घरांच्या विक्रीत तुलनात्मक वाढ; अहवालाचे निष्कर्ष

बर्लिनला “क्रेडाई नॅशनल’चे 18 वे वार्षिक आंतरराष्ट्रीय अधिवेशन

पुणे – मागील वर्षांचा आढावा घेता प्रमुख सात शहरांमध्ये उभारण्यात येत असलेल्या घरांच्या विक्रीत तुलनात्मक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातही घरांच्या विक्रीत अल्प वृद्धी झाली आहे. यामुळे विकासकांमध्ये नवी आशा निर्माण होत असल्याचे “क्रेडाई’ने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचेही हेच मत असून, नुकत्याच बर्लिन येथे झालेल्या तीन दिवसीय “क्रेडाई नॅशनल’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा आढावा घेण्यात आला.

-Ads-

“क्रेडाई’च्या या 18 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अधिवेशनात “क्रेडाई-जेएलएल’, “क्रेडाई-कुशमन’ आणि “वेकफील्ड’ हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी “क्रेडाई-जेएलएल’च्या अहवालानुसार, घरांच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तसेच “क्रेडाई-कुशमन’ आणि “वेकफील्ड’तर्फे सादर झालेल्या आणखी एका अहवालानुसार, बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीत 10,080 कोटी रुपयांची वाढ झाल्याचेही निदर्शनास आणले गेले.

या परिषदेत “क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष जाक्षेश शहा, उपाध्यक्ष सतीश मगर, “क्रेडाई महाराष्ट्रा’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासह 1000 पेक्षा अधिक सदस्य, विकसक आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ व्यावसायिक आणि सहायक उद्योजक सहभागी झाले होते. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला “क्रेडाई महाराष्ट्रा’ने कायमच प्रोत्साहन देत असून त्याचा बांधकाम क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे कटारिया यांनी या परिषदेत सांगितले. सरकारनेही अशा प्रकल्पांच्या निर्मितीवर विशेष सवलत दिल्याने त्याचा आगामी काळात निश्‍चितच फायदा होणार असल्याचेही कटारिया यांनी नमूद केले.

क्रेडाई-जेएलएलच्या अहवालाप्रमाणे, गुंतवणुकीशी संबंधित “रिअल इस्टेट’ क्षेत्रातील वाढती मागणी दोन घटकांवर आधारित असू शकते. “रेरा’च्या अंमलबजावणीमुळे खरेदीदारांचा आत्मविश्वास प्रथमच वाढला आहे. आणि दुसरी बाब म्हणजे बहुतांश राज्यांत भांडवली मूल्यांकन स्थिर ठेवल्याने घर खरेदीला मागणी वाढताना दिसत असल्याचेही कटारिया म्हणाले. तसेच मुंबईत सर्वाधिक मागणी वाढली असून त्या खालोखाल बंगळुरूमध्येही घरांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातही सुमारे दोन टक्‍क्‍यांनी मागणी वाढल्याचे कटारिया यांनी सांगितले.

सर्वाधिक रोजगार निर्मिती देणाऱ्या या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी “क्रेडाई’ कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेच्या या दृष्टिकोनामुळे बांधकाम क्षेत्राला पुनरुज्जीवन मिळण्यास मदत झाली असून, भविष्यासाठी एक मजबूत पाया ‘क्रेडाई’ने रचला आहे. या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणे आणि या क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न आघाडीवर आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही परिषद असल्याचे मत यावेळी मगर यांनी व्यक्त केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)