घरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद

घरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण
आरोपी 24 तासांत जेरबंद ः समर्थ पोलिसांची कामगिरी
पुणे, दि. 16 – एका ज्येष्ठ नागरिकास घरात घुसून चार जणांच्या टोळक्‍याकडून जबर मारहाण करण्यात आली. या गुन्ह्यातील चारही आरोपींना समर्थ पोलिसांनी 24 तासांच्या आत जेरबंद केले.
कुणाल अनिल शिर्के, चेतन दिलीप मोरे, मंगेश दत्तात्रय दरगुडे, रोहित संजय खेडकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी किरण अनंतराव शिंदे (वय 53, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या 83 वर्षांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली होती.
यासंदर्भात सविस्तर असे की, फिर्यादी यांच्या घरासमोर येण्या-जाण्याच्या रस्त्यावर कुणाल शिर्के हा कुल्फीची हातगाडी लावतो. या गाडीमुळे फिर्यादीला घरात येण्या-जाण्यास अडचण होत होती. यासंदर्भात किरण यांनी कुणाल आणि त्याच्या हातगाडीवर काम करणाऱ्या कामगारांना रस्त्यामध्ये गाडी लावू नका ती काढून घ्या, असे सांगितले होते. या गोष्टीचा राग मनात धरून कुणाल शिर्के आणि त्याच्या तीन साथीदारांनी रविवारी रात्री 12 वाजता फिर्यादीचे घर गाठले. त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून किरण आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून हाताने आणि लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर जाताना त्यांच्या घराच्या दरवाजाचे नुकसान केले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोसले व पोलीस शिपाई सुमित खुट्टे, नीलेश साबळे, समीर आवळे, पोलीस नाईक, नितीन घोसाळकर व सुनील घाडगे यांनी हातगाडी मालक कुणाल शिर्के याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इतर तीन आरोपींची नावे उघड झाली. त्याप्रमाणे इतर आरोपींचा शोध घेतला असता ते राहत्या घरी मिळून आले नाही. दरम्यान पोलीस शिपाई सुनील खुट्टे यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांची माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)