घरपोच बॅंक सेवा (अग्रलेख)

भारतातील निरक्षर नागरिक, वयस्कर नागरिक आणि बॅंकेची भाषा न समजणारे सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी पोस्ट सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. टपाल किंवा पोस्ट खात्याशी सर्वसामान्य नागरिकांचे असलेले परंपरागत नाते आणि पोस्ट खात्याचा देशभर असलेला प्रचंड विस्तार, यामुळे हा बदल आपल्या देशाला 100 टक्‍के बॅंकिंगकडे घेऊन जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेची जी माहिती समोर आली आहे, ती भारतातील बॅंकिंगला खऱ्या अर्थाने गती देईल. 
आर्थिक सामिलीकरणाची मोहीम म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांना बॅंकिंग करण्याची संधी देणे. तब्बल 1.55 लाख कार्यालये आणि भारतीयांचा प्रचंड विश्वास असणाऱ्या टपाल खात्यावर ही जबाबदारी सोपविली तर? आजपासून होणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेच्या प्रारंभामुळे त्या मोहिमेस खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे. भारत सरकारने बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले त्याला गेल्या 19 जुलै रोजी 49 वर्षे पूर्ण झाली. देशाचा सुनियोजित आर्थिक विकास करण्यासाठी आणि संपत्तीच्या वितरणासाठी सरकारला हे आवश्‍यक वाटले.
शेती क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा करता यावा, देशात बॅंकिंगचा वेगाने प्रसार व्हावा, शहरांसोबत ग्रामीण भागाला बॅंकिंगचे लाभ मिळावेत आणि त्यावेळी 70 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक नागरिक बॅंकिंगच्या बाहेर होते, त्यांना बॅंकिंगमध्ये आणता यावे, असा या ऐतिहासिक निर्णयाचा उद्देश्‍य होता. गेल्या 49 वर्षांत बॅंकिंगचा एक मोठा पल्ला आपण गाठला असला तरी हे उद्देश्‍य साध्य झाले, असे आजही म्हणता येत नाही. अर्थात, राष्ट्रीयीकरणातून बॅंकिंगचा विस्तार झाला आणि त्या उद्देशाच्या दृष्टीने कामही झाले. मात्र प्रत्येक भारतीय नागरिकाला तो बॅंकिंगमध्ये आणू शकला नाही. त्यामुळेच 2014 मध्ये सरकारला पुन्हा पंतप्रधान जनधन बॅंक खात्याची योजना सुरू करून देशातील 100 टक्‍के नागरिकांना बॅंकिंगची सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. आज या योजनेअंतर्गत विक्रमी साडेबत्तीस कोटी नागरिकांनी बॅंकेत जनधन खाते काढले आहे आणि तरीही काही नागरिकांना हा लाभ अजून मिळालेला नाही. कारण बॅंकांना अशी खाती काढण्यात रस नाही, बॅंकचे व्यवहार करण्यास सर्वसामान्य माणूस अजूनही घाबरतो आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे एवढी प्रचंड खाती सांभाळण्याची यंत्रणा नाही.
