घरकुल हमी कायदा, नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याची मागणी

नगर – घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी केंद्र शासनाने जाहिर केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा व आंदोलने चालू आहे. महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा करुन, नागरिकांना नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी फुगडी मार्च काढून, शासनाचे लक्ष वेधले जाणार असल्याचा निर्णय हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित घेण्यात आला. यावेळी घरकुल वंचितांनी घरकुल हमी कायदा लागू करण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या.

जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सकाळी 10:30 वाजता काळी फुगडी मार्चला प्रारंभ होणार असून, यामध्ये सहभागी शहर व उपनगरातील घरकुल वंचित दंड व कपालावर काळे पट्टया बांधून फुगड्या खेळून शासनाचा निषेध नोंदवणार आहे. जमीनीचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र व राज्य शासनाकडून घरांसाठी मिळणारा अडीच लाखाचा निधी तटपुंजा ठरत आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू झाल्यास, पंतप्रधान आवास योजनेला गती मिळणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात काळा पैसा जागेत (रीयलईस्टेट) गुंतला असून, अनेकांच्या नांवे बेनामी संपत्ती सापडत आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याची गरज आहे. नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू केल्यास मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बेनामी संपत्ती व जागा बाहेर येणार आहे. ही जमीन सरकारकडे जमा केल्यास घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटणार असल्याचे ऍड.कारभारी गवळी यांनी सांगितले.

प्रकाश थोरात यांनी पंतप्रधान आवस योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे नियोजन व निधी नसल्याने ही घोषणा फसवी ठरु पाहत आहे. या योजनेसाठी सरकारी पडिक जमीनी उपलब्ध झाल्यास घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविता येवू शकणार आहे. मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन पड असून, ही जमीन लॅण्ड बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध केल्यास या योजनेला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार औद्योगीकरण व रस्त्यांसाठी जमीन अधीग्रहण करत असते. त्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील मनपा व नगरपालिका यांनी आपल्या हद्दीजवळील माळरान जमीन अधिग्रहण केल्यास घरकुल वंचितांना एक गुंठा देवून, ही योजना राबविता येणार असल्याची आशा अशोक सब्बन यांनी व्यक्त केली. यावेळी शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, वैशाली नागपुरे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, शारदा भालेकर, हिराबाई ग्यानप्पा आदिंसह शहर व उपनगरातील घरकुलवंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)