घराणेशाहीचा वेलू…

– विश्‍वास सरदेशमुख

घराणेशाहीविषयी ज्या तिखट चर्चा होत होत्या त्या प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशानंतर होत नसल्याचे चित्र आहे. कारण स्पष्टच आहे काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत बहुतेक सर्वच राजकीय पक्ष आणि सर्वच राज्यांमध्ये घराणेशाहीने आपली मुळे रूजवली आहेत. भाजपामधील सर्वोच्च नेतृत्वाच्या पातळीवर कॉंग्रेसप्रमाणे घराणेशाही नाही पण पक्षात मोठ्या संख्येने नेत्यांची मुले महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत.

देशातील राजकारणात घराणेशाहीची सुरुवात करण्याचा आरोप नेहरू घराण्यावर केला जातो. आज मोतीलाल नेहरूंची पाचवी पिढी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करते आहे. त्यामुळेच कॉंग्रेस हा कौटुंबिक पक्ष असल्याची टीका होते. अर्थात हे आरोप लावणारेही याच घराणेशाहीमध्ये गुरफटले आहेत. काश्‍मीरमध्ये अब्दुल्ला कुटुंब, मुफ्ती कुटुंब, उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, पासवान कुटुंब, तमिळनाडूमध्ये डीएमके करुणानिधी कुटुंब, मारन परिवार हे सर्व एखाद्या राजेशाही परिवार असल्यासारखेच स्थापन झाले आहेत.

ओडिशामध्ये बीजू पटनायक यांचा मुलगा नवीन पटनायक मुख्यमंत्री आहे, जगजीवनराम यांची मुलगी मीरा कुमार लोकसभा अध्यक्ष आणि हेमवतीनंदन बहुगुणा यांचा मुलगा विजय बहुगुणा हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची मुलगी रीटा बहुगुणा उत्तर प्रदेशात मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी कॉंग्रेसमध्ये आहे.

घराणेशाहीवरून कॉंग्रेसला डिवचणाऱ्या शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनीही देखील पक्षाची जबाबदारी त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे याच्याकडेच सोपवली. आता उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य युवासेनेची जबाबदारी पेलतो आहे.
महाराष्ट्रात शरद पवार, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन यांच्या मुलांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. पवारांची तर तिसरी पिढी यंदा मैदानात आहे. मध्य प्रदेशात अर्जुन सिंह आणि दिग्विजय सिंह यांचा मुलगा कॉंग्रेसमध्ये आहेत. सिंदिया राजघराणे कॉंग्रेस आणि भाजपमध्ये वाटले गेले आहे.

मुलायम सिंहांप्रमाणे मायावती यांनी देखील आपला भाऊ आनंद कुमार याला पद बहाल केल्यानंतर आता भाचा आकाश याला पक्षात सामावून घेण्याच्या तयारीत आहेत. चौधरी चरणसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाची जबाबदारी त्यांचा मुलगा अजित सिंह आणि नातू जयंत चौधरी याच्याकडे आहे. पंजाब राज्यात बादल कुटुंबीय आणि कॉंग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे कुटुंब आहे. हरियाणाचे तीन लाल- देवीलाल, बन्सीलाल आणि भजनलाल यांच्याबरोबर भुपेंद्र सिंह हुड्डा, सुरजेवाला यांच्यासह अनेक घराणी आहेत. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा मुलगा, मुलगी आणि जावई देखील राजकारणात आहेत. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा सध्या कर्नाटकचा मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे माजी पूर्व मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा जावई चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री आहेत. जगन रेड्डी यांनी आपल्या माजी मुख्यमंत्री पित्याच्या नावे पक्ष निर्माण केला आहे.

भाजपमध्येही घराणेशाही वाढली आहे. हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल आणि त्यांचा मुलगा अनुराग ठाकूर भाजपचे आमदार आहेत. कल्याणसिंह, राजनाथ सिंह, वसुंधरा राजे, रमणसिंह, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लालजी टंडन, लखीराम अग्रवाल या नेत्यांची मुले मंत्री, खासदार किंवा आमदार आहेत. विजयाराजे सिंदिया यांची मुलगी वसुंधराराजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या आणि दुसरी मुलगी यशोधराराजे मध्य प्रदेशात मंत्री होत्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रविशंकर प्रसाद आणि जयंत सिन्हा हे सर्वच नेता पुत्र आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी दोन्हीही भाजप खासदार आहेत. इतर राज्यातही भाजपची अशीच काही स्थिती आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)