मग हे कसे घडवून आणायचे, असा प्रश्‍न सरकारला पडला तेव्हा सबसिडीचे वाटप जनधन खात्यातून करण्याचा आणि गरजू नागरिकांना सर्व मदत याच खात्यांतून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण त्यानंतरही सबसिडी आणि इतर मदत खात्यात जमा करून घेण्यापलीकडे या खात्यांचा वापर होत नाही, असेही लक्षात आले. या प्रश्‍नाचे एक चांगले उत्तर सरकारला सापडले असून इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेची आज (1 सप्टेंबर) होणारी सुरुवात हा त्याचाच भाग आहे. इंटरनेट आणि खासगी कुरियरच्या या काळात पोस्ट खाते काहीसे मागे पडले असे वाटत असले तरी या नव्या बॅंकेच्या माध्यमातून त्याचा जणू नव्याने उदय होतो आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरपोच बॅंक सेवा देण्याची एक चांगली सुरुवात इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक करते आहे. भारतातील निरक्षर नागरिक, वयस्कर नागरिक आणि बॅंकेची भाषा न समजणारे सर्व सामान्य नागरिक यांच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
टपाल किंवा पोस्ट खात्याशी सर्वसामान्य नागरिकांचे असलेले परंपरागत नाते आणि पोस्ट खात्याचा देशभर असलेला प्रचंड विस्तार, यामुळे हा बदल आपल्या देशाला 100 टक्के बॅंकिंगकडे घेऊन जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेची जी माहिती समोर आली आहे, ती भारतातील बॅंकिंगला खऱ्या अर्थाने गती देईल, अशीच आहे. उदा. आज या बॅंकेच्या 650 शाखा सुरु होत असून 3,250 केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण आणि शहरी भागातील 11 हजार पोस्टमन पहिल्या टप्प्यात घरपोच बॅंकसेवा देणार आहेत. पोस्टात आज 17 कोटी बचत खाती असून ती खाती या नव्या बॅंकेला जोडली जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशात आज असलेल्या 1.55 लाख टपाल कार्यालयात ही बॅंक या वर्षअखेर सुरू होणार आहे. याचा अर्थ सध्या जेवढ्या बॅंक शाखा देशात आहेत, त्यापेक्षा 15 हजार अधिक बॅंक शाखा या माध्यमातून सुरू होत आहेत. याचा दुसरा अर्थ असा की, सहा लाख 40 हजार 887 गावे असलेल्या या देशात या वर्षअखेरीस बॅंकांच्या तब्बल तीन लाख शाखा बॅंक सेवा पुरवत असतील. यातून बॅंकिंगमध्ये चांगली स्पर्धा सुरू व्हावी आणि त्यांना ग्राहकांना चांगली सेवा मिळणे अपेक्षित आहे.
इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक ही पेमेंट बॅंक आहे, ती सर्व सेवा देऊ शकणार नाही, हे जरी खरे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना ज्या सेवा लागू शकतात, त्या सर्व सेवा ही बॅंक देणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारची 100 टक्‍के मालकी असलेल्या पोस्ट खात्याने ही जबाबदारी घेतली असल्याने बॅंकेसाठी जागा, कर्मचारी आणि विस्तार या बाबी सोप्या झाल्या आहेत. पोस्टाकडे असलेली अतिरिक्‍त जागा, इमारती आणि साधने नव्या बॅंकेसाठी वापरली जातील. शिवाय पोस्टावर नागरिकांचा जेवढा विश्‍वास आहे, तेवढा तर तो बॅंकांवरही नसल्याने या बॅंकेचा स्वीकार फार लवकर होईल. ही बॅंक कर्ज तसेच क्रेडिट कार्ड देणार नाही, पण बॅंकिंगच्या इतर सर्व सेवा ती देईल.
एका लाखांपर्यंतच्या ठेवी स्वीकारणे, मोबाईल पेमेंटस, रिमीटन्स सेवा, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग अशा सर्व सेवा ती देईल. असंघटित कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बॅंकिंग सुविधा मिळावी, हाच या बॅंकेचा उद्देश असल्याने त्यानुसार सेवा पुरविण्याची योजना या बॅंकने केली आहे. इंटरनेट व्यवहार करणाऱ्यास कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही. क्‍यूआर कोडमार्फत आपल्या खात्यात व्यवहार करण्याची सोय ही बॅंक देणार आहे. त्यामुळे बॅंक खाते लक्षात ठेवण्याचीही गरज पडणार नाही. सरकारचा खंबीर पाठिंबा असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेच्या प्रारंभामुळे बॅंकिंगचा पुढील महत्त्वाचा टप्पा गाठण्यास देशाला बळ मिळणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)