घरकुल वंचितांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

निवाऱ्यासाठी खासगी किंवा सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण नियमाकुल करण्याची मागणी

नगर – घरकुल वंचितांनी खासगी किंवा सरकारी जागेवर निवाऱ्यासाठी केलेले 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे अतिक्रमण नियमाकुल करावे. तसेच, महाराष्ट्र ग्रामदान कायदा 1964 ची अंमलबजावणी करून कलम 9 अन्वये ग्राममंडळे स्थापन करण्याच्या मागणीसाठी “मेरे देश में मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मालकीनामा व भूदान भूमिगुंठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या घरकुल वंचितांनी जोरदार निदर्शने केली.

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरदेखील अनेक नागरिकांना राहण्यासाठी जागा व कसण्यासाठी जमीन नाही. निवारा नसलेले घरकुल वंचित समाजात नरक यातना भोगत असून, त्यांनी निवाऱ्यासाठी खासगी किंवा सरकारी जमिनींवर अतिक्रमणे केली आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरे देण्याचे स्वप्न दाखविण्यात आले. मात्र, जागा नसल्याने या योजनेला गती नाही. 12 वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्यास असलेला व्यक्‍ती त्या जागेचा मालक झाला आहे. कसतो त्याची जमीन याप्रमाणे राहतो त्याला कायद्याने मालकी हक्‍क देण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. फक्‍त निवाऱ्यासाठी करण्यात आलेले अतिक्रमण नियमाकूल करण्यात यावे. धनदांडग्या व्यक्‍तींनी केलेल्या अतिक्रमणांची जागा शासनाने ताब्यात घेऊन इतर घरकुल वंचितांसाठी उपलब्ध करण्याचे संघटनेने स्पष्ट केले.

अनेक खेडेगावात नोकरी व्यवसायानिमित्त नागरिक शहर व परदेशात गेले आहेत. ते राहत असलेले वाडे 30 ते 35 वर्षांपासून पडीक राहिल्याने सध्या मातीचे ढिगारे बनले आहेत. अशा जागा दान स्वरूपात घेऊन घरकुल वंचितांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामदान कायदा 1964 ची अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक गावात ग्राममंडळे स्थापन करून त्याच्या अध्यक्षांना भूदानपाल घोषित करावे. या मंडळाच्या माध्यमातून दान स्वरूपात खेड्यातील पडीक जागा ताब्यात घेऊन लॅण्डबॅंकद्वारे घरकुल वंचितांना निवाऱ्यासाठी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अनिता कासार, हिराबाई ग्यानप्पा, अंबादास दरेकर, अंबिका नागूल, अर्चना आढाव, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)