घरके शेर… ही कसोटी मालिका देखील जिंकणार का ?

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका सुरु आहे. त्यात पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तीन दिवसात विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली अन्य एक फलंदाज ऐंशी धावांच्या पार जाऊन बाद झाला तर अन्य एक फलंदाज नव्वदीत बाद झाला. या सामन्यात भारताने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही पातळ्यांवर आपला ठसा उमटवला. भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि 272 धावांनी जिंकला. परंतु, खरंच हा विजय इतका मोठा होता का ?

भारतीय संघ महिन्याभरापूर्वी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत होता. तेथे भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि त्यामुळे आपण मालिका 4-1अशी गमावली. इंग्लंडचा संघ तसा आपल्या संघापेक्षा कमी ताकदवान संघ होता. कसोटी मानांकनाचा विचार केला तर. (बेन स्टोक्‍स याची ताकद तर सर्वांना त्याच्या कारनाम्यांमुळे माहितीच आहे.) भारताचे मानांकन पहिले तर इंग्लंड चौथ्या स्थानावर. तरीदेखील आपण परदेशी दौऱ्यात पराभव स्वीकारून आलो.

-Ads-

2015 पासून आपण 14 कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यात आपण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांना धूळ चारली. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यासारख्या तगड्या संघावर परदेशी मालिकांमध्ये विजय मिळवला हे विशेष. या दोन्ही संघात कमालीचे प्रतिभावान आणि अनुभवी खेळाडू आहेत. श्रीलंकेचे कुमार संगकारा, महिला जयवर्धने, मुरलीधरन यासारखे सामान्य दर्जाचे खेळाडूंच्या निवृत्तीनंतर आपण तेथे दिमाखदार विजय मिळवला.

वेस्ट इंडिज संघाचा क्रिकेटचा इतिहास किती सोनेरी होता याची अनेकांना कल्पना आहे. त्याच दमाचे खेळाडू अजूनही त्यांच्या संघात आहेत हा ! त्यांचा सध्याचा कसोटी कर्णधार यांच्याकडे तब्बल 34 कसोटी सामन्यांचा दांडगा अनुभव आहे. त्याने त्यात खोऱ्याने जवळजवळ दीड हजार धावा बनवल्या आहेत. विराट कोहली सारखा सामान्य कर्णधार खेळाडू एका वर्षात देखील इतक्‍या धावा बनवू शकत नाही. भारताने वेस्ट इंडीज संघाला पहिल्या कसोटी हरवले. त्या संघात ख्रिस गेल, ब्रावो, पोलार्ड, सुनील नारायण यांच्यासारखे खेळाडू जे आयपीलमध्ये ठीकठाक कामगिरी करतात यांच्या अनुउपस्थितीत हेही वेशेष.

भारताची पहिली खडतर परीक्षा जानेवारीत झालेला दक्षिण आफ्रिका दौरा होती. ती कसोटी मालिका भारताने गमावली. त्यात सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे भारताने कारण समोर केले. त्यानंतर भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला. त्यात देखील भारतीय संघाला 4-1असा मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघ कसोटी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाशी घरच्या मैदानावर पंगा घेत आहे. जेथे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ सारखे संघ पराभव पत्कारन गेले आहेत. तेथे वेस्ट इंडिजचा नवखा आणि पुरेसा अनुभव नसणारा संघ काय करू शकणार. त्यामुळे हा मालिका विजय देखील निश्‍चित आहे.

भारतासाठी या मालिकेतील चांगली बाब म्हणजे भारतीय संघ नवीन चेहऱ्यांना संधी देतो आहे. त्यात एखादा पृथ्वी शॉ दुसरा सचिन तेंडुलकर बनण्याचे स्वप्ने आपणाला दाखवत आहे. त्यामुळे हा दौरा दोन्ही संघातील नव्या खेळाडूंसाठी अनुभवाची शिदोरी आहे. याच्यापेक्षा जास्त फलित काही नाही.

– राजकुमार ढगे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)