोपचारतज्ज्ञांचे उपचारही घ्यावे लागतात.

पेशंटचा आहार हा अनेकदा वादाचा विषय असतो. शुगर जसजशी वाढते तशी पेशंटची भूक वाढते. पेशंट खा खा करतो, नातेवाईकांना वाटते, वा! उत्तम, भूकबिक छान आहे. आणि मग मधुमेह नियंत्रणात येत जातो तेव्हा भूक कमी होते, किंबहुना नॉर्मलवर येते. नातेवाईकांनी ही विसंगती नीट लक्षात ठेवावी, की भूक कमी असणे हे योग्य साखर नियंत्रणाचे द्योतक आहे. आपल्या पेशंटचा योग्य मधुमेहतज्ज्ञांकडून डाएटचार्ट करून घेणे व तो पाळण्यास सर्वतोपरी व सर्वांनी सहकार्य करणे ही नातेवाईकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.

पेशंटच्या औषध खर्चाचे, Health insurance चे सुयोग्य नियोजन करणे हे फार महत्त्वाचे असते. डॉक्‍टरांच्या नियमित visit बऱ्याचदा पैशापायी किंवा अज्ञानामुळे टाळल्या जातात. असे केल्याने पुढे मधुमेह अनियंत्रित राहून जास्त आरोग्यखर्च उभा राहतो व अवयवहानी होऊ शकते. त्यामुळे खर्चाचे सुयोग्य नियोजन वेळीच केले पाहिजे.

व्यायामबद्दल अयोग्य सल्ले दिल्यास बी. पी., हृदयविकार, रेटिनोपॅथी बळावू शकते, त्यामुळे फक्त मधुमेहतज्ज्ञांकडूनच व्यायामाबद्दल विचारून तसा व्यायाम ठेवावा.
अगं आई गं! रोज इंजेक्‍शन का! किंवा मला बाई रक्त पाहिलं की भोवळच येते, किंवा खा हो थोडं श्रीखंड, आनंदासाठी सगळं चालतं, अशा निगेटिव्ह, अशास्त्रीय कॉमेंट्‌स पेशंटसमोर करू नये. पेशंटची कीव करू नये, तसेच पेशंटच्या न जुमानण्याने घाबरून जाऊ नये. शेवटी काळजी घेणे आणि काळजी करणे यात फार मोठी तफावत आहे लक्षात घेऊन शिस्तीने व आनंदाने मधुमेहासह जगावे. stitch in time, saves nine हेच खरे.
– डॉ. गौरी दामले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)