घराजवळचा रस्ता करता आला नाही, ते काय उड्डाणपूल करणार- आमदार संग्राम जगताप

आमदार संग्राम जगताप यांची खासदार दिलीप गांधींवर टीका

नगर: महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसने जय्यत तयारी केली आहे. सर्व प्रभागांचा बारकाईने अभ्यास करून सक्षम व जनतेतील उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची संख्या होती, त्यामुळे उमेदवार निवडताना मोठी स्पर्धा होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दाम काही गैरसमज पसरवून शहरातील वातावरण बिघडवले जात आहे. विकासाचे मुद्दे दूर गेले आहेत. आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे. मात्र याच रस्त्यावर राहणाऱ्या मोठ्या लोकप्रतिनिधीला शहरामध्ये असे एकही मोठे काम करता आले नाही, ज्यांना आपल्या घराजवळचा रस्ता करता आला नाही, ते काय उड्डाणपूल करतील ? अशी तोफ आ. जगताप यांनी खासदार गांधींवर नाव न घेता डागली.

-Ads-

राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करत आम्हाला अडचणीत आणून खोट्या प्रकरणात आत टाकून औरंगाबादला ठेवले. प्रशासनावर मंत्र्यांचा दबाव आणून आमच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र आम्ही डगमगलो नाही, प्रसंगाला सामोरे गेलो. अशा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जर अशा विचारांची येणाऱ्या दिवसात वाढ झाली तर, त्याचे परिणाम आम्ही भोगली आहेत. उद्या तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते, असेही ते म्हणाले.

आ. जगताप पुढे म्हणाले, महापौर असताना तसेच आमदार अरुण जगताप व माझ्या आमदार निधीतून शहरामध्ये सर्व भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. सारसनगर परिसरात मोठे विकास कामे केली, अनेक पूल तयार केले. फेज टू योजना आज फक्त सारसनगर मध्येच कार्यान्वित झाली आहे.

यावेळी गणेश भोसले, प्रकाश भागानागरे, शीतल जगताप, मीना चोपडा, संजय चोपडा, राष्ट्रवादी शहराध्यक्ष माणिक विधाते, कांतीलाल गुगळे, डॉ. विजय भंडारी, बबन घुले, प्रा. पोपट काळे, अर्जुन बोरुडे, विठ्ठल गुंजाळ, अलका मुंदडा, दिनेश जोशी, सुमतिलाल कोठारी, बापूसाहेब कुलट, ज्ञानदेव पांडूळे आदींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कराळे यांनी केले.

What is your reaction?
10 :thumbsup:
4 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)