घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक

पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. या चोरट्यांच्या मुस्क्‍या आवळण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख 10 हजार रूपयांचे एकूण 70 ग्रॅम सोने जप्त केले आहे. अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

अक्षय बापु खंडाळे (वय 22, रा. शेलार चाळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचे अन्य दोन साथीदार दिपक उत्तम डाखोरे (वय 19, रा. हनुमानचाळ, बिबवेवाडी) आणि विकास दत्तात्रय कापसे (वय 20, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. शहरात वाहन चोरी तसेच घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने पेट्रोलींग तसेच गस्तीवर भर दिला जात आहे. भारती विद्यापीठ पोलीसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्याचवेळी घरफोडीतील फरार आरोपी अक्षय खंडाळे हा गोकुळनगर चौकातील एका पान टपरीजवळ असल्याची माहिती कर्मचारी प्रदिप गुरव यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली.

त्यानुसार पोलीसांनी लागलीच घटनास्थळी सापळा रचून खंडाळे याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्यांने घरफोड्या केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपयांचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलीसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपुर्वी पोलीसांनी त्याचे साथीदार दिपक डाखोरे व विकास कापसे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणत चार मोबाईल व 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले होते. आतापर्यंत तिघांकडून घरफोडी गुन्ह्यातील एकूण 5 लाख 81 हजार रुपयांचा माल पोलीसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, अहिवळे, कर्मचारी प्रदिप गुरव, विनोद भंडलकर, भिमराव पुरी, गणेश सुतार, समीर बागसिराज, बाबा नरळे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)