घरफोडीची “स्टाईल’ बदलतेय

पिंपरी – शहरात घरफोडीचे प्रमाण दिवसें-दिवस वाढतच चालले आहे. सीसीटिव्ही, सेफ्टी डोअर, सिक्‍युरिटी गार्ड असे सगळे सुरक्षा कवच भेदून चोऱ्या होत आहेत. रात्री-अपरात्री नव्हे तर भर दिवसा अवघ्या काही मिनिटांत चोर ऐवजावर हात साफ करत आहेत. पिंपळे गुरव येथे चक्क “सेफ्टी डोअर’ तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. चोरट्यांची चोरीची बदलती शैली पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

तळेगावमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेने या गुन्ह्याची तीव्रता अधिक गडद झाली आहे. नामांकित कंपनीतून सेवा निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बंगल्याची खिडकी काढून तब्बल 23 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. यामध्ये 14 किलो चांदी, 90 तोळे सोने, साडे तीन लाखाच्या डायमंड रिंगा आणि दीड लाख रुपयांची रोकड असा डोळे विस्फारणारा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही चोरी करताना चोरट्यांनी चक्क घराची खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. सांगवी पोलिसांनी नुकतेच एका सराईत चोराला पकडले. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने शहर परिसरात तब्बल 18 घरफोड्या केल्या होत्या. मागील दोन महिन्यातील घटना लक्षात घेता घरफोडी आता केवळ रात्री किंवा मध्यरात्री होत नाही तर ती भरदिवसा किंवा माणसे घरात असतानाही होत आहे.

चोरांची कुशलता एवढी वाढली आहे की अवघ्या काही मिनिटांत कोणताही आवाज न करता घरातील मुद्देमाल साफ करत आहेत. सांगवी पोलिसांनी पकडलेल्या सराईत हा त्याच्या पायातील सॉक्‍समध्ये चोरीचे सामान लपवून आणत असे. घरफोडीसाठी केवळ कडी, कुलूप तोडणे एवढी पद्धती मर्यादीत राहिली नाही तर तळेगावातील घटनेप्रमाणे थेट खिडकीची जाळी खोलून काढणे, सुरक्षा दरवाजा वेल्डींग करुन काढणे, दरवाज्याचे लॅच तोडणे अशा अद्यावत पद्धतीने या चोऱ्या केल्या जात आहेत. निगडी-प्राधिकरण येथे घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये घराचा दरवाजा अर्धवट उघडा असताना घरात घुसून चोरट्यांनी करोडोंचा ऐवज भरदिवसा चोरला होता. यावेळी पोलिसांनी बंगल्यांच्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले व त्यानेच घरफोडी केल्याचे पुढे उघडही झाले. निगडी येथेच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या नातेवाईकाच्या घरीही लाखोंची चोरी झाली होती.

या घटना प्राधिकरण, पिंपळे सौदागर, सांगवी सारखे उच्चभ्रू वसाहती चोरांकडून टार्गेट केल्या जात आहेत. अशा परिसराची सुरुवातीला पाहणी केली जाते. त्यासाठी त्यांची एक टोळीच कार्यरत असते. ज्या घरातील सर्वजण नोकरी किंवा शाळेसाठी घर बंद करुन जातात अशा बंद घरांना चोरटे लक्ष करतात. फ्लॅट किंवा बंगल्यामध्ये शेजारी फारसे लक्ष देत नाहीत. ही बाब चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडते. त्यामुळे या कानाची गोष्ट त्या कानाला कळेपर्यंत चोरांनी शहर देखील सोडलेले असते. स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाच्या स्थापनेनंतर चोरांवर धाक बसेल, अशी शक्‍यता वर्तवली जात असताना आयुक्‍तालयाच्या निर्मितीनंतर अवघ्या पंधरा दिवसात शहरात दहा घरफोड्या झाल्या आहेत.

नागरिकांनीही घ्यावी दक्षता…
घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घर, गृहप्रकल्प किंवा दुकानांमध्ये सीसीटीव्हीचे प्रमाण वाढवावे गरजेचे आहेत. त्यामुळे चोरट्यांची चेहरेपट्टी किंवा गाडीचा क्रमांक, हलचालींची नोंद होईल. शटर किंवा दरवाजाला स्क्रूने फिट केलेले कडी-कोयंडे वापरु नयेत. सोसायटी किंवा दुकानाच्या परिसरात नागरिकांनी विश्‍वासू सुरक्षा रक्षक नेमावेत. घर किंवा दुकान भाड्याने देताना संबंधितांशी रितसर करार करावा. शक्‍यतो घर व दुकानासाठी “सेंट्रल लॉकींग’ पद्धती असावी, शेजाऱ्यांशी संपर्क वाढवावा. बाहेरगावी जाताना घरातील दागिने किंवा मौल्यवान वस्तू या बॅंक लॉकर किंवा नातेवाईकांकडे ठेवावेत.

शहरात प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन पथक तयार केले आहेत. यामध्ये पोलीस उपनिरिक्षक ते पोलीस शिपाई अशा आठ जणांचा समावेश आहे. त्यावर वरीष्ठ पोलीस निरीक्षकाचे नियंत्रण असते. ही पथके नियमीतपणे परिसरात गस्त घलतात. ही गस्त रात्री असतेच त्याचबरोबर दिवसा देखील गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले आहे. तसेच घरफोडी किंवा चोरी घडली तर अगदी काही मिनिटांत हे पथक घटनास्थळी जाऊन पाहणी करते. त्यामुळे गुन्ह्यांची उकल सुद्धा लवकर होते. यासाठी आम्ही फौजफाटा वाढवला आहे. परंतु, नागरिकांनीही सतर्कता बाळगली तर अशा गुन्ह्यांना नक्कीच आळा बसेल.
– सतीश पाटील, सहायक पोलीस आयुक्‍त.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